top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Dec 23, 2025
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

खड्डा खणणाऱ्यांचा धडा

“स्वार्थासाठी जो इतरांसाठी खड्डा खणतो, त्याच खड्ड्यात तो स्वतः पडतो” ही म्हण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खरी ठरली आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसाठी खड्डा खणला आणि काँग्रेसला वर काढले. पण काळाचा न्याय वेगळाच असतो—आज तेच खणलेले खड्डे त्यांच्या वाट्याला आले आहेत. जनतेने भावनांवर नव्हे तर परिणामांवर मत दिले आणि भाजप पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. राजकारणात तात्पुरते समीकरणे बदलू शकतात, पण दीर्घकाळ टिकते ते जनतेचा विश्वास आणि कामगिरी. स्वार्थी डावपेच, गुप्त युती आणि जातीवाद यांचा परिणाम शेवटी स्वतःवरच उलटतो. हा निकाल म्हणजे जनतेने दिलेला स्पष्ट संदेश आहे—राजकारणात टिकण्यासाठी खड्डे नव्हे, तर विकासाचे रस्ते खणावे लागतात.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

लिली थॉमस निकाल – लोकशाहीचा आरसा

भारतीय लोकशाहीत कायदा सर्वांसाठी समान आहे हे सिद्ध करणारा दुर्मिळ क्षण म्हणजे लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया निकाल. जनप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम 8(4) आमदार-खासदारांना दोषी ठरूनही पदावर राहण्याची सवलत देत होते. सर्वोच्च न्यायालयाने हे असंवैधानिक ठरवत स्पष्ट संदेश दिला – “कायदेकर्ते कायदा मोडणारे असू शकत नाहीत.” दोषी ठरताच तात्काळ अपात्रता हा निर्णय राजकीय नैतिकतेचा विजय ठरला. लालू यादव, जयललिता, रशीद मसूद यांसारख्या मोठ्या नेत्यांना पद गमवावे लागले. बहुमत, जनाधार किंवा लोकप्रियता यांपुढे कायद्याचे राज्य मोठे ठरले. हा निकाल गुन्हेगारी राजकारणाविरोधातला आदेशच नव्हे तर लोकशाहीच्या आत्म्याचा जाहीरनामा आहे. न्यायपालिका ही शेवटची भिंत आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले. आज गुन्हेगारी राजकारण फोफावत असले तरी कायदा कागदावर नाही, तर प्रत्यक्षात अस्तित्व सिद्ध करतोय—हा लोकशाहीचा खरा आरसा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जनता खरी राजा

गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये असलेले सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित राष्ट्रवादीत गेले, पण प्रत्येकाला विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या गडातही जनतेने त्यांना नाकारले. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर पंडित घराणे स्वतःला ‘राजे’ म्हणवू लागले, गुंडगर्दीची भाषा बोलू लागले, पण शेवटी त्यांनाही कायद्याचा सामना करावा लागला. राजेशाही कधीच संपली आहे, तरीही ‘राजे’ नावाची झूल पांघरून स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आता जनता खरी राजा आहे. ती कोणालाही आपटते, कितीही बिरुदे लावली तरी लाख-दिड लाख मतांच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर आरश्यात स्वतःकडे पाहताना या ‘राजा’ लोकांना सत्य जाणवते. जनतेचा विश्वास, तिचा निर्णय आणि तिचे मत हेच खरे सामर्थ्य आहे. बिरुदे नाही, तर जनतेचा आधारच राजकारणात टिकवतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बीडमध्ये मुंडेंशिवाय समीकरण नाही

बीड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, कितीही जातीवादाचे खेळ झाले, कितीही युती-भेटी झाल्या तरी मुंडेंना वगळून राजकारण करणे अशक्य आहे. दोन्ही मुंडेंनी दिलेला संदेश थेट आणि ठाम आहे—त्यांच्याशिवाय विजयाचा मार्ग नाही. विधानसभा निवडणुकीत मदत घेऊन नंतर जातीवादाचा आधार घेत दगाबाजी करणाऱ्यांना आता जनतेने इशारा दिला आहे. भविष्यातही जर दोन्ही मुंडे एकत्र आले तर जिल्ह्यातील इतर नेत्यांना राजकारणात स्थान मिळणे कठीण होईल. लोकं एकदाच भुलतात, वारंवार नाही, हा धडा जातीवाद्यांना मिळालाच असेल. बीडमध्ये समीकरणे ठरवणारे घटक म्हणजे नेतृत्व, जनाधार आणि विश्वास—आणि हे तिन्ही घटक मुंडेंच्या हातात आहेत. त्यामुळे बीडचे राजकारण त्यांच्या भोवतीच फिरणार, हे या निकालाने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

डिजिटल सीमेवरील आरपारची लढाई

‘ऑपरेशन सायहॉक’ ही दिल्ली पोलिसांची 48 तासांची मोहीम म्हणजे अदृश्य युद्धातील एक मोठा सर्जिकल स्ट्राईक ठरली आहे. पारंपरिक रणांगणापलीकडे आता देशाच्या अंतर्गत सुरक्षेला, अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक स्थैर्याला भेदणाऱ्या सायबर शत्रूंवर निर्णायक कारवाई झाली आहे. 877 जणांना अटक किंवा बाउंड-डाउन, 509 संशयितांना नोटीस, 1000 कोटींपेक्षा अधिक आर्थिक गैरव्यवहारांचे पुरावे, आणि शेकडो डिजिटल उपकरणे जप्त—ही आकडेवारीच या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करते. सायबर फसवणूक, हवाला-क्रिप्टो चॅनेल्स, ड्रग कार्टेल्सचे पेमेंट गेटवे, डीप-फेक प्रोपगंडा अशा गुंतागुंतीच्या जाळ्यांना दिल्ली पोलिसांनी स्पेशल सेल व स्थानिक थाने यांच्या समन्वयाने धडक दिली. इच्छाशक्ती, तंत्रज्ञान आणि समन्वय एकत्र आले की सर्वात गुंतागुंतीचे शत्रूही पराभूत होतात, हे या मोहिमेने सिद्ध केले. डिजिटल सीमेवर भारत सरकारची ही निर्णायक लढाई खरोखरच अभूतपूर्व आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page