top of page

लोहगडच्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवले आहे...

  • dhadakkamgarunion0
  • 12 minutes ago
  • 3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

लोहगडच्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा एकदा समाजाला हादरवले आहे. किरकोळ वादातून चाकूने वार करून एका तरुणाचा जीव घेण्यात आला, पण गर्दीने भरलेल्या डब्यात कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही. ही बाब गुन्ह्याइतकीच अस्वस्थ करणारी आहे. कायद्याचा धाक कमी झाला आहे की समाजाची संवेदनाच बोथट झाली आहे, हा प्रश्न पडतो. हिंसक वेब सिरीज, चित्रपट आणि सोशल मीडियावरील क्रौर्याचे सातत्याने होणारे प्रदर्शन काहींच्या मानसिकतेवर परिणाम करत असेल, ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यापेक्षा मोठी शोकांतिका म्हणजे अन्याय डोळ्यांसमोर घडत असतानाही आपण केवळ प्रेक्षक बनून राहतो. समाजाने पुन्हा माणुसकी आणि धैर्य जिवंत करण्याची वेळ आली आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्या सारखे नेते वंजारी समाजाला लक्ष्य करत आहेत. संतोष देशमुख आणि विलास घुले या दोन्ही प्रकरणांवरून वंजारी समाजाला अन्यायकारकपणे लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. काहींच्या गुन्ह्यांची जबाबदारी संपूर्ण समाजावर टाकणे योग्य नसल्याची भूमिका मांडली जात आहे. वंजारी समाजाचे म्हणणे आहे की, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी; मात्र त्यासाठी संपूर्ण समाजाला बदनाम करणे, राजकीय हेतूने जातीय ध्रुवीकरण करणे किंवा प्रत्येक घटनेला जातीय रंग देणे टाळले पाहिजे. कोणत्याही गुन्ह्याचा तपास पुराव्यांच्या आधारे होणे आवश्यक आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत दोषींना शिक्षा आणि निरपराधांना संरक्षण मिळणे, हेच लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. समाजात सलोखा टिकवण्यासाठी राजकारणापेक्षा न्यायाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवी सत्य असे आहे की राजकारण दोन्ही बाजू करत आहेत आणि त्या माध्यमातून आपापल्या जातींची गठ्ठा मते मिळवण्याची धडपड सुद्धा लपून राहिलेली नाही.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

दादरमधील पांढरा पट्टा वादानंतर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केल्याची घटना तणावाऐवजी संवादाचा मार्ग अधिक प्रभावी असल्याचे अधोरेखित करते. राज ठाकरे यांनी सुद्धा समजूतदारपणाची भूमिका घेत भविष्यात परस्पर संवाद वृद्धिंगत करून अश्या पद्धतीचे वाद निरमा होण्यावरच आपण नियंत्रण मिळवूया असे आवाहन केले. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर परस्पर संवादातून गैरसमज दूर करणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. महाराष्ट्राची सामाजिक सलोखा आणि परस्पर सन्मानाची परंपरा जपण्यासाठी सर्व घटकांनी संयम, संवेदनशीलता आणि जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. मतभेद असू शकतात, पण ते कायमस्वरूपी वैमनस्यात रूपांतरित होऊ नयेत. संवाद, समन्वय आणि परस्पर आदर हाच अशा प्रत्येक वादावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. या समजूतदारपणा बद्दल राज ठाकरे आणि जैन धर्मियांचे हार्दिक अभिनंदन.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

गेल्या आठवड्यातील एका वैयक्तिक अनुभवाने आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव समोर आणले. रुग्णालयात अवाजवी बिल, बिलाची प्रत देण्यास नकार आणि उपचारासाठी एक्सपायरी औषध वापरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र ठाम भूमिका, पुरावे आणि योग्य प्रश्न विचारताच संपूर्ण व्यवस्थेचा सूर बदलला. जवळपास लाख रुपयांवर पोहोचलेले बिल अखेरीस अवघ्या दहा हजारांवर आले. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली—सामान्य नागरिक जागरूक असेल तर अन्यायाला रोखू शकतो. तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक आणि निर्भीड अधिकारी व्यवस्था बदलू शकतात, याचीही पुन्हा प्रचिती आली. प्रत्येक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी अशीच प्रामाणिक भूमिका घेऊ लागला, तर देश बदलायला फार वेळ लागणार नाही.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी भाषण करताना विरोधी पक्षनेते स्टॅलिन यांना अपमानजनक प्रश्न विचारला की तुमचे बाबा सभागृहात आले नाही का ? हा प्रश्न विचारण्याची पार्श्वभूमी म्हणजे स्टॅलिन यांचे वडील निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या अभिरुचीहीन आणि वैयक्तिक टोमण्यामुळे विजय यांचे सहकारी पक्ष सुद्धा नाराज झाले आहेत. लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अपरिहार्य असतो. मात्र तो वैचारिक आणि धोरणात्मक असणे अपेक्षित आहे. वैयक्तिक टोमणे, कौटुंबिक उल्लेख किंवा उपहास यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होते. राजकारणात विनोद आणि उपरोधाला स्थान असले तरी त्याची मर्यादा पाळली गेली पाहिजे. जनतेने आपल्या प्रतिनिधींना व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोपांसाठी नव्हे, तर राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. याची जाणीव विजय यांनी ठेवणे आवश्यक आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page