🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 5 days ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उसने अवसान, निश्चित पराभव
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे उसणं अवसान आणि भावनिक विधानं हे त्यांच्या दारुण पराभवाची पूर्वसूचना वाटते. "लाव रे तो व्हिडिओ" म्हणणं, मॅच फिक्सिंगचा आरोप, आणि मराठी मतदारांवर दोष टाकणं — हे सर्व पराभवाची मानसिक तयारी आहे. उद्धव ठाकरे ठेवी कमी झाल्याची तक्रार करतात, पण कालपर्यंत सत्ता त्यांच्या हातीच होती. राज्य आणि केंद्र शासनाने दिलेल्या निधीतून मुंबईत गेल्या काही वर्षांत जो विकास झाला, तो मुंबईकरांना स्पष्ट दिसतो. मागील तीन दशकांत न झालेला विकास आज प्रत्यक्षात जाणवतो. त्यामुळे ठाकरे बंधूंचा पराभव ही काळ्या दगडावर कोरलेली रेष आहे. जनतेने भावनांपेक्षा वास्तव पाहिलं आहे. आणि जेव्हा नेता स्वतःच पराभवाची खात्री बाळगतो, तेव्हा त्याचं नेतृत्व संपल्याचं मानावं लागतं.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संपत्तीचा विस्फोट, पारदर्शकतेचा अभाव
राष्ट्रवादीच्या उमेदवार सीमा सावळे यांच्या संपत्तीत सहा वर्षांत तब्बल ४३०० पट वाढ झाली, ही बाब केवळ धक्कादायक नाही तर लोकशाहीच्या विश्वासाला हादरा देणारी आहे. इंद्रायणीनगर-बालाजीनगरमधील नागरिकांचा संताप योग्यच आहे—कारण प्रश्न आहे उत्पन्नाच्या स्रोतांचा, पारदर्शकतेचा आणि नैतिकतेचा. एका लोकप्रतिनिधीची संपत्ती इतक्या झपाट्याने वाढते, आणि त्यावर स्पष्टीकरण नाही, तर जनतेच्या मनात संशय निर्माण होणारच. ही वाढ राजकीय सत्तेचा गैरवापर, भ्रष्ट यंत्रणा आणि जनतेपासून तुटलेली व्यवस्था दर्शवते. निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी पैसा आणि प्रभाव यांचा खेळ सुरू आहे, आणि सामान्य मतदार फक्त प्रेक्षक बनतो. पारदर्शकतेचा अभाव म्हणजे लोकशाहीचा अपमान. ही संपत्ती जनतेच्या विश्वासावर उभी आहे की सत्तेच्या सौद्यावर—हा प्रश्न आता टाळता येणार नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राठोड पर्वाचा शेवट
नगरच्या राजकारणात शिवसेनेचे ‘राठोड पर्व’ संपले. स्व. अनिल राठोड यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या थेट घोषणेतून उमेदवारी मिळवली आणि सलग पाच वेळा नगरचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या आक्रमक शैलीने शिवसेनेला नगरमध्ये जनाधार दिला. पण काळ बदलला, पराभव आले आणि कोविडकाळात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर मुलगा विक्रम राठोड यांनी पक्ष टिकवण्याचा प्रयत्न केला, फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. मात्र उपेक्षेच्या आरोपांमुळे अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ज्यांनी नगरमध्ये शिवसेना रुजवली, त्यांचा वारसा आज दुसऱ्या गटात गेला. हे केवळ एका नेत्याचे स्थलांतर नाही, तर शिवसेनेतील जुन्या परंपरेचा शेवट आहे. राठोड पर्व संपले, आणि नगरच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहिले.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
स्वप्नांच्या पलीकडचे राजकारण
ठाकरे बंधुंच्या मुलाखतीतील विनोदी संवादाने राजकीय वास्तव आणि महत्त्वाकांक्षा यातील तफावत अधोरेखित केली. संजय राऊत यांनी राज्यातील सत्ता सुचवली असता उद्धव ठाकरे यांनी देशाच्या सत्तेची आकांक्षा व्यक्त केली. मात्र महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत, विशेषतः मुंबई मनपेत, त्यांची सत्ता परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. शिवाय उबाठा सेना व मनसे एकत्र आले तरी उरलेल्या २८ मनपांपैकी एखादी जिंकतील का याबद्दलही शंका आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सत्तेची स्वप्ने ही वास्तवापासून दूर जाणारी कल्पना वाटते. हे राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण म्हणायचे की स्वतःबद्दलच्या शेख मोहम्मदी कल्पना, हा प्रश्न उभा राहतो. जनतेला हसू येते, पण त्यामागे महाराष्ट्राच्या राजकारणातील गंभीर वास्तव दडलेले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आतून झिजणारी सत्ता
महाराष्ट्रात भाजप हरतोय असं वाटत नाही, पण पक्ष आतून झिजतोय हे स्पष्ट दिसतं. बाहेरून हरलेली सत्ता पुन्हा उभी राहते, पण आतून कुजलेली सत्ता स्वतःच कोसळते. आजची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अपराजेय असल्याचा भ्रम. निर्णयप्रक्रिया काही बंगल्यांपुरती मर्यादित झाली आहे, स्थानिक नेतृत्व बाजूला सारले गेले आहे आणि कार्यकर्त्याशी संवाद संपला आहे. गप्प कार्यकर्ता म्हणजे निवडणुकीत निष्क्रिय मृतदेह. महाराष्ट्रात नेता जनतेने स्वीकारावा लागतो, तो थोपवता येत नाही. सत्ता टिकवण्यासाठी विचार हवा, पण पक्ष सत्ता आहे म्हणून लोक आहेत या गैरसमजावर जगतोय. आत्मपरीक्षण टाळणं ही पराभवाची पूर्वतयारी आहे. पानिपताचा इतिहास सांगतो, शौर्य असूनही वास्तव नाकारलं तर पराभव निश्चित होतो. बदल केला नाही तर भाजपचा पराभव बाहेरून नाही, आतूनच उगवेल
#AbhijeetRane #UddhavThackeray #RajThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #NiteshRane #MumbaiPolitics #BMCelections #MaharashtraPolitics #ShivSena #BJP #MNS
🔽












Comments