top of page

मुंबईच्या विकासात सामान्य माणूस कुठे आहे?...

  • dhadakkamgarunion0
  • 7 minutes ago
  • 3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

मुंबईच्या विकासात सामान्य माणूस कुठे आहे? मुंबईच्या कोस्टल रोडवर हजारो कोटी खर्च होतात; पण रोज लोकलच्या दरवाजात जीव मुठीत धरून लटकणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अजूनही स्वप्नच आहे. विकासाच्या प्राधान्यक्रमात सामान्य मुंबईकर नेमका कुठे आहे? मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि दरवर्षी रेल्वे अपघातांत अनेक जीव जातात. नवीन लोकल गाड्या येणार असल्या तरी त्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोस्टल रोड आवश्यक नाही, असा मुद्दा नाही; रस्तेही हवेत आणि आधुनिक पायाभूत सुविधाही हव्यात. पण ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर कोट्यवधी प्रवास अवलंबून आहेत, तिची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य असायला नको का? ‘वंदे भारत’ ही प्रगतीची खूण असेल; पण लोकलच्या दरवाजात लटकणारा मुंबईकर हेही भारताचेच वास्तव आहे!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

एका निर्णयाने वाचले १,६४३ विद्यार्थ्यांचे प्राण! नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशुली खोऱ्यात आलेल्या विनाशकारी पुरात त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांचे प्रसंगावधान तब्बल १,६४३ विद्यार्थ्यांसाठी जीवनदायी ठरले. पुराचा इशारा देणारा फोन येताच त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. शाळेची घंटा वाजवून विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीने वर्ग सोडून डोंगराच्या दिशेने धावण्याचे आदेश दिले. शाळेकडे येणाऱ्या बसेसही तत्काळ माघारी फिरवल्या. सर्व विद्यार्थी सुरक्षित उंच ठिकाणी पोहोचल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पुराच्या रौद्र प्रवाहाने शाळेची तीन मजली इमारत वाहून नेली. दुर्दैवाने दोन कर्मचाऱ्यांचा जीव वाचू शकला नाही. मात्र संकटसमयी नियमपुस्तकापेक्षा निर्णयक्षमता, प्रसंगावधान आणि प्रत्येक सेकंदाचे महत्त्व किती मोठे असते, हे दवाडी यांनी दाखवून दिले. एका मुख्याध्यापकाचा एक योग्य निर्णय—आणि १,६४३ कुटुंबांचे भविष्य वाचले!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

प्रमाणपत्राचा अट्टहास कशासाठी? एखाद्या पत्रकाराच्या कुटुंबातील निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त करणे ही सामान्य मानवी संवेदनशीलता आहे; त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. प्रश्न वेगळाच आहे. भाजपा आणि संघ परिवाराला सतत आपल्या वैचारिक विरोधकांकडूनच ‘सर्वसमावेशकतेचे प्रमाणपत्र’ मिळवण्याची गरज का वाटते? २०१४ नंतर अनेक पत्रकार आणि बुद्धिजीवी अचानक सरकारसमर्थक झाले म्हणून त्यांचे व्यक्तिगत विचारही बदललेच, असे मानण्याचे कारण नाही. तरीही अशा व्यक्तींना विशेष महत्त्व देऊन आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा राजकीय उपयोग किती आणि नुकसान किती, याचा विचार व्हायला हवा. विरोधकांशी संवाद जरूर असावा, व्यक्तिगत संबंधही असावेत; पण त्यांची मान्यता मिळवण्यासाठी आपल्या मूळ समर्थकांच्या भावना सातत्याने दुर्लक्षित करणे शहाणपणाचे नाही. स्वतःच्या भूमिकेवरील विश्वासापेक्षा विरोधकांच्या प्रमाणपत्राची गरज मोठी झाली, तर वैचारिक राजकारण कमकुवत होते.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

जमिनी विकू नका; कोकण विकसित करा! कोकणातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे रोजगारासाठी गाव सोडलेला कोकणी माणूस आता आपल्या वाडवडिलांच्या जमिनीही विकत आहे. गावातील घरे बंद, शाळांतील विद्यार्थी कमी, शेती ओस आणि तरुण मुंबई-पुण्यात संघर्ष करत आहेत. दुसरीकडे कोकणातील जमीन, पर्यटन, मासेमारी, आंबा-काजू, बांधकाम आणि व्यापारातील संधी बाहेरून आलेले उद्योजक ओळखत आहेत. दोष त्यांचा नाही; संधी असूनही तिच्याकडे पाठ फिरवणारे आपणही आत्मपरीक्षण केले पाहिजे. आता महामार्ग, रेल्वे आणि दळणवळण सुधारत असल्याने परिस्थिती बदलण्याची संधी आहे. मुंबई-पुण्यातील अस्तित्व सोडण्याची गरज नाही; पण गावाशी नाते पुन्हा जोडा. जमीन विकण्याऐवजी आंबा, काजू, नारळ, बांबू, मसाले, मत्स्यशेती, पर्यटन आणि अन्नप्रक्रियेत गुंतवणूक करा. कोकण फक्त पूर्वजांची आठवण नाही; तो पुढच्या पिढ्यांची संपत्ती आहे. गावाकडे चला—मालकी विकायला नव्हे, भविष्य घडवायला!

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

ही आहे खरी Gen-Z! ५६ वर्षांच्या बचकाण्या नेत्यामागे घोषणाबाजी करणारी, शिवीगाळ-हुल्लडबाजी करणारी गर्दी म्हणजे Gen-Z नव्हे! खरी Gen-Z पाहायची असेल तर १४ वर्षांच्या सिद्धार्थ नंद्यालाकडे पाहा. आंध्र प्रदेशाशी नाळ असलेल्या आणि अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धार्थने ‘Circadian AI’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. स्मार्टफोनच्या मायक्रोफोनद्वारे अवघ्या सात सेकंदांत हृदयाचे आवाज रेकॉर्ड करून संभाव्य विकारांची प्राथमिक ओळख करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. कमी किमतीचा कृत्रिम हातही त्याने तयार केला आहे. अवघ्या चौदाव्या वर्षी एखादा मुलगा AI वापरून हजारो लोकांचे जीवन अधिक सुरक्षित, आरोग्यसेवा अधिक स्वस्त कशी करता येईल याचा विचार करतोय; आणि दुसरीकडे तरुणांच्या खांद्यावर बसून राजकीय स्वप्ने पाहणारे नेते आहेत! Gen-Z म्हणजे रील्स, शिव्या, गोंधळ आणि फूहडपणा नव्हे; तंत्रज्ञानाचा केवळ वापर न करता त्यातून जग बदलण्याची जिद्द म्हणजे खरी Gen-Z. सिद्धार्थ नंद्याला हे त्याचेच उदाहरण आहे!

🔽



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page