एकनाथजी, उद्धवजींची चूक तुम्ही करू नका !!
- dhadakkamgarunion0
- Nov 19
- 4 min read
संपादकीय
अभिजीत राणे
एकनाथजी, उद्धवजींची चूक तुम्ही करू नका !!
शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या परत एकदा माध्यमात पसरू लागल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेच्या अन्य मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचे वृत्त असून याबद्दल फडणवीस यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सज्जड दम दिल्याची सुद्धा चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल-परवा मुंबईत एक बैठक झाली,ती बैठक प्रामुख्याने भाजप व शिंदे सेनेची होती, बैठकीत सेनेच्या मंत्र्यानीं भाजप मध्ये सेनेच्या लोकांचा प्रवेश या मुद्यावरून विचारणा केली,त्यावर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो म्हणत,उल्हास नगर मधून सुरुवात कोणी केली हा प्रतिप्रश्न केला त्यावर शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
गळाभेट घेत पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मित्रा पेक्षा,समोरासमोर थेट भिडणारा शत्रू कधी ही परवडला पण मुंह मे राम अन बगल मे छुरी हा मित्र घातक असतो,शिंदेचं सद्या असच झालंय, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी आपल्या गोटात मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत,मला पुन्हा मुख्यमंत्री करा म्हणत दिल्ली वाऱ्या ही केल्या होत्या,पन हाताला काही लागत नाही म्हणल्यावर पूर्वीपासून सुरू असलेल्या कुरघोड्या वाढीस लागल्या.
मग जरांगेनां फूस असेल किंवा तिकडे कोकणात नितेश विरुद्ध निलेश राणे हा सुप्त संघर्ष सुरू केला,पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर,सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले,नाशिक मध्ये दादा भुसे विरुद्ध गिरीश महाजन,ठाण्यात गणेश नाईक विरुद्ध पूर्ण पक्षच कामाला लावला,अश्या अनेक आघाड्यावर मित्रपक्ष असलेल्या भाजपला अडचणीत आणण्याचं काम शिंदेनीं सुरू केलं.
आता मुंबई मनपा साठी 50/50 जागा वाटप करा असा होरा लावला आहे,भाजपने स्पष्ट शब्दात फिफ्टी-फिफ्टी होणार नाही असं ही कळवलं आहे,मग त्यांनी महापौर आमचा करा अन तुमचा महापौर होणार असेल तर स्थायी समितीचे अध्यक्षपद आम्हाला द्या अशी अट ठेवल्याची माहिती मिळते आहे. शिंदेचा हा हट्ट पाहून मागे महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात अमित शाह यांनी नाव न घेता राज्यात भाजपला कुबड्याचीं गरज नाही हे ठासून सांगत आपल्या विरोधकांना येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दुर्बीण लावून सुफडा साफ करा हा थेट संदेश दिला आहे.
कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 99 होती,शिवसेनेमध्ये झालेल्या पक्ष फुटी नंतर एकूण 44 माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर 55 माजी नगरसेवक हे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत,44 नगरसेवक आयात करून 50 टक्के जागा द्या म्हणणं कोणाला आवडेल ?
आता यातून कोणाला काय बोध घ्यायचाय त्यांनी तो जरूर घ्यावा,अमित शाह पण काही काळ धीराने घेतात पण नाकात पाणी जात असेल तर पायाखाली ही तेवढ्याच तत्परतेने घेतात याची प्रचिती अनेकवेळा अनेकांना आलीय,पाहू पुढे काय होते ते,कारण आखलेल्या नियोजनावर लगेच सभा भरवायच्या नसतात तर काहींना उत्तर अन काहींची उत्तरं ही वेळ आल्यावर मांडायची असतात,कारण दिल्लीत जाऊन सत्कार करायचा,गोड-गोड बोलायचं अन इथं राज्यात छाती काढायची हे जास्त दिवस चालत नाही.
या घटनाक्रमामागे अनेक घटक कार्यरत आहेत. शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद गेल्याचे शल्य विसरू शकलेले नाही आणि पुन्हा मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्वाकांक्षा त्यांना शांत बसू देत नाही. त्याच वेळी त्यांचे सदस्य सुद्धा त्यांच्या या इच्छेला कायम प्रज्वलित ठेवण्याचे काम करत आहेत.
