top of page

महाराष्ट्रातील सुमारे ४० मंत्री कार्यालयांमध्ये मंजूर संख्येपेक्षा अधिक कर्मचारी...

dhadakkamgarunion0
5 days ago
3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

महाराष्ट्रातील सुमारे ४० मंत्री कार्यालयांमध्ये मंजूर संख्येपेक्षा अधिक कर्मचारी काम करत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या तपासणीत समोर आल्यानंतर तब्बल ५५० अतिरिक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले. हा निर्णय प्रशासनातील एका जुन्या रोगावर बोट ठेवतो. मंत्री बदलला की त्याच्या भोवती विश्वासू अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वतंत्र फौज उभी राहते. प्रश्न असा आहे की सरकारी विभागांमध्ये अधिकृत कर्मचारी असताना मंत्र्यांना एवढे अतिरिक्त मनुष्यबळ लागतेच कशासाठी? आणि त्यांची नियुक्ती कोणाच्या परवानगीने झाली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सफाई केली, त्याचे स्वागतच केले पाहिजे. मात्र ५५० कर्मचारी परत पाठवून विषय संपत नाही. ते तिथे कसे पोहोचले, किती काळ होते, त्यांच्या मूळ विभागातील कामावर काय परिणाम झाला आणि नियमबाह्य नियुक्त्यांना जबाबदार कोण, हेही जाहीर झाले पाहिजे. प्रशासन हे मंत्र्यांचे खासगी सचिवालय नाही; ते जनतेच्या पैशावर चालणारी व्यवस्था आहे.


🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

महाराष्ट्राच्या मतदारयादीच्या विशेष पुनरीक्षणात तब्बल १.२२ कोटी मतदारांच्या नोंदींबाबत पुढील पडताळणीची गरज समोर आली आहे. त्यापैकी ६२.४८ लाख मतदारांच्या नातेवाईकांच्या तपशिलात विसंगती असल्याचे, तर ५९.७५ लाख नोंदी जुन्या मतदारयादीतील नातेवाईकांशी जोडता न आल्याचे वृत्त आहे. मतदारयादी शुद्ध असलीच पाहिजे; मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे काढणे आवश्यकच आहे. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात कोट्यवधी मतदार पडताळणीच्या प्रक्रियेत येत असतील तर पारदर्शकता आणि पुरेसा वेळ हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. खरा मतदार कागदपत्रांच्या गोंधळामुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये. विरोधकांनी प्रत्येक पडताळणीला ‘मतचोरी’ म्हणणे जितके चुकीचे, तितकेच प्रशासनाने प्रत्येक शंका राजकीय आरोप म्हणून उडवून लावणे चुकीचे. स्वच्छ मतदारयादी हवी; पण त्यासाठी खरा मतदारच साफ होता कामा नये!


🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

FDA पेपरफुटीच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांनी बेलापूर येथील MPSC कार्यालयात सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळे फासल्याची घटना गंभीर आहे. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा संताप प्रचंड आहे. पेपरफुटी म्हणजे केवळ एक प्रशासकीय चूक नसते; वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेली फसवणूक असते. त्यामुळे आंदोलन व्हायलाच हवे, जबाबदार अधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत आणि दोषींवर कठोर कारवाईही झाली पाहिजे. पण एखाद्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणे हा उपाय नाही. उलट त्यामुळे मूळ पेपरफुटीचा प्रश्न बाजूला पडून चर्चा आंदोलनाच्या पद्धतीवर केंद्रित होते. सरकारनेही या घटनेचा आधार घेऊन विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये. काळे अधिकाऱ्यांच्या चेहऱ्याला नव्हे, परीक्षा व्यवस्थेतील काळ्या कारभाराला फासण्याची गरज आहे.


🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या वाढली असून आमदाराचा मुलगा रोहित गावित आणि साईराज पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाच्या तपासातील कथित दिरंगाईवर उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. आरोपी कोणाचा मुलगा आहे यापेक्षा त्याच्याविरुद्ध पुरावा काय आहे, हे न्यायालय ठरवेल. पण महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांवर दबाव येतो का, हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. त्यामुळे अशा प्रकरणात तपास अधिकच पारदर्शक असणे आवश्यक आहे. अटक झाली म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असेही मानता येत नाही; तितकेच, राजकीय घराण्यातील व्यक्ती आहे म्हणून विशेष वागणूकही मिळता कामा नये. कायद्याचे राज्य तेव्हाच सिद्ध होते, जेव्हा आरोपीच्या नावामागे आमदार, मंत्री किंवा खासदाराचे आडनाव आहे की नाही याने तपासाची दिशा बदलत नाही.


🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने प्रकाश जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू केली असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपली यंत्रणा सक्रिय केली आहे. वरकरणी हा एका विधानपरिषद जागेचा विषय वाटतो; प्रत्यक्षात मात्र महायुतीतील जागावाटप आणि राजकीय प्रभावक्षेत्राची ही नवी परीक्षा ठरू शकते. लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र आलेले पक्ष स्थानिक संस्था आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये आपापली ताकद सोडायला तयार नसतात. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपा व राष्ट्रवादी या दोघांनाही स्वतःचे संघटनात्मक वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला जाते यापेक्षा उमेदवारी ठरवताना महायुतीतील शक्तिसंतुलन कसे सांभाळले जाते, हे अधिक महत्त्वाचे ठरेल. युती टिकवणे सोपे; पण एकाच खुर्चीवर दोन मित्रांचा दावा आला की खरी मैत्री कळते!


🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page