देशात नेमके काय चालले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
देशात नेमके काय चालले आहे, हा प्रश्न आता सामान्य माणसालाही पडू लागला आहे. विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत सुधारणा मागत आहेत. काही समाजघटक आरक्षण व्यवस्थेचे पुनरावलोकन आणि सुधारणा मागत आहेत. वाहनधारक इथेनॉल धोरणातील त्रुटींवर प्रश्न विचारत आहेत. शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्ग प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रश्नांवर सरकारकडून ठोस धोरणात्मक उत्तरे अपेक्षित आहेत. पण त्याचवेळी भाजपाचे राजकारण ‘वंदे मातरम्’भोवती फिरताना दिसत आहे. ‘वंदे मातरम्’ हा आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा गौरवशाली मंत्र आहे; त्याचा सन्मान व्हायलाच हवा. पण देशभक्ती आणि सुशासन हे एकमेकांचे पर्याय नाहीत. जनता समस्यांवर उपाय मागत असताना तिच्या हातात राष्ट्रवादाचा झेंडा देऊन मूळ प्रश्न झाकता येत नाहीत. ‘वंदे मातरम्’ जरूर म्हणा; पण आधी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. अन्यथा उद्या जनता विचारेल—मातेला वंदन तर केले, पण तिच्या लेकरांच्या प्रश्नांचे काय केले?
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
पिंपरी-चिंचवडच्या जुनी सांगवीत दहीहंडी उत्सवादरम्यान डीजेचा अवजड सेटअप कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उत्सवांच्या नावाखाली सुरू असलेल्या बेफिकिरीचे भयावह रूप दाखवते. या मृत्यूची जबाबदारी नेमकी कुणाची? सेटअप उभारणाऱ्यांची, आयोजकांची, परवानगी देणाऱ्या यंत्रणेची की नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या पोलिसांची? चौकशीत तथ्य समोर येईलच; पण तोपर्यंत नेहमीप्रमाणे जबाबदारीचा चेंडू एकमेकांकडे ढकलला जाईल. आणि काही माध्यमे जर तो डीजे सेटअप नसून केवळ ‘मंडपाचा लोखंडी सांगाडा’ होता, असे सांगून घटनेचे गांभीर्य कमी करत असतील तर त्यांचेही विशेष ‘अभिनंदन’! डीजेच्या आवाजाने आधी कायद्याचा आवाज दाबला; आता एका महिलेचा जीव गेला. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला उत्सव आणि उन्माद यातला फरक समजणार आहे?
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
एसटी बस थांबते त्या अनेक हॉटेलांमध्ये प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या की ‘प्रवासी देवो भव’ची आठवणही होत नाही. कळकट टेबलं, माशांचा सुळसुळाट, बेचव वडापाव, नावापुरता चहा आणि पॅकबंद पदार्थांना अव्वाच्या सव्वा किंमती! स्वच्छ पिण्याचे पाणी दुर्मिळ आणि प्रसाधनगृहांची अवस्था तर वर्णन करण्यापलीकडची. सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रवाशांकडे पर्यायच नसतो. बस जिथे थांबेल तिथेच खा, प्या आणि जे मिळेल ते स्वीकारा! रोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात; त्यामुळे ही केवळ गैरसोय नसून सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न आहे. एसटी महामंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाने अशा अधिकृत-अनधिकृत थांब्यांवरील हॉटेल, कॅन्टीन आणि टपऱ्यांची नियमित तपासणी केली पाहिजे. तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांनी एकदा या थांब्यांकडे मोर्चा वळवावा; प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेणाऱ्या व्यवस्थेने किमान त्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय आणि माणसाच्या खाण्यालायक अन्न तरी मिळेल याची हमी द्यावी!
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
संतोष पंडित प्रकरणातील खरा प्रश्न तक्रारदार महिला कोण आहे हा नाही; प्रश्न आहे पोलिसांच्या विलक्षण तत्परतेचा! सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह मजकुरामुळे एका महिलेला भावना दुखावल्याचे वाटले, तिने मध्यरात्री तक्रार केली आणि पोलिसांनीही तक्रार नोंदवून रात्रीच पंडितांना अटक केली. कायद्याने कारवाई योग्य असेल तर ती जरूर व्हावी. पण मग सामान्य नागरिकाच्या फसवणूक, मारहाण, धमकी किंवा चोरीच्या तक्रारीवरही पोलीस याच वेगाने हालचाल करतात का? हाच कळीचा प्रश्न आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील व्यक्तीचा संबंध आला की यंत्रणेच्या हालचालींचा वेग अचानक वाढतो, असा संशय निर्माण होणे व्यवस्थेसाठीच घातक आहे. कायद्याचे राज्य म्हणजे मध्यरात्री अटक करण्याची ताकद नव्हे; तीच तत्परता मंत्री असो वा मजूर—प्रत्येकासाठी दाखवण्याची हिंमत होय!
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
एकेकाळी उत्सव सामान्य माणसाचा होता. चार पोरं एकत्र यायची, घरटी दोन-पाच रुपये वर्गणी गोळा व्हायची आणि त्या पैशातून गणपती, दहीहंडी उभी राहायची. वर्गणी न देणाऱ्या ‘बापटां’च्या घरीही प्रसाद पोहोचायचा. आज वर्गणीची वही गायब झाली; पण उत्सव कोट्यवधींच्या झगमगाटात पोहोचले. पैसा राजकीय नेत्यांचा आणि त्या बदल्यात मंडळांचे कार्यकर्ते त्यांच्या दावणीला! दहीहंडी माखनचोर श्रीकृष्णाच्या स्मरणासाठी आहे; पण हंडीपेक्षा नेत्यांचे कटआउट मोठे आणि कृष्णाची प्रतिमा छोटी होत असेल, तर तो उत्सव श्रद्धेचा राहतो कुठे? जनतेचा विरोध उत्सवाला नाही; उत्सवाच्या राजकीय अपहरणाला आहे. देवाच्या नावाने उत्सव, नेत्याच्या पैशाने उधळपट्टी आणि प्रत्येक चौकात नेत्याचीच आरती! मग चार ओळीच उरतात—
सत्तेमधला वाटा...
पैशाला ना तोटा...
कृष्ण झाला छोटा...
नेता झाला मोठा...!
🔽
#AbhijeetRane #MumbaiMitra #Maharashtra #Politics #IndianPolitics #VandeMataram #GoodGovernance #JanatechePrashna #DahiHandi #FestivalSafety #Accountability #STBus #MSRTC #PublicHealth #SantoshPandit #RuleOfLaw #FreeSpeech









Comments