top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Sep 21
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सुसंस्कृत फडणवीस! राजकारणात वाद, टोलेबाजी आणि तिखट भाष्य हे नित्याचेच; पण संयमाने, सुसंस्कृततेने प्रसंग हाताळण्याचे कौशल्य फार थोड्या नेत्यांकडे असते. पडळकर यांचे वक्तव्य चर्चेत आले, त्यावरून पवारांचा फोन गेला, आणि वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करून पडळकरांना कानपिचक्या दिल्या, भाषेची शालीनता राखण्याचे स्पष्ट निर्देश दिले. स्वतःवर, पक्षावर टीका झाली तरीही वैयक्तिक टोमण्यांपासून दूर राहावे, हे त्यांनी आपल्या सहकाऱ्याला शिकवले. याला म्हणतात सुसंस्कृत राजकारण! वैचारिक लढाई हवी, पण ती नेहमी सभ्य शब्दांत असावी, हा फडणवीसांचा संदेश आहे. त्यांच्या या शैलीमुळेच ते केवळ युतीतले नेता नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला उन्नत करणारे मार्गदर्शक ठरतात.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमेरिकेतल्या एच-१ब व्हिसा धोरणावरून एलोन मस्क आणि ट्रंप समर्थकांमध्ये तुफान वाद पेटला आहे. ट्रंप यांनी या व्हिसावर तब्बल १ लाख डॉलर वार्षिक शुल्क लावण्याचा निर्णय घेतला, ज्याचा थेट फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसेल. त्यावर मस्कने संताप व्यक्त करत, “मी आणि माझ्यासारख्या हजारो लोकांनी स्पेस एक्स , टेस्ला उभारून अमेरिका बलवान केली, कारण एच-१ब होता. या विषयावर युद्ध करण्यास मी तयार आहे,” असे जाहीर केले. त्यांची भाषा जरी तीव्र असली तरी मुद्दा सार्थ आहे. कारण अमेरिकेतील नवकल्पना आणि स्टार्टअप्सचा कणा परदेशी प्रतिभावान तरुणांवर उभा आहे. ट्रंप यांची कठोरता स्थानिक राजकारणासाठी लाभदायी ठरेल कदाचित, पण जागतिक तंत्रज्ञानक्षेत्राला मात्र धक्का देणारी आहे. मस्कच्या या प्रतिक्रियेमुळे अमेरिकेतील व्हिसा वाद अधिक तीव्र होणार, हे निश्चित.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राहुल गांधींची दुसरी प्रेस कॉन्फरन्स रंगलीच. सुट्टीतून परतल्यामुळे की काय, ते फ्रेश दिसत होते. पोचायला उशीर झाल्याने कॉर्पोरेट स्टाईलने सॉरी म्हणाले, चौकशी केली – जणू कुठल्या बहुराष्ट्रीय कंपनीचे सी ई ओ ! सुरुवातीलाच ज्ञानेश कुमारांचा फोटो बघून मला बेसूर गायक आठवला; मी संगीत कार्यक्रम टाळायला हवेत. निवडणूक आयोगावर आरोप ठोकताना राहुलजींनी पहाटे चारला भरलेले ऑनलाइन फॉर्मही दाखवले. मलाही फेसबुकवर न आवडणाऱ्यांना अशाच फॉर्मने वगळता आलं असतं तर बरे झाले असते. पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी सभ्यतेने उत्तर दिलं, इथे थोडा “अबे” स्टाईलचा रंग असता तर मजा आली असती. शेवटी पुन्हा ज्ञानेश कुमार, निवडणूक आयोग आणि पांढरा टी-शर्ट. राहुलजींची सहजता लोकांना भिडते, फक्त पँट-बूट्स जरा अपग्रेड झाले तर प्रेस कॉन्फरन्स अजूनच परफेक्ट!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

हॅपी जर्नीचा फंडा अलेक्सा सांगते, “युरोप-अमेरिकेत ट्रीप करायची आहे का?” आपण म्हणतो, “पैसे नाहीत.” त्यावर अलेक्सा लगेच सल्ला देते—“मग समाजसेवी किंवा पर्यावरणवादी बना, भारतातील प्रकल्पांना विरोध करा. परदेशातून निमंत्रणे येतील, हॅपी जर्नी!” हा उपरोध आजच्या काही वास्तवावरच बोट ठेवतो. विकासकामांना अडथळा आणणाऱ्या, आंदोलनांचा गाजावाजा करणाऱ्या स्वयंघोषित कार्यकर्त्यांना परदेशातील मंचांवरून बोलावण्या येतात. जनतेच्या हितासाठी खऱ्या अर्थाने झटणे, गावोगाव धावून लोकांमध्ये मिसळणे ही खरी समाजसेवा असते. पण काहींना मात्र ट्रीप, मानपत्रे आणि ग्लॅमर यासाठीच समाजकार्याची आवड निर्माण झालेली दिसते. देशहिताच्या नावाखाली वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा हा प्रकार आता लोकांच्या डोळ्यांत भरतो आहे. विकास रोखून “हॅपी जर्नी” करणाऱ्यांची खरी ओळख लपून राहणार नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गटाराच्या कामावरील निकृष्टतेवरून अधिकाऱ्याला जाब विचारला हे स्वागतार्ह असले, तरी वापरलेली भाषा खटकणारी ठरली. “जनतेचा पैसा आहे” हे स्मरण करून देणे आवश्यकच, पण जनतेचा प्रतिनिधी असणाऱ्याने तोल सांभाळून बोलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धारेवर धरले होते; त्याच पद्धतीने रोहित पवार यांनीही सार्वजनिकरीत्या शब्दांवर नियंत्रण न ठेवणे हे दुर्दैवी ठरले. अधिकारी हा जनतेच्या व्यवस्थेचा एक घटक आहे, त्याच्याशी संवाद रचनात्मक असला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना झापल्याने तात्पुरता गाजावाजा होतो, पण दीर्घकाळात कामकाजातील विश्वास कमी होतो. रोहित पवार यांची जनतेच्या प्रश्नांवर तत्परता प्रशंसनीय असली तरी, सभेच्या भाषेतली अरेरावी त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावणारी ठरली.

🔽


ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page