top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 12 minutes ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राष्ट्रपती भवनचा फ्री लंच आणि महागडी थाळी

जगात दोनच गोष्टी कधीच फ्री नसतात—सल्ला आणि राष्ट्रपती भवनचा लंच. प्लेट समोर आली तरी तिची किंमत अखेर देशालाच चुकवावी लागते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा निमंत्रणाने हे पुन्हा सिद्ध झाले. लंच गोड होता, पण त्यानंतर सैनिक पाठवा अशी मागणी आली आणि पाकिस्तानचे सेनाप्रमुख असीम मुनीर यांच्या तोंडातला घास अडकला. हो म्हटले तर जनमत संतप्त होईल, नाही म्हटले तर वॉशिंग्टन नाराज होईल आणि IMFची फाइल जाड होईल. ही थाळी साधी नव्हती—एक पोळी सुरक्षा, भाजी कूटनीती आणि मिठाई अनिश्चिततेची. खाताना चवदार, पण नंतर पोट संपूर्ण देशाचे बिघडवणारी. मुनीर यांची अवस्था त्या विद्यार्थ्यासारखी झाली आहे ज्याने मित्राकडे फ्री जेवण केले आणि आता होमवर्क करायला सांगितले. निष्कर्ष स्पष्ट आहे: Complimentary Lunch कधीच मोफत नसतो, त्याची किंमत नेहमी राजकारणात, डॉलरमध्ये किंवा सैनिकांत चुकवावी लागते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

तिळगुळाची गोडी आणि जागांचा कडवटपणा

महाराष्ट्राच्या राजकारणात तिळगुळाची गोडी दाखवून जागांचे वाटप करण्याचा खेळ सुरू आहे. मातोश्रीचे शिपाई शिवतीर्थावर गोड बोल घेऊन जातात, पण खऱ्या जागा खिशातच ठेवतात. "लाडक्या भावाला" भुरळ घालून पडणाऱ्या जागांची खिरापत वाटली जातेय. भेंडी बाजार, महमद अली रोड, मालवणी, बेहराम पाडा या ठिकाणी दोन्ही गटांना समान जागा हव्या आहेत, त्यामुळे चर्चेचे सत्रं अडकले आहे. कार्यकर्त्यांना पहिली सभा कुठे होणार याची उत्सुकता आहे, पण इंजिन मुंब्रा की महमद अली रोड यावरच थांबले आहे. हरायचेच आहे तर कोण कुठल्या जागेवर लढणार यावर भांडणं करून काय साध्य होणार? उधोनी शिवसेनेची विचारधारा विकली, पेंटरनीही तेच केले. दोघे भाऊ सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत, पण जनतेला या गोड बोलांच्या मागे कडवट वास्तवच जाणवते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बांगलादेशातील हिंसाचार आणि भारताची जबाबदारी

बांगलादेशात हिंदू कामगारावर झालेला अमानुष हल्ला आणि त्यानंतरची क्रूर हत्या ही मानवी हक्कांची घोर पायमल्ली आहे. पोलिसांनी जमावाच्या दबावाखाली आरोपीला त्यांच्या स्वाधीन करणे हे प्रशासनाच्या पूर्ण अपयशाचे द्योतक आहे. अशा घटना केवळ धार्मिक द्वेष नव्हे तर राज्यसंस्थेच्या कमकुवतपणाचेही दर्शन घडवतात. भारतासाठी हा गंभीर इशारा आहे—कारण सीमेजवळील अस्थिरता थेट आपल्या सुरक्षेला धोका निर्माण करते. संयम आवश्यक आहे, पण त्याचबरोबर कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनांचा निषेध नोंदवून बांगलादेश सरकारला जबाबदार धरणे गरजेचे आहे. शक्तीप्रदर्शन हा पर्याय असला तरी दीर्घकालीन उपाय म्हणजे हिंदूंच्या सुरक्षेसाठी ठोस हमी आणि सीमावर्ती धोरणांची काटेकोर अंमलबजावणी. अन्यथा भविष्यातील संकट अधिक तीव्र होईल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाविकास आघाडीची घसरलेली ताकद

नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फक्त ५० जागा मिळाल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनीही त्याच वास्तवाची पुनरावृत्ती केली आहे. नगराध्यक्षांच्या २८८ जागांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.) आणि शिवसेना (उबाठा) गट मिळून अवघ्या ४९-५० जागा जिंकू शकले, तर भाजपने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली. नगरसेवकांच्या ५१३३ निकालांपैकी महाविकास आघाडीला फक्त ६६२ जागा मिळाल्या, म्हणजे १२.८९% इतकीच कामगिरी. हे आकडे पाहता १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या २९ मनपांच्या निवडणुकीत आघाडीची स्थिती फार वेगळी असेल असे वाटत नाही. मुंबई व ठाणे मनपा जिंकण्याची उबाठा गटाची महत्त्वाकांक्षा वास्तवात कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका निर्माण झाली आहे. खरी परीक्षा १६ जानेवारीला होणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

विनाशकाले विपरीत बुद्धी

२०१९ मध्ये उबाठांनी पाठीत खंजीर खुपसला नसता तर महाराष्ट्राची राजकीय दिशा आज पूर्णपणे वेगळी असती. भाजप आज राज्यातील क्रमांक दोनचा पक्ष ठरला असता, देवेंद्र फडणवीस तिसऱ्या टर्मसाठी मुख्यमंत्रीपदावर असते, आणि काँग्रेस विरोधक म्हणून जवळजवळ नामशेष झाली असती. मुंबई मनपा भाजपच्या ताब्यात असती आणि तिकीट वाटपाचा राजकीय मलिदा वेगळ्याच पातळीवर गेला असता. पण चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली, तर स्वतःचे अस्तित्व शून्याच्या जवळ गेले. हीच खरी राजकीय शोकांतिका आहे—ज्यांनी स्वतःच्या महत्वाकांक्षेतून धोका पत्करला त्यांनीच आपले भविष्य गमावले. महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रसंग एक धडा आहे: संधी गमावली की सत्ता हातातून निसटते. विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण इथे अक्षरशः खरी ठरली आहे.

🔽


ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page