top of page

नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे...

  • dhadakkamgarunion0
  • 20 hours ago
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नाशिकमध्ये घडलेले प्रकरण वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे आणि बेफिकीरीचे ज्वलंत उदाहरण आहे. लष्कराचे सरकारी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाकडे ५००० रुपयांची लाच मागितली गेली, आणि नकार दिल्यावर एका पोलिसाने पेटती सिगारेट डिझेल टाकीवर फेकून ट्रक पेटवला. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे सामान जळत असताना मदत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी पळून गेले, ही लाजिरवाणी बाब आहे. वाहतूक पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असते, पण ते पैसे खाण्यात गुंतलेले दिसतात. अशा घटनांनी पोलीस खात्यावरील विश्वास पूर्णपणे ढासळतो. शासनाने या दोषींवर कठोर कारवाई करून उदाहरण घालणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला पोलीसच संरक्षण देत आहेत अशी भावना जनतेत अधिक दृढ होईल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात,

तामिळनाडूच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसमधील महिला नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अलका लांबा यांनी हझिना सय्यद यांची हकालपट्टी जाहीर केली, पण सय्यद यांनी आधीच राजीनामा दिल्याचं सांगत लांबांना सडेतोड उत्तर दिलं. या वादात वैयक्तिक आरोपही झाले, ज्यामुळे पक्षातील अंतर्गत कुरबुरी उघड झाल्या. प्रियंका चतुर्वेदीपासून अर्चना गौतमपर्यंत अनेक महिला नेत्यांना असुरक्षिततेमुळे पक्ष सोडावा लागला होता. काँग्रेसने या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घ्यायला हवी, कारण महिला नेतृत्व टिकत नाही हे गंभीर अपयश आहे. निवडणुकीच्या काळात अशा वादांनी पक्षाची प्रतिमा मलिन होते आणि महिला सुरक्षिततेचा प्रश्न अधिक तीव्रतेने पुढे येतो. काँग्रेसने आत्मपरीक्षण करून ठोस सुधारणा करणे हीच खरी गरज आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात,

सनम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला रोखण्यासाठी नव्हे तर ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी लढत आहे. . 2023 च्या सागरदिघी पोटनिवडणुकीत काँग्रेसने तृणमूलला धक्का दिला होता, तर 2024 मध्ये अधीर रंजन चौधरींचा पराभव करण्यासाठी ममतांनी युसूफ पठाण यांना मैदानात उतरवले. या अपमानानंतर काँग्रेसने बंगालमध्ये 294 जागांवर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. हम तो डुबेंगे सनम तुमको भी ले डुबेंगे या मानसिकतेत कोंग्रेस पक्ष गेला आहे. मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत अव्वल स्थान राखले होते, त्याच जागांवर आता लक्ष केंद्रित आहे. मौसम बेनझीर नूर यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळाले आहे. मात्र ममता बॅनर्जींच्या मतांवर काँग्रेसची कुरघोडी भाजपला अधिक फायद्याची ठरू शकते. बंगालच्या राजकारणात ही लढाई काँग्रेस विरुद्ध ममता अशीच रंगताना दिसते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

स्मृती इराणी यांचं राजकारणातलं व्यक्तिमत्त्व नेहमीच ठाम आणि प्रभावी राहिलं आहे, पण अलीकडे त्यांनी दाखवलेली भाषिक मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. आर.जी.कर हत्याकांडातील पीडितेच्या आई रत्ना देबनाथ यांच्यासाठी प्रचार करताना त्यांनी बंगाली भाषेत संवाद साधला आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा उच्चार व प्रवाह ममता बॅनर्जींपेक्षाही अधिक सहज वाटला. दोन-तीन वर्षांपूर्वी शिकायला सुरुवात केलेली भाषा इतक्या आत्मविश्वासाने बोलणे हे त्यांच्या चिकाटीचं आणि लोकांशी जोडून घेण्याच्या क्षमतेचं द्योतक आहे. स्मृती इराणी यांनी दाखवलेली ही मेहनत केवळ राजकीय रणनीती नाही, तर जनतेशी थेट संवाद साधण्याची खरी ताकद आहे. अशा नेत्यांमुळे भाषेच्या पलीकडे जाऊन विश्वास आणि आपुलकी निर्माण होते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

खरीप हंगाम होऊन ६ महिने उलटले तरी अजूनही स्वतःच्या पैशातून विमा प्रीमियम भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळत नाहीये. राज्य सरकारने १ रुपयांत विमा योजना बंद केल्यावरही शेतकऱ्यांनी पदरमोड करून विमा प्रीमियम भरलेला आहे. जोपर्यंत मोदी सरकार सबसिडी देत होतं तोपर्यंत पीक विमा योजना व्यवस्थित चालू होती.पण त्यानंतर राज्यांनी आखडते हात घेतल्याने या योजनेचा बोजवारा उडाला. शेतकऱ्यांना जर पेरणीच्या वेळेपर्यंतही पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर यंदाच्या वर्षी कुठलाही शेतकरी खरीप विमा का उतरवेल? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि त्यांचे नुकसान कमी व्हावे यासाठी पीक विमा योजना राबविण्यात आली पण आता मात्र ती योजना विमा कंपन्यांना चरण्यासाठी नवे कुंपण झाले आहे.

🔽



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page