बेकायदेशीर सावकारी मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उचलणार कठोर पावले
- dhadakkamgarunion0
- Mar 6
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
बेकायदेशीर सावकारी मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उचलणार कठोर पावले
● महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात अवैध सावकारीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. राज्यात सध्या दोन प्रकारचे सावकार कार्यरत आहेत: पहिले म्हणजे शासनाचे रीतसर परवाना असलेले आणि दुसरे म्हणजे कोणत्याही परवान्याशिवाय व्यवसाय करणारे अवैध सावकार. या अवैध सावकारांकडून दिले जाणारे सर्व कर्ज व्यवहार हे पूर्णपणे बेकायदेशीर असून, अशा छळाला बळी पडणाऱ्या नागरिकांनी न घाबरता पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ज्या नागरिकांनी अवैध सावकारांकडून कर्ज घेतले आहे आणि ज्यांचा छळ होत आहे, त्यांनी धैर्याने पुढे येऊन तक्रार करावी. अशा प्रकरणांमध्ये तक्रारदाराला पूर्ण संरक्षण दिले जाईल. गृहविभागाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या दर तीन महिन्यांनी आपला अहवाल सादर करतील, ज्यामुळे अवैध सावकारीच्या धंद्याला कायमचा लगाम बसेल. महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायदा २०१४ अधिक कडक करण्यासाठी शासन त्यात सुधारणा करत आहे. केवळ वसुलीच नव्हे, तर अशा अवैध सावकारांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक तैनात करण्यात आले असून, दोषींवर कडक शासन केले जाणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


Comments