top of page

बडा घर पोकळ वासा !!!

  • dhadakkamgarunion0
  • Sep 5
  • 3 min read

Updated: Sep 7

🖋️🖋️विशेष संपादकीय🖋️🖋️

.................................

.................................

अभिजीत राणे

बडा घर पोकळ वासा !!!

जगाच्या इतिहासात काही देश असे असतात की जणू ते आकाशाला टेकलेले भासतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिका म्हणजे असा एक देश—जगाचे केंद्र, सामर्थ्याचा सर्वोच्च शिखर. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप मोडकळीस आलेला असताना अमेरिकेने आपल्या तिजोरीतील अब्जावधी डॉलर वापरून मार्शल प्लॅनद्वारे युरोपचा पुनर्निर्माण केला. त्या क्षणापासून डॉलर जागतिक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनला. संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सर्व संस्थांवर अमेरिकेचा शिक्का बसला.

तंत्रज्ञानाच्या आघाडीवर सिलिकॉन व्हॅलीने जगाला संगणक, इंटरनेट आणि माहिती-तंत्रज्ञानाची क्रांती दिली. लष्करी ताकदीत तर अमेरिका अप्रतिम होती. शीतयुद्धाच्या काळातच सोव्हिएत युनियनला आर्थिकदृष्ट्या झुकवून तिने विजय मिळवला. १९९१ मध्ये सोव्हिएत संघ कोसळल्यानंतर तर “एकध्रुवीय जग” या संकल्पनेला अर्थ आला. जगात कुणीही अमेरिकेला आव्हान देण्यास तयार नव्हते.

ते दिवस खरोखरच अमेरिकेच्या सामर्थ्याचे शिखर होते. डॉलर म्हणजे सोन्यापेक्षा अधिक खात्रीचा चलन, नाटो म्हणजे अजेय लष्कर, हॉलीवूड म्हणजे सांस्कृतिक वर्चस्व. अमेरिकन जीवनशैली हा जगभरातील तरुणांचा आदर्श बनला होता. अफगाणिस्तानपासून इराकपर्यंत जिथे हवे तिथे हस्तक्षेप करण्याची, शासन पाडण्याची आणि नवे शासन बसविण्याची क्षमता व गर्व अमेरिकेत होता.

पण काळ बदलतो. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या वाड्याला आतून पोकळपणा येतो, तसेच आज अमेरिकेचे झाले आहे. बाहेरून अजूनही ती एक महासत्ता वाटते, पण आतून तिची पायाभरणी खिळखिळी झाली आहे.

अमेरिकेचे कर्ज आज जवळजवळ ३५ ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास पोहोचले आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या डोक्यावर लाखो डॉलर्सचे कर्ज आहे. पूर्वी डॉलर छापून जगभर त्याची किंमत चालायची, पण आता चीन, रशिया, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांनी डॉलरला पर्याय उभा करायला सुरुवात केली आहे. रशियासोबत भारताने रूपयात व्यापार सुरू केला, चीन युआनला आंतरराष्ट्रीय करण्याच्या प्रयत्नात आहे. डॉलरचे वर्चस्व तडे जात आहे.

अमेरिकन सरकारला आपल्या दैनंदिन खर्चासाठी कर्ज काढावे लागते. सोशल सिक्युरिटी, आरोग्य, सैनिकी खर्च—सगळे कर्जावर चालले आहे. महागाई वाढली आहे. मध्यमवर्गीयांचा जीवनमान घसरत आहे. १९५०-६० च्या दशकात “अमेरिकन ड्रीम” हा शब्द जगभर गाजत होता. पण आज अमेरिकन ड्रीम ही फक्त एक परिकथा उरली आहे.

लष्करी ताकद अफाट आहे हे खरे, पण परिपूर्ण नाही. अफगाणिस्तानमध्ये वीस वर्षे लढूनही अमेरिका तालिबानला पराभूत करू शकली नाही. शेवटी २०२१ मध्ये अमेरिकेला अपमानकारक माघार घ्यावी लागली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने त्यांच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांना खाली पाडून जगाला दाखवले की अमेरिकेचे तंत्रज्ञान अजूनही अजेय नाही.

इराण–इस्रायल संघर्षात तर इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या आकाशातून अमेरिकन मदतीने उभारलेली सुरक्षा प्रणाली छेदून टाकली. यातून सिद्ध झाले की अमेरिका जी शस्त्रे विकते ती सर्वशक्तिमान नाहीत.