पंचवीस वर्षांपूर्वी भाजपा सेना युती झाली होती त्यावेळेस पासून शिवसेना आणि भाजपाने आपापली प्रभावक्षेत्रे वाटून घेतली होती. वर्षानुवर्षे युतीने लढल्यामुळे काही जागा या कायम सेनेकडे आणि काही जागा कायम भाजपाकडे असे चित्र होते आणि याला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा सरावले होते. 2014 मध्ये सगळ्यांनी विधानसभा एकेकटी लढवली आणि भाजपाला 105 जागा मिळाल्या आणि त्यांना राज्यव्यापी एकहाती सत्ता मिळवण्याची संधी दिसू लागली. दुसरीकडे शिवसेनेचा अहंकार ठेचला गेला आणि त्यामुळे त्यांनी आदळआपट आक्रस्ताळेपणा करून आणि हार्ड निगोशियेटर होऊन अधिकाधिक जागा दरवेळी पदरात पाडून घेणे हे चुकीचे धोरण स्वीकारले. याचा परिणाम म्हणून कटुता वाढत गेली. 2019 ते 2022 चा घटनाक्रम सगळ्यांना ज्ञात आहे.
शिंदेंना मुख्यमंत्री करताना ते आपल्याशी योग्य पद्धतीने वर्तन करतील ही भाजपाला अपेक्षा होती परंतु मुख्यमंत्री असताना जागावाटपात समजूतदार असणारे शिंदे आता मात्र परत ठाकरेंच्या सारख्या आडमुठ्या भूमिकेत गेले आहेत आणि आता भाजपा तडजोड करण्याच्या मानसिकतेत नाही.
एकनाथ शिंदे एक सत्य लक्षात घेत नाहीत की आज भाजपाकडे 132 जागा आहेत. 5 जणांचे समर्थन आहे जे पूर्वाश्रमीचे भाजपाशी संलग्न होते. आणि अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे दोघांकडे सुद्धा भाजपाचेच पाच पाच आमदार आहेत जे त्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. हा हिशोब लावला तर आज भाजपाचे स्पष्ट बहुमत आहे. आणि जर शिंदे किंवा पवारांनी जास्त त्रास दिला तर भाजपा या 10 आमदारांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडून आणू शकते आणि तितका काळ सुद्धा 277 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे 137 जागांचे स्पष्ट एकहाती बहुमत असणार आहे.
हा मुद्दा विस्मृतीत ठेवून भाजपाशी संवाद साधणे चुकीचे आहे आणि ही चूक शिंदे वारंवार करत आहेत नेमके या टप्प्यावर अजित पवार मात्र शहाणे होऊन तडजोडीची भूमिका स्वीकारत आहेत. भाजपा आणि संघाची भविष्यातील पाऊले ओळखण्यात शिंदे कमी पडत आहेत. ते फक्त आजचा विचार करत आहेत. वास्तवात 2029 ची विधानसभा निवडणूक भाजपा संपूर्ण राज्यात स्वबळावर लढणार आहे आणि त्या परिस्थितीत भाजपा या सगळ्यांच्या पुढे विरोधक म्हणून उभी रहाणार आहे. त्यावेळी जर आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शिवसेना शिंदे गट , अजित पवार गट , शरद पवार गट , कोंग्रेस आणि उबाठा गट या सगळ्यांनीच आजच विचार करून धोरण आखून पुढील चार वर्षात आपआपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे धोरण आखले पाहिजे. दुर्दैवाने शिंदे आज छोट्या छोट्या गोष्टींच्या साठी भांडून भविष्यातील युतीचे पाय कापत आहेत. भाजपा सह राहून शिंदे 50-75 जागा मिळवून कायम सत्तेचा उपभोग घेऊ शकतात परंतु भाजपाला अंगावर घेऊन त्यांना 15 आमदार निवडून आणणे सुद्धा जड आहे. या वास्तवाचा स्वीकार एकनाथ शिंदे जितक्या लवकर करतील तितके भविष्यासाठी उत्तम आहे.








Comments