प्रकाश सोळंके आणि सुरेश धस यांचं राजकारण...
- dhadakkamgarunion0
- Jun 16
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
प्रकाश सोळंके आणि सुरेश धस यांचं राजकारण म्हणजे पाय धरून उठणं-बसणं आणि छाती काढून डरकाळ्या फोडणं. भाजपकडून आमदारकी मिळवून नंतर शरद पवारांच्या पायाशी गेले, पण गोपीनाथ मुंडेंनी त्यांना पराभवाची चव चाखवली. सत्ता दिसली की भाजपमध्ये उडी, बंड दिसलं की पवारांना दगा—अशी त्यांची परंपरा. पंकजा मुंडेंच्या वर्चस्वामुळे आमदारकी मिळाली, पण त्याच मराठा समाजाला डावलून अपप्रचार केला. ऊसतोड मजुरांपासून धनंजय देशमुखापर्यंत अनेक प्रयोग केले, पण समाजाने त्यांना नाकारलं. भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना त्रास देणं, जातीवादाचं अस्त्र वापरणं आणि वारसाला लॉलीपॉप देणं—यातच त्यांचं राजकारण अडकलेलं आहे. म्हणूनच इतकी वर्षे खेळ करूनही या दोघांना कधीही कॅबिनेट मंत्रीपदाचा गुलाल लागलेला नाही. असे कोलांट्या उड्या मारणारे आणि जातीच्या कार्डावर निवडून येणारे राजकीय नेते गल्लोगल्ली झाले आहेत आणि अश्या सगळ्या हौश्या नवश्या गवश्या नेत्यांना एकत्र करून जनाधार वाढवण्याचे स्वप्न भाजपा बघत आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने सत्ता मिळवल्यानंतर नागरिकांवर करांचा बोजा टाकण्याची मालिका सुरू झाली आहे. पहिला झटका म्हणजे सोसायटींनी स्वतःच ओला कचरा कंपोस्टिंग करून विल्हेवाट लावायचा, ज्यासाठी लाखो रुपये खर्चून मशिन्स घ्याव्या लागतील. दुसरा झटका म्हणजे सोसायटीतील अमेनिटीज, गार्डन्स, पार्किंगवर प्रॉपर्टी टॅक्स लावण्याचा निर्णय. महापालिका पाणीपुरवठ्याशिवाय कोणतीही सुविधा देत नाही, तरीही नागरिकांना वार्षिक लाखो रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. पुण्यातील फ्लॅटधारकांनाही या निर्णयाची धास्ती वाटू लागली आहे. आधीच खड्डेयुक्त रस्ते, वाहतूक कोंडी, टँकरवर अवलंबून पाणी आणि अतिक्रमणांचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांवर आणखी कर लादला तर भाजपचे मतदार दबून जातील. करदात्यांना सुविधा न देता करांचा ओझा वाढवणे हे अन्यायकारक आहे. पुण्यातील नागरिकांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
गिरीश महाजन यांनी कापूस शेतकऱ्यांसाठी केलेले ११ दिवसांचे उपोषण हे त्यांच्या स्वयंभू नेतृत्वाचे प्रतीक होते. संसदेत सुषमा स्वराज यांनी त्यांचा उल्लेख केला, पण राज्य सरकारने दखल घेतली नाही. देवकर मंत्री असूनही आंदोलनाला भेट दिली नाही, कारण अजित पवारांनी त्यांना रोखले होते. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या, तेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते. शेतकऱ्यांविषयी सरकारचा हा कठोर दृष्टिकोन होता. काल पंढरपुरात रोहित पवारांच्या पोटआराम आंदोलनात महाजनांनी हे जुने प्रसंग आठवले. रोहित पवारांना मात्र मंत्र्यांनी भेट दिली, आश्वासन दिले आणि आंदोलन संपले. महाजनांच्या उपोषणाला दुर्लक्ष, तर रोहित पवारांच्या आंदोलनाला प्रतिसाद—यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण कसे बदलते हे स्पष्ट होते.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
तृणमूल काँग्रेस मधून फुटून बाहेर पडलेल्या २० खासदारांनी महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या फुटीर आमदारांनी ज्याप्रमाणे आम्हीच खरी शिवसेना आणि आम्हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असा मूळ पक्षाबरोबर जो संघर्षाचा पवित्रा घेतला होता तो घेणे हुशारीने टाळले आहे. ते सारे २०च्या २० खासदार टीएमसी मधून बाहेर पडले आहेत आणि आता त्या सर्वांनी त्यांचा हा बंडखोर गट NCPI नावाच्या एका २०२३ साली स्थापन झालेल्या राजकीय पक्षात विलीन केला आहे.या पक्षाचे पूर्ण नाव नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया असे असून प.बंगालच्या हावडा जिल्ह्यातील संकरेल नावाच्या गावात त्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे अशी माहिती गुगलवर मिळाली.या NCPI चे थोडे अस्तित्व आसाम आणि त्रिपुरा राज्यांत असून तो पक्ष सुरुवातीपासूनच एन डी ए मध्ये असल्याने त्या पक्षात आपल्या गटाचे विलीनीकरण करणाऱ्या या २० खासदारांना एन डी ए ला पाठिंबा देण्यात आता पहिल्या दिवसापासूनच कोणतीही अडचण येऊ नये.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
१९८९ साली शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्याने महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांना वाढीसाठी मोठी जागा मिळाली आणि शिवसेनेने त्याचा फायदा घेतला, असे जय महाराष्ट्र वाहिनीवरील प्रसाद काथे यांनी सांगितले. आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला उबाठा पक्षाचे संजय राऊत समर्थन देत आहेत, कारण त्यांना वाटते की त्यामुळे मजबूत विरोधक उभा राहील आणि प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बातमीचे स्वागत करत सांगितले की असे झाले तर भाजपसाठी मोठी राजकीय जागा मोकळी होईल. त्यामुळे काँग्रेस-राकाॅंशप विलीनीकरणाने शिवसेना, उबाठा आणि भाजप या तिन्ही पक्षांना पक्षवाढीची संधी मिळेल, पण त्यात सर्वाधिक यशस्वी कोण ठरेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
🔽#MaharashtraPolitics #BJP #PoliticalAnalysis #PoliticalOpportunism #MarathaPolitics #PimpriChinchwad #PCMC #PropertyTax #WasteManagement #Composting #CottonFarmers #AgriculturePolicy #FarmersRights #TMC #OppositionPolitics #PoliticalMerger #RegionalParties #ShivSena









Comments