top of page

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल...

  • dhadakkamgarunion0
  • 1 day ago
  • 3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल, एलएनजी (LNG) आणि हायड्रोजनचा आक्रमक प्रचार करत आहेत; मात्र वरकरणी 'ऊर्जा आत्मनिर्भरता' आणि 'शेतकरी कल्याणाचे' वाटणारे हे धोरण आता कौटुंबिक व्यावसायिक गणितांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सार्वजनिक नोंदींनुसार, गडकरींच्या पुत्रांच्या कंपन्या (उदा. मानस ग्रुप, सियान ॲग्रो) इथेनॉल निर्मिती आणि इंधन पंपांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत, तसेच आयुर्वेदिक क्षेत्रातील 'बैद्यनाथ ग्रुप'ला एलएनजी व्यवसायात उतरवण्यामागेही खुद्द गडकरींचीच प्रेरणा होती. एकीकडे मंत्री म्हणून सरकारी धोरणे राबवून विशिष्ट पर्यायी इंधनाची सक्ती व मागणी बाजारात निर्माण करायची आणि दुसरीकडे नेमक्या त्याच क्षेत्रात स्वतःच्या कुटुंबाचे व्यावसायिक हितसंबंध असणे, हा थेट 'कॉन्फ्लिक्ट ऑफ... इंटरेस्ट' (हितसंबंधांचा संघर्ष) आणि 'क्रोनी कॅपिटलिझम'चा प्रकार असून, जनतेला भावनिक मुद्द्यांत गुंतवून ठेवून धोरणांच्या आडून हे नवे भ्रष्ट 'Business Model' उभे केले जात असल्याची तीव्र टीका आता होऊ लागली आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सध्या मोठ्या प्रमाणावर अंतर्गत फेरबदल आणि राजकीय हालचाली सुरू असून, पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना अंधारात ठेवून निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर अंतर्गत धुसफूस वाढल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख टाळण्यात आल्याने हा वाद चव्हाट्यावर आला. शरद पवार गटाकडून पक्षाच्या विलीनीकरणाच्या उठणाऱ्या वावड्यांना उत्तर देण्यासाठीच ही पावले उचलली गेल्याचा दावा पटेल-तटकरे गटाने केला असला, तरी जुन्या निष्ठावंतांना बाजूला सारले जात असल्याचा सूर पक्षात आहे. दुसरीकडे, पार्थ पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळत, या बातम्यांना केवळ 'काल्पनिक कथा' म्हटले असून ज्येष्ठ नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या घडामोडींमुळे पक्षांतर्गत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 'रामरक्षा' आंदोलन सुरू केले आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या आंदोलनाचे थेट निमंत्रण दिले आहे. पत्रात राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख "देवेंद्र फडणवीसजी, जय महाराष्ट्र!" असा करत त्यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री स्वतःला 'प्रखर रामभक्त' आणि 'कडवट हिंदुत्ववादी' मानतात, त्यामुळे त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. राम मंदिराच्या चोरी आणि अपहाराबाबत समाजात जागृती आणणे हा या आंदोलनाचा हेतू असून, फडणवीसांनी केवळ आम्हाला सल्ला देण्यापेक्षा राम मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या चोरांवर कडक कारवाई करावी, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 'मतदारसंघ पुनर्रचना विधेयका'वरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. या विधेयकाला शरद पवार यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल आणि ते एनडीएच्या (NDA) बाजूने उभे राहतील, अशा स्वरूपाच्या वृत्तांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांमधील या चर्चांना 'निराधार आणि केवळ तर्क-वितर्कांवर आधारित' असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने अजून कोणतेही अधिकृत विधेयक किंवा मसुदा समोर आणलेला नाही, त्यामुळे त्यावर आधीच भूमिका जाहीर करणे घाईचे ठरेल. जर केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात जागांमध्ये ५०% वाढ करण्याचा लेखी फॉर्म्युला दिला, तर त्यावर विचार केला जाऊ शकतो; परंतु कोणताही अंतिम निर्णय हा पक्षांतर्गत आणि 'इंडिया' (INDIA) आघाडीतील मित्रपक्षांशी सविस्तर चर्चा करूनच घेतला जाईल. एनडीएमध्ये सामील होण्याच्या अफवा फेटाळत त्यांनी पक्ष एकसंध असल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ शरद पवार 100 % एनडीए मध्ये जाणार आहेत कारण पवार जे बोलतात त्याच्या उलटच काम करतात असा आजवरचा अनुभव आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

समृद्धी महामार्गावर टोल चुकवून गाड्या घुसवण्यासाठी बनवण्यात आलेला अनधिकृत रस्ता पत्रकार नितीन थोरात यांनी समोर आणला, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. हा केवळ महसूल बुडण्याचा प्रश्न नसून, महामार्गाच्या सुरक्षा आणि संरक्षणाचा अत्यंत गंभीर विषय आहे. टोल नाक्यावरील ट्रेसिंग टाळण्यासाठी चोर, दरोडेखोर आणि डिझेल चोरांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अशा पळवाटांचा वापर करून रात्रीच्या वेळी कुटुंबांना टार्गेट करतात आणि लुटून पसार होतात. अशा अनधिकृत एंट्री-एक्झिटमुळे उद्या मोठा अपघात करून कोणीही गायब होऊ शकतो, हे अंध समर्थन करणाऱ्यांच्या डोक्याबाहेरचे आहे. जे लोक या महत्त्वाच्या वार्तांकनाला नावे ठेवत आहेत, तेच उद्या लूटमार किंवा अपघात झाल्यावर यंत्रणेवर खापर फोडतात. अशा ठिकाणांमुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळते, हे न समजणारे बातमीमागचा खरा सुरक्षिततेचा अँगल कधीच समजून घेऊ शकत नाहीत, हीच मोठी शोकांतिका आहे.

🔽


 
 
 
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page