🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 12
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बांगलादेशातील एक 12 वर्षाची लहान मुलगी शाळेत एका विषयात नापास झाली. आपले पालक रागावतील म्हणून ती घरातून पळून गेली. एका परिचित महिलेने तिला सीमा पार करून देत भारतात प्रवेश करवून दिला आणि तिला देहविक्रय रॅकेट चालवणार्या नराधमांच्या ताब्यात दिले. तिथून तिच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. तिला तिथून मुंबईत आणले गेले. वसई जवळील नायगाव भागातील वेश्यावस्तीत या मुलीला ठेवले गेले आणि तिच्यावर तीन महिन्यात तब्बल दोनशे पेक्षा अधिक पुरुषांनी बलात्कार केला. या संदर्भातील माहिती मिळाल्यावर पोलिस खाते आणि सामाजिक संस्थांनी त्या मुलीची या नरकातून सुटका केली आहे आणि तिच्यावर उपचार केले जात आहेत. देहव्यापार हा मानवी समाजाला लागलेला कलंक आहे आणि मनोविकृत मंडळी लहान वयाच्या मुलींवर सुद्धा अत्याचार करताना लाजत नाहीत हे अत्यंत लज्जास्पद सामाजिक वास्तव आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात राजकारण करणे घातक असते. कबुतरखाना प्रकरणात न्यायालयाचा निर्णय धाब्यावर बसवणे अत्यंत चुकीचे आहे. कबुतरांच्या विष्ठेत हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस आणि पॅराटायफॉइड सारख्या जंतूंचे बीजाणू असतात, जे हवेत मिसळून श्वसनाद्वारे शरीरात जातात. यामुळे खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप अशी लक्षणे निर्माण होऊ शकतात. विशेषत: वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांचे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना फुफ्फुसांचे संसर्ग, दमा आणि ऍलर्जीचा धोका अधिक असतो. कबुतरांच्या अंगावरील पिसांमध्ये आणि घरट्यांमध्ये टिक्स आणि माइट्स असतात, जे त्वचारोग आणि ऍलर्जी निर्माण करतात. सततच्या संपर्कामुळे जुनाट श्वसनविकार बळावतात. सार्वजनिक ठिकाणी त्यांना दाणा देणे केवळ रोगांचा प्रसार वाढवतेच, पण त्यांच्या संख्येतही अनियंत्रित वाढ घडवते. त्यामुळे कबुतरांपासून योग्य अंतर ठेवणे आणि त्यांना खाऊ घालण्याची सवय टाळणे हेच आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आज नवी दिल्लीत तब्बल 300 खासदारांचा अनोखा जनआंदोलन सोहळा रंगला! गंमत अशी की, याच आंदोलनात एका गटाने मतदार याद्यांचे शुद्धीकरण करून “मतांची चोरी” थांबवण्याची मागणी केली, तर दुसऱ्याच गटाने ‘मतदार यादी शुद्धीकरण मोहिम’ थांबवण्याचा आग्रह धरला! निवडणूक आयोगाने एकाच वेळी परस्परविरोधी या मागण्या कशा पूर्ण कराव्यात, हा प्रश्न मात्र कुणाही आंदोलकाला पडला नाही. हे पाहून देशवासीयांच्या मनात या खासदार मंडळींच्या विद्वत्तेबद्दल असणार्या सर्व शंका फिटल्या. सोशल मीडियावर तर कुणीतरी सुचवलं की राहुलजींनी 300 खासदारांच्या जोरावर पंतप्रधानपदाची दावेदारी करावी. पण लगेचच आठवण करून दिली गेली की यामध्ये राज्यसभेचे खासदारही आहेत… जे सत्ता स्थापनेत उपयोगी पडत नाहीत. असो, या आंदोलनाने विरोधाभासाचा कळस गाठला हे नक्की!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अलीकडेच मंत्री के. एन. राजन्ना यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. कारण अगदी स्पष्ट आहे — राजन्ना यांनी धैर्याने आणि प्रामाणिकपणे स्वीकारले की मतदार यादीतील गडबडी काँग्रेसच्या राजवटीतच घडल्या होत्या. ही कबुली देणे म्हणजेच काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांच्या, विशेषतः राहुल गांधींच्या, निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्याच्या राजकीय अजेंड्याला थेट धक्का देणे होते. राजन्ना यांचे विधान पक्षाच्या आखलेल्या ‘निवडणूक आयोगाच्या विरोधातील’ मोहीमेच्या पूर्ण विरोधात गेले. परिणामी, सत्य बोलण्याची शिक्षा त्यांना मंत्रिपद गमावून भोगावी लागली. हा प्रकार केवळ एका मंत्र्याचा अंत नाही, तर काँग्रेसमध्ये विरोधी मतासाठी जागाच नसल्याचे उदाहरण आहे. ही घटना स्पष्ट दाखवते की राहुल गांधींच्या अजेंडा विरोधात गेल्यास, सत्यालाही राजकारणाच्या गालिचाखाली दाबले जाते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काल् सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा निकाल दिला आहे आणि हा आदेश मानव विरुद्ध प्राणी या संघर्षात भविष्यामध्ये एक मानक म्हणून वापरला जाईल. नवी दिल्ली आणि सभोवतालच्या उपनगरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे आणि त्यांच्या हल्ल्यांमुळे , चावण्यामुळे अनेक नागरिकांना मृत्यूमुखी पडावे लागले आहे. लहान मुलांना एकटे सोडणे कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत या सगळ्या कुत्र्यांसाठी कोंडवाडे बनवा. तिथे त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना मरेपर्यंत पोसा परंतु कोणत्याही परिस्थितीत एकाही कुत्र्याला बाहेर सोडू नका. या संदर्भात एकाही प्राणीमित्र संघटनेची याचिका आम्ही ऐकून सुद्धा घेणार नाही हे स्पष्ट सांगत न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या आदेशाच्या आधारावर संपूर्ण देशभरातली सगळ्या शहरांमधील कुत्र्यांच्या संदर्भात याच पद्धतीची व्यवस्था सर्व राज्य सरकारांनी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या ग्रामसिंहांच्या मुळे खरोखर जगणे अशक्य झाले आहे.
🔽
#ChildTrafficking #PublicHealth #PigeonMenace #PoliticalSatire #VoterList #CongressPolitics #SupremeCourt #StrayDogs #K_N_Rajanna











Comments