पंतप्रधान मोदींनी परकीय चलन...
- dhadakkamgarunion0
- 2 days ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
पंतप्रधान मोदींनी परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसर करण्याचे आवाहन केले आणि त्यावर राज ठाकरे यांनी योग्य प्रश्न उपस्थित केला – भाजप नेते स्वतः काटकसर करतील का? याचे उत्तर महाराष्ट्रात लगेच दिसले. आशिष शेलार यांनी कांस चित्रपट महोत्सवाला जाणे रद्द केले, तर सरकारने आदेश देऊन शक्यतो सर्व सभा ऑनलाइन घेण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांना सरकारी विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक ठरली. ही सुरुवात महाराष्ट्रासाठी तत्पर आणि योग्य आहे. मात्र विरोधकांनी फक्त प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःच्या जीवनात काटकसर दाखवावी लागेल. कार्सचा ताफा कमी करणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे यासारखे बदल त्यांनी करणार का? अन्यथा “लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण” या उक्तीप्रमाणे त्यांची टीका केवळ दिखावा ठरेल. खरी काटकसर ही सर्वांसाठी समान जबाबदारी आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला डेंग्यू-मलेरिया सारखा रोग ठरवत समूळ उच्चाटनाची मागणी केली होती. हे अपमानजनक वक्तव्य त्यांच्या राजकीय अहंकाराचे द्योतक आहे. पण कर्माचा नियम असा आहे की जे धर्माला नष्ट करण्याची भाषा करतात त्यांचा नाश अखेर धर्माच्याच शक्तीने होतो. आणि आजच्या निवडणुकीत DMK पराभूत होऊन TVK विजयी झाल्याने तेच कर्माचे फळ त्यांनी भोगले आहे. सनातन धर्म हा हजारो वर्षांचा संस्कार, परंपरा आणि जीवनमूल्यांचा आधार आहे. त्याला रोगाशी तुलना करणे म्हणजे करोडो लोकांच्या श्रद्धेवर आघात करणे. उदयनिधी यांनी लक्षात ठेवावे—कर्म परत येते आणि जेव्हा येते तेव्हा तीव्रतेने घाव घालते. धर्म हा नाश पावणारा नाही, पण धर्मविरोधी विचार मात्र स्वतःच नाश पावतात.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
NEET २०२६ परीक्षा रद्द होणे हे शिक्षण व्यवस्थेवरील मोठे प्रश्नचिन्ह आहे. जयपूरमध्ये खुलेआम ३० हजारात गेस पेपर विकला जात होता, आणि आज २२ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा उन्हाळ्यात परीक्षा द्यावी लागणार आहे. दक्षिणेकडील राज्यांनी "एक देश एक परीक्षा"ला विरोध केला होता, कारण उत्तरेत पेपर लीक रॅकेट ही वास्तवता आहे. मोदी सरकार केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे असूनही पेपरफुटी रोखू शकले नाही. राजस्थान काँग्रेसच्या काळातही पेपरफुटीसाठी कुप्रसिद्ध होते, भाजपकाळातही स्थिती बदलली नाही. मनिष यादव व अविनाश लांबा हे मुख्य आरोपी पुढे आले, ४५ जणांना अटक झाली तरी FIR दाखल नाही. चौकशी CBI कडे दिली आहे. मेहनतीने अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मनस्ताप आहे. शिक्षणातील पारदर्शकता हीच खरी परीक्षा आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अविनाश पाठक हा २०१३ बॅचचा प्रमोटेड IAS अधिकारी जिल्हाधिकारी झाल्यावर बीडमध्ये अंगठेबहाद्दर गुंडांच्या फोनशिवाय सही करत नसे. त्याने जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली २५० कोटी रुपये लाटले, क्लास ३ पासून वरपर्यंत साखळी गुंतवली. नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी खोट्या सह्यांचा वापर उघड केला आणि SIT ने चौकशी सुरू केली. पाठकला लातुरातून अटक झाली, पण इतका वरिष्ठ अधिकारी गुंडांच्या आदेशावर काम करत होता हे धक्कादायक आहे. सरकारी पैसे वसूल होतील, पण या संपूर्ण साखळीला शिक्षा होणे गरजेचे आहे. जेलमध्ये टाकल्या टाकल्या पाठकला छातीत कळ आली, दवाखान्यात नेले. अशा आरोपींना अचानक आरोग्याचा आधार मिळतो, न्यायालये चौकशी करत नाहीत. भ्रष्ट व्यवस्था इतकी बरबटली आहे की हाच पाठक पुन्हा सहा महिन्यांत सचीव पदावर दिसू शकतो. अश्या गुन्हेगारांना कायमचे बडतर्फ करणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
NEET चा पाया घालताना महाराष्ट्राने स्वतःची मजबूत MHCET परीक्षा बाजूला ठेवली, कारण केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने विरोध करणे शक्यच नव्हते. शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय असल्याने मोदी सरकारने कायदा करून NEET सर्व राज्यांवर लादली. यामुळे कोचिंग इंडस्ट्री राष्ट्रीय झाली, करोडोंच्या पॅकेजवर शिक्षक ठेवले गेले, आणि श्रीमंत पालकांसाठी ही परीक्षा सोपी ठरली. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवाढव्य सिलॅबस, कमी दर्जाचे शिक्षण आणि ऑल इंडिया स्पर्धेचा ताण सहन करावा लागला. आज पेपरफुटीमुळे २२ लाख विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. सरकार खर्च करेल, पण नुकसान विद्यार्थ्यांचे आहे. MHCET कधीच फुटली नव्हती, त्यामुळे महाराष्ट्रासाठी तीच बरी म्हणावी लागते. "एक देश एक परीक्षा"चे फायदे जसे देशव्यापी आहेत तसेच त्याचे घावही देशव्यापी ठरतात.
🔽
#Modi #RajThackeray #Maharashtra #BJP #NEET2026 #EducationSystem #PaperLeak #SanatanDharma #DMK #TVK #Corruption #IAS #MHCET #Students #IndiaPolitics









Comments