आंदोलन ‘मॅनेज’ करण्याचा पाच कलमी फॉर्म्युला! ...
- dhadakkamgarunion0
- 18 hours ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
आंदोलन ‘मॅनेज’ करण्याचा पाच कलमी फॉर्म्युला! जनतेच्या जिव्हाळ्याचा एखादा प्रश्न थेट विरोध करून संपवता येत नसेल, तर आंदोलनच ‘हायजॅक’ करण्याचा खेळ सुरू होतो. पहिली पायरी—लोकांच्या मागणीला जोरदार पाठिंबा द्या; वृद्ध, लहान मुले, सामान्य नागरिकांची उदाहरणे देऊन विश्वास मिळवा. दुसरी—मूळ प्रश्न उचलणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला हळूहळू बाजूला सारून आंदोलनाचे नेतृत्व स्वतःकडे घ्या. तिसरी—‘आता हे नेते बघून घेतील, आपण फक्त गर्दी करायची’ अशी जनतेची मानसिकता तयार करा. चौथी—मूळ प्रश्नावरचा फोकस हटवून दुय्यम, किरकोळ मुद्द्यांवर चर्चा सुरू करा. मग पडद्याआड तडजोड करा आणि ‘सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित’ अशी घोषणा ठोकून मोकळे व्हा. जनता समजते प्रश्न सुटला; प्रत्यक्षात मूळ समस्या तशीच राहते. आंदोलन संपते, नेते समाधानी होतात आणि ज्यांच्या त्रासासाठी आंदोलन उभे राहिले होते ती जनता पुन्हा एकदा—बसा बोंबलत!
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
भारत हिंदूबहुल आहे याचा अभिमान आपण वारंवार व्यक्त करतो; मग या देशाचे पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक स्वास्थ्य जपण्याची मोठी जबाबदारीही आपलीच आहे, हे स्वीकारायला हवे. अल्पसंख्याक समाजातील चुकीच्या प्रथांना विरोध जरूर करा; पण त्यांच्या चुकीला उत्तर म्हणून आपणही चुकीचेच वागणार असू, तर नुकसान भारताचेच होणार आहे. बकरी ईदच्या पशुहत्येला प्रत्युत्तर म्हणून रक्ताचे पाट वाहवणे किंवा धार्मिक उत्सवांच्या नावाखाली कानठळ्या बसवणारे डीजे वाजवणे यात धर्मरक्षण कुठे आहे? घरातील ऐंशी वर्षांच्या वृद्धापासून ऐंशी दिवसांच्या बाळापर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याचा विचार व्हायला हवा. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि असंख्य मिरवणुका श्रद्धेचे उत्सव राहावेत, ध्वनी-प्रदूषणाचे नव्हे. धर्म जर समाजाला आनंदाऐवजी त्रास देऊ लागला, तर उद्याची पिढी धर्माभिमानी होण्याऐवजी नास्तिक झाली तर त्यासाठी दोष कुणाला देणार?
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
विद्यार्थ्याला इतर मुलांकडून थोबाडीत मारायला लावणे ही शिक्षेची पद्धत चुकीचीच; पण उत्तर प्रदेशातील एका घटनेला धार्मिक रंग देऊन संपूर्ण राज्याची वैचारिक पातळी ठरवणेही तितकेच चुकीचे. मग हाच निकष महाराष्ट्रातील शाळांना का लावू नये? काही शाळांमध्ये मराठी बोलल्याबद्दल शिक्षा, हिंदू सण-परंपरांबाबत अनास्था किंवा निर्बंध असल्याच्या तक्रारी येतात; तर काही शिक्षकांच्या सोशल मीडिया पोस्टमधून उघड जातीय किंवा राजकीय पूर्वग्रहही दिसतात. शाळा कोणत्याही एका राजकीय, जातीय किंवा वैचारिक गटाच्या प्रचाराचे मैदान बनता कामा नयेत. महर्षी कर्वे, आगरकर, सावरकर, चापेकर बंधूंपासून भगतसिंगांपर्यंत सर्वच विचारप्रवाहांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर निष्पक्षपणे यायला हवा. उत्तर प्रदेशातील एका शाळेतील चुकीवर प्रश्न जरूर विचारा; पण महाराष्ट्रातील शाळांमधील संभाव्य छुप्या जातीयवादाकडेही त्याच कठोर नजरेने पाहा. न्यायाचा निकष प्रदेश आणि राजकीय सोय पाहून बदलता कामा नये.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
उद्योगविश्वात आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक दुर्दैवी! एस्सेल समूहाचे सुभाष चंद्रा आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यात सुरू झालेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका भारतीय उद्योगविश्वासाठी निश्चितच खेदजनक आहे. चंद्रा यांनी आपल्या NCLT प्रकरणाच्या वृत्तांकनावरून रिलायन्सशी संबंधित माध्यमांवर जाणीवपूर्वक अपप्रचाराचा आरोप केला, तसेच 2019 मधील काही घटनांबाबतही अंबानींवर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे रिलायन्सने हे आरोप पूर्णतः निराधार असल्याचे सांगत स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. त्यामुळे सध्या कोणाचा दावा सत्य आहे याचा निकाल सोशल मीडिया किंवा माध्यमांनी देणे योग्य ठरणार नाही. देशातील दोन दिग्गज उद्योगसमूहांतील व्यावसायिक मतभेद पुरावे, नियामक संस्था आणि न्यायालयीन प्रक्रियेतून सोडवले जाणे अपेक्षित आहे. उद्योगपतींनी व्यक्तिगत आरोपांची चिखलफेक सुरू केली तर त्यातून केवळ संबंधित व्यक्तींचीच नव्हे, तर भारतीय कॉर्पोरेट व्यवस्थेची विश्वासार्हताही धोक्यात येते. स्पर्धा उद्योगात हवी; सार्वजनिक आखाड्यात नव्हे!
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
हिज हायनेस लॉर्ड गडकरी यांच्या दिव्य इथेनॉल धोरणाचा अजून एक परिणाम म्हणून अंड्याच्या किंमती वर्षभरात ३५-४०% वाढल्या अशी बातमी वाचली. पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे खाद्य म्हणून वापरला जाणारा मका (Maize) इथेनॉलकडे वळवल्यामुळे पोल्ट्री फीडच्या पुरवठा साखळीवर ताण पडला आणि त्यामुळे इनपुट कॉस्ट वाढून परिणामतः खायच्या अंड्यांचे दर वाढले अशी ही एकंदर बातमी आहे... इथेनॉल धोरण किती वाईट आणि धोकादायक आहे याबद्दल याआधी अनेकदा लिहिलं आहेच. पण अशा विकृत धोरणाचे परिणाम भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये किती अनपेक्षितपणे होऊ शकतात याचं उदाहरण म्हणून हा अंड्याचा विषय बघता येईल! लॉर्ड गडकरींसारख्या तुघलकी लोकांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था का द्यायची नाही हे आता किमान अंडी खाणाऱ्यांना तरी समजेल अशी अपेक्षा आहे!!
🔽
#AbhijeetRane #MumbaiMitra #Maharashtra #PublicIssues #SocialJustice #NoisePollution #Education #SchoolSafety #CorporateIndia #BusinessNews #EsselGroup #Reliance #EthanolPolicy #EggPrices #Agriculture #IndiaNews #PublicAwareness #Accountability








Comments