🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 14
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या आणि मोजक्या शब्दात मराठी अस्मितेच्या शिळ्या कढीला ऊत आणणार्या मंडळींना उत्तर दिले आहे. अस्मिता ही घोषणांनी टिकत नाही; ती सन्मानाने दिलेल्या घरांच्या किल्ल्या आणि लोकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानात जिवंत राहते. मुंबईच्या राजकारणात महापालिका निवडणुका जशा जवळ येतात, तