नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे...
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
नांदेडजवळील उड्डाणपुलाचा भराव कोसळण्यामागे साधं कारण आहे – निकृष्ट दर्जाचं काम आणि पाण्याचा अयोग्य निचरा. रॅम्पसाठी वापरल्या जाणाऱ्या MSE/RE वॉल रचनेत पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी ‘वीप होल्स’ आणि फिल्टर मीडिया असणं गरजेचं असतं. पण या पुलात नाही तर एकंदरच सगळ्याच सरकारी प्रकल्पांमध्ये हे नीट बसवलं जात नाही किंवा ते बांधकामादरम्यान ब्लॉक होतं. परिणामी पाणी भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण करते आणि मग भिंत कोसळते. शिवाय, योग्य मुरमाऐवजी चिकणमाती वापरली जाते, कॉम्पॅक्शन अपूर्ण राहतो आणि अँकरिंग कमकुवत असतं. हे सगळं कंत्राटदार-अधिकारी संगनमताचं उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे प्रीकास्ट पॅनेल्स आणि जिओटेक्सटाईल वापरले जातात, पण इथे जुनाट पद्धतींनी कोट्यवधींचा मलिदा लाटला जातो. दोषींवर फौजदारी कारवाई झाली तरच सुधारणा होईल, अन्यथा जनतेच्या जीवाशी खेळ सुरूच राहील. अर्थात ही कारवाई राजकारणी करू शकतात परंतु मुख्यमंत्री यात विरोधकांना शेलकी विशेषणे बहाल करून वेळ मारून नेत आहेत.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
नितीन गडकरी यांनी देशात आणलेले 'टोल मॉडेल' आता राज्य सरकारांनीही अंगीकारले आहे. एकेकाळी लोककल्याणासाठी करांमधून रस्ते बांधणारे सरकार आता पायाभूत सुविधांची (कॅपिटल बजेट) थेट जबाबदारी टोलच्या माध्यमातून जनतेवर ढकलत आहे. समृद्धी महामार्ग किंवा नियोजित शक्तीपीठ सारख्या लाखो कोटींच्या प्रकल्पांचा खर्च आणि देखभाल पाहता, हे मार्ग पुढील १०० वर्षेही टोलमुक्त होण्याची शक्यता नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचे उदाहरण या अपारदर्शकतेची साक्ष देते. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, पायाभूत सुविधांवरील खर्च टोलवर सोपवून सरकार आपला महसूल 'लाडकी बहीण', मोफत वीज आणि कर्जमाफी यांसारख्या लोकप्रिय, पण अनुत्पादक योजनांवर उधळत आहे. दीर्घकालीन आर्थिक विकास रोखून केवळ मतांच्या राजकारणासाठी केला जाणारा हा महसुली खर्च राज्याला कर्जाच्या खाईत ढकलणारा आणि सर्वसामान्य करदात्यांची दुहेरी लूट करणारा आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अट्रोसिटी कायद्याचा वारंवार गैरवापर केला जातो आहे हे उघड होत असून सुद्धा भाजपा या कायद्याचा फेरविचार करायला तयार नाही. महेश बिडगर प्रकरणाने गंगाखेडमध्ये मोठा तणाव निर्माण केला आहे. धनगर आरक्षण आंदोलनात केलेल्या वक्तव्यावरून त्याला चार जणांनी मारहाण करून माफी मागवली आणि व्हिडिओ व्हायरल केला. नंतर पोलिसांनी त्याच्यावरच अट्रोसिटी केस दाखल केली, ज्यामुळे समाजात संताप उसळला. हजारो लोकांनी मोर्चा काढून आरोपींना अटक व पोलीस अधिकारी डोंगरेवर कारवाईची मागणी केली. धनगर समाजात नेते भरपूर आहेत पण एकी नसल्याने त्यांचा आमदार निवडून येत नाही. मात्र या मोर्च्यात नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून न्यायासाठी आवाज उठवला. वंजारी समाजही ठामपणे सहभागी झाला. तरीही कारवाई न झाल्याने समाजात असंतोष वाढला आहे. मुख्यमंत्री फडणवीस व आमदार पडळकर यांच्याकडून ठोस पाऊल उचलले नाही तर धनगर समाज जिल्हाभर आंदोलन उभारेल अशी धमकी दिली आहे पण मुळातून ही वेळ येणेच चुकीचे आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अयोध्या राम मंदिरातील रोख रक्कम चोरीच्या प्रकरणावरून सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या चोरीचा तपास अत्यंत उघडपणे आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून, त्याची प्रत्येक माहिती माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचत आहे. असे असतानाही, काँग्रेस पक्षाकडून या चोरीविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विरोधकांची ही भूमिका हास्यास्पद आहे. कोंग्रेससाठी तर राम हे काल्पनिक पात्र होते याचे त्यांनी शपथपत्र कोर्टात दिले होते. अखिलेश यादव यापूर्वी कधी राम मंदिराकडे फिरकले सुद्धा नाहीत या नेत्यांनी कधी मंदिरासाठी एक रुपयाही दिला नाही, ते आता राजकीय फायद्यासाठी 'दांभिक श्रीराम भक्ती' दाखवत आहेत हे हास्यास्पद आहे. ही निदर्शने म्हणजे केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेला राजकीय स्टंट असून, जनतेला यातील सत्य ठाऊक असल्याने विरोधकांना निवडणुकांमध्ये याचे कोणतेही राजकीय फळ मिळणार नाही.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन घेतलेली भेट शिवसेना उबाठा गटाला चांगलीच बोचली आहे. प्रवक्ते संजय राऊत यांनी या भेटीवर जाहीर आक्षेप घेत, यामुळे पवारांबद्दलचा आदर कमी होत असल्याची टीका केली. परंतु, राऊत यांचे वक्तव्य पाहता उबाठा गटाला पवारांच्या भेटीपेक्षा, ती भेट शिंदेंच्या कार्यालयात झाली या जागेवरून जास्त आक्षेप असल्याचे दिसते. यशवंतराव चव्हाण केंद्रात भेट झाली असती तर चालले असते, हा राऊतांचा युक्तिवाद उबाठा गटाच्या धोरणातील संभ्रम अधोरेखित करतो. विरोध नेमका कोणाला आणि कशाला, यावरून उबाठा गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या डोक्यात असलेला गोंधळच यातून स्पष्ट होतो आणि याच संभ्रमावस्थेमुळे त्यांच्या पक्षाची आज उद्धवरावांचा पक्ष रोज छोटा छोटा होतो आहे.
🔽









Comments