top of page

महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

  • dhadakkamgarunion0
  • Apr 6
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस खच्ची झाली, एमआयएम व वंचित मर्यादित ताकदीत आहेत. अशा वेळी रोहित पवार हा तरुण मराठा चेहरा सर्वसमावेशक धोरण अवलंबून जर नीट खेळला तर पुढील चार-पाच वर्षांत देशभर गाजेल असा नेता होऊ शकतो. सुप्रिया सुळेवर त्याने केलेला दणका हा मुद्दाम होता, कारण त्याच्या वाटेत तीच काटा आहे. रोहितने सोशल मिडिया सोडून जमिनीवर संघटना बांधली, सुजात आंबेडकर, एमआयएम, बामसेफ यांची मोट बांधली तर शरद पवारांचा कट्टर भाजप विरोधी वर्ग त्याला साथ देईल. अंबानी-अदानी संबंधांचा वापर डोक्याने केला तर विरोधक म्हणून स्थापित होण्याची संधी आहे. संयम राखून मेहनत करणारा नेता महाराष्ट्रातील विस्कळीत विरोधकांना एकत्र आणू शकतो, आणि रोहितकडे ती क्षमता आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

खरातचा CDR बाहेर येणे ही घटना म्हणजे राजकीय भूकंपच ठरली. मुळात CDR असा बाहेर येणे हेच बेकायदेशीर असले तरी ज्यांची नावे मुद्दाम बाहेर आणली त्यांना पलटवार करता येणार नाही याची खात्री होती. त्यामुळेच हा खेळ रचला गेला. खरात प्रकरण हे २०-२२ वर्षांपासून उघड सत्य असूनही कुणाला काही पडले नव्हते. कायद्याची तलवार फार मोठी नाही, कारण सगळे सज्ञान आहेत, सहमतीने कारभार आहे. जास्तीत जास्त अंधश्रद्धा कायदा लागू होईल. मग आताच हा विषय बाहेर का आला? एका बायकोची सूड भावना शांत झाली, हेलिकॉप्टर अपघातावर वावटळ उठवणारे गार झाले, निवडणूक आयोगाला पत्र पाठवणाऱ्यांचे संशय थंडावले, पुतळे बसवणारे सहमतीची भाषा बोलू लागले. म्हणजेच CDR बाहेर काढून निर्वाणीचा इशारा देण्यात आला—कायद्यात रहा, फायद्यात रहा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

२०१४ मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर बीड लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती, पण शरद पवारांनी उमेदवार न देण्याची घोषणा करून पडद्याआड काँग्रेसला उमेदवार उभा करायला लावला. अगदी तसाच खेळ २०२६ मध्ये अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत दिसतो आहे. पवारांनी पुन्हा उमेदवार न देण्याची घोषणा केली, पण काँग्रेसला उमेदवार शोधायला लावले. फरक एवढाच की २०१४ मध्ये विरोधकांचा वारसदार होता, तर आता स्वकीय सुनेत्रा पवार आहेत. मात्र राहुरीत शिवाजी कर्डीले यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी देताना पवारांचा पक्ष स्पर्धेत उतरतो. त्यामुळे जनभावनेचा आदर निवडक ठिकाणीच केला जातो. श्रद्धांजलीच्या नावाखाली निवडणूक बिनविरोध करण्याचे ढोंग आणि पडद्याआड सोंगट्या फिरवणे हेच पवार घराण्याचे राजकारण ठरते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पाकिस्तानच्या आर्थिक संकटाने आता नवा टप्पा गाठला आहे. संयुक्त अरब अमिरातीने ३.५ बिलियन डॉलर्स परत मागितल्याने इस्लामाबादमध्ये खळबळ उडाली आहे. देशाकडे सध्या फक्त १६.५ बिलियन डॉलर्स राखीव असून त्यातील मोठा हिस्सा उधारीचा आहे. या परतफेडीच्या दबावामुळे सैन्यप्रमुख असिम मुनीर स्वतः आर्थिक चर्चेत उतरले, हे पाकिस्तानच्या विचित्र वास्तवाचे दर्शन आहे. त्यांनी सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊन नवे कर्ज मागितले, पण उलट जुने सहा बिलियन डॉलर्स परत मागण्यात आले. या घडामोडी पाकिस्तानच्या परराष्ट्र व आर्थिक धोरणातील अस्थिरता उघड करतात. मित्रदेशांचा विश्वास कमी होत चालला आहे आणि सैन्याची थेट हस्तक्षेपाची गरज भासते आहे. पाकिस्तानसाठी ही परिस्थिती केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय अस्तित्वाची कसोटी ठरू शकते.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमेरिकेने कासिम सुलेमानी यांच्या भाची हमीदेह सुलेमानीसह तिच्या कुटुंबातील पाच इराणी नागरिकांचे ग्रीन कार्ड रद्द करून अटक केली आहे आणि त्यांना आर्मेनियामार्गे इराणला डिपोर्ट करण्याची तयारी सुरू आहे. ओबामा यांच्या काळात तिला आश्रय मिळाला होता, पण नंतर तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये अमेरिकन विमान पाडल्यावर आनंद व्यक्त केल्याचे आढळले. अमेरिकन पायलट इराणच्या हाती लागावा अशी तिची इच्छा व्यक्त झाल्याने सरकारने कठोर कारवाई केली. अमेरिकेत देशाविरुद्ध बोलणे सहन केले जात नाही, म्हणूनच परराष्ट्रमंत्री व उपराष्ट्राध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्ट केले की युद्धात अमेरिकेची थट्टा करणाऱ्यांना मूळ देशात परत पाठवले जाईल. भारतात बोलण्याचे स्वातंत्र्य जास्त आहे, पण अमेरिकेत राष्ट्रीय सुरक्षेला धक्का देणारे वक्तव्य थेट शिक्षा ठरते.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page