कुटुंब संस्था अमेरिकेत मोडकळीस आली आहे. घटस्फोट, एकल पालकत्व, ड्रग्जचे व्यसन, शाळांमध्ये होणारे हिंसाचार—या समस्या सामान्य झाल्या आहेत. “वोक” संस्कृती आणि समलिंगी नागरिकांच्या हक्कांच्या आक्रमक चळवळींनी समाजात विभागणी निर्माण केली आहे. धर्म, परंपरा, कुटुंब या मूल्यांचा आधार अमेरिकन समाज हरवून बसला आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली तरुणांना शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्यात आली, पण त्यातून शाळांमधील गोळीबारांच्या घटना वाढल्या. जगाला शिकवणारा देश स्वतःच आपल्या समाजातील हिंसाचार थांबवू शकत नाही.

डॉलरच्या आधारे जगावर वर्चस्व गाजवण्याची अमेरिकेची सवय आज तिच्या डोक्यावर येऊन बसली आहे. टेरिफ वाढवून भारताला दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न झाला, पण भारताने लगेचच जी एस टी कपात करून देशांतर्गत खप वाढवला आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, यूएई यांच्यासोबत मुक्त व्यापार करार करून नवे बाजार उघडले. परिणामी अमेरिकेचा डाव फसला. आता महागाईचा भार सामान्य अमेरिकन नागरिकांवर पडणार आहे.

जेव्हा महागाईचा स्फोट होईल, तेव्हा ट्रंप प्रशासन हतबल होईल. कारण एकदा पर्यायी बाजारपेठांमध्ये पाय रोवला की पुन्हा अमेरिकेकडे परत येणे सोपे नसते. भारत, रशिया, चीन असे देश तेव्हाही अमेरिकेला दूर ठेवण्याची नीती अवलंबतील.

आज अमेरिका सर्वाधिक घाबरलेली आहे ती भारत, रशिया आणि चीन यांच्या जवळिकीमुळे. एकाच वेळी या तिन्ही राष्ट्रांवर युद्ध लादून पराभूत करण्याची ताकद अमेरिकेकडे नाही. युरोपसह मिळूनही ती ताकद नाही. आणि लोकशाही असलेल्या अमेरिकेत केवळ राष्ट्राध्यक्षांचा अहंकार दुखावला म्हणून जगाला महायुद्धाच्या खाईत ढकलण्याइतकी वेडगळ मानसिकता सामान्य अमेरिकन नागरिकांची नाही.

डोनाल्ड ट्रंप यांचा उर्मट स्वभाव जर ३०-४० वर्षांपूर्वी आला असता, तर बळकट अमेरिकेने जगाला दबवले असते. पण आजच्या पोखरलेल्या अमेरिकेला त्यांचा उद्धटपणा शोभून दिसत नाही. उलट जगातील देश त्याविरुद्ध एकत्र येतात. ट्रंप यांचे टेरिफ वॉर म्हणजे केवळ स्वार्थी राजकारण. भारत जागतिक व्यापार परिषदेत अमेरिकेविरोधात गेला तर अमेरिकेची प्रतिमा “गुन्हेगार राष्ट्र” अशी होईल. हा डाग लागल्यावर कोणताही देश अमेरिकेशी व्यवहार करताना सावध राहील.

एकेकाळी जगाला आपल्या पैशाने आणि सैनिकी ताकदीने दबावाखाली ठेवणारा अमेरिका आज कर्जबाजारी जमीनदारासारखा वागतो आहे. स्वतःचे सामर्थ्य घटले आहे हे मान्य न करण्याची जिद्द त्याला आणखी खोल गर्तेत ढकलते आहे. ट्रंप यांच्या आक्रस्ताळेपणामुळे अमेरिका आज जगात एकाकी पडते आहे.

बाहेरून अजूनही अमेरिका मोठ्या घरासारखी वाटते—उंच, भव्य, दिमाखदार. पण आतून ती पोकळ आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली, सामाजिक विषमतेने पोखरलेली, लष्करी सामर्थ्याला गालबोट लागलेली. तिच्या दादागिरीला भारत, चीन आणि रशिया सरळसरळ आव्हान देत आहेत.

भारताने संयम, बुद्धिमत्ता आणि ठाम पावले टाकून अमेरिकेला दाखवून दिले आहे की आता जग एकध्रुवीय नाही. ट्रंप यांनी जर हट्ट सोडून माघार घेतली नाही, तर अमेरिकेचे दिवस अधिकच बिकट होणार आहेत.

“बडा घर पोकळ वासा”—अमेरिकेच्या आजच्या स्थितीचे हेच अचूक चित्रण आहे. जग आता बदलले आहे. भारतासारख्या उदयोन्मुख शक्तींना थांबवून ठेवणे कोणालाच शक्य नाही. अमेरिका हे सत्य जितक्या लवकर मान्य करेल, तितकेच तिच्यासाठी बरे.

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page