top of page

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मंत्रालयात एकाच वेळी ४ अत्यंत खास...

dhadakkamgarunion0
Jul 12
3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मंत्रालयात एकाच वेळी ४ अत्यंत खास आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एपीएस सिद्धार्थ यादव, खाजगी सचिव अमर सिंह आणि अतिरिक्त खाजगी सचिव आयुष शरण व शैलेश कुमार सिंह यांच्या हकालपट्टीची थेट माहिती पंतप्रधान कार्यालयाला (PMO) देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या इतिहासात अशी धडक कारवाई कधीच झाली नव्हती. राजस्थानच्या सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील अवैध खाणकामाच्या कथित मंजुरीचे प्रकरण ‘एनजीटी’मध्ये (NGT) गाजल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. हे अधिकारी मंत्र्यांच्या सावलीसारखे होते, त्यामुळे थेट PMO च्या निर्देशाने झालेली ही कारवाई केवळ अधिकाऱ्यांपुरती मर्यादित आहे की ही भूपेंद्र यादव यांच्याही मंत्रिपद एक्झिटची नांदी आहे? यामागे नक्की कोणता मोठा भ्रष्टाचार दडलाय, याचे उत्तर लवकरच समोर येईल!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

डॉक्टरांवर होणारे अमानुष हल्ले, पावसात जीव मुठीत धरून चुकीच्या बाजूने सुसाट धावणाऱ्या गाड्या, महानगरात सर्वत्र लावलेले वाऱ्याने डोलणारे अजस्त्र, धोकादायक, बेकायदेशीर होर्डिंग्स आणि रस्त्यांवरील खड्डे; हे आजच्या आपल्या सडलेल्या वातावरणाचे जिवंत रूप आहे. '१० मिनिटांत डिलिव्हरी'च्या नादात सिग्नल तोडणारे दुचाकीस्वार असोत, वा कायदा पायदळी तुडवणारे धनदांडगे—इथे सायकल असो वा मर्सिडीज, रस्ते आणि मरण सर्वांसाठी सारखेच आहे. नियम, शिस्त आणि कायदे पूर्णपणे मोडीत निघाले असून गरीब-श्रीमंत, शिक्षित-अडाणी सगळेच 'सब घोडे बारा टक्के' झाले आहेत. प्रत्येकाला सर्वकाही झटपट आणि स्वस्त हवे आहे. दुःख या गोष्टीचे नाही की साधे, सुरक्षित आणि स्वच्छ जगणे दुर्मिळ झाले आहे; तर चिंताजनक हे आहे की, ही अराजकता आता कोणाला खटकतच नाहीये!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

सगळीकडची सत्ता गेली तरी कोंग्रेसी मंडळींचा माज आणि दरबारी राजकारण करण्याची पद्धती बदलत नाही. गोवा काँग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी गेलेले संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पक्षातील संवाद कसा संपला आहे, याचा वस्तूपाठ घालून दिला. निलंबित कार्यकर्त्या शमीला सिद्दीकी यांनी जेव्हा माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना अचानक आणि असंवेदनशीलपणे हटवण्याबाबत थेट प्रश्न विचारला, तेव्हा वेणुगोपाल यांचे उत्तर होते, "अध्यक्ष होण्यापूर्वी अमित कोण होते?" अहंकाराची सीमा गाठत, जेव्हा कार्यकर्त्यांनी हायकमांडच्या कार्यपद्धतीवर लोकशाही मार्गाने प्रश्न उपस्थित केला, तेव्हा वेणुगोपाल यांनी थेट "गेट आऊट" (बाहेर निघा) म्हणत त्यांना हाकलून दिले. पक्षात अंतर्गत लोकशाही शिल्लक नसणे, निष्ठावंतांचा अपमान करणे आणि हुकूमशाही वृत्ती चालवणे, याच मुख्य कारणांमुळे आज देशभरातून जुने, सुशिक्षित आणि स्वाभिमानी कार्यकर्ते काँग्रेस सोडून जात आहेत. कोंग्रेसवाल्यांना जमीनीवरील वास्तव अजूनही उमगत नाही हेच खरे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

नितीन गडकरी वारंवार भारताला ब्राझीलचे इथेनॉल मॉडेल स्वीकारण्याचा सल्ला देतात. मात्र, ब्राझील आणि भारताच्या नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. ब्राझीलची लोकसंख्या अवघी २२ कोटी आणि जलस्रोत जगात प्रथम (८,६४७ अब्ज घन मीटर) आहेत, तर भारताची लोकसंख्या १४८ कोटी आणि जलस्रोत केवळ १,९११ अब्ज घन मीटर आहेत. अशा स्थितीत मका आणि उसासारखी पिके आणि अफाट पाणी जाळून इथेनॉल बनवणे म्हणजे देशाच्या अन्न व जलसुरक्षेशी खेळ आहे. ब्राझीलचे फसवे उदाहरण देऊन लादले जाणारे हे धोरण 'राष्ट्रप्रथम' की 'गडकरीप्रथम'? संघ परिवाराने गडकरींच्या कंपन्यांना थेट आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी 'लाडके गडकरीपुत्र योजना' सुरू करावी, पण विकासाच्या नावाखाली देशाच्या मौल्यवान संसाधनांची अशी धोरणात्मक नासाडी करू नये, हीच अपेक्षा!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*,

काँग्रेसचे घोटाळे, जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि खुद्द माजी पंतप्रधान राजीव गांधींनी कबूल केलेली '१ रुपयातील फक्त १५ पैसे पोहोचण्याची' भ्रष्ट व्यवस्था, हाच काँग्रेसचा खरा इतिहास आहे. जनतेने नाकारूनही विरोधकांचा मस्तवालपणा आणि मग्रुरी कायम आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार विकासाच्या योग्य दिशेने काम करत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विरोधकांच्या सर्व शंकांचे तथ्यवार निरसन केले आहे. सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण तो स्वतःच्या पापांवर पांघरूण घालण्याचा परवाना नाही. महाराष्ट्राला भ्रष्टाचार, दलाली आणि टक्केवारीची सवय कोणी लावली, हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे नैतिकतेचा ढोंगी आव आणणाऱ्यांनी आधी आपल्या पक्षाचा इतिहास वाचावा, जनतेची माफी मागावी आणि मगच उपदेश करावा. थोडक्यात सांगायचे तर, ज्यांनी महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची परंपरा दिली, त्यांनी महायुतीच्या विकासवादी सरकारला नैतिकतेचे धडे देणे म्हणजे 'भुताच्या हाती भागवत'च!

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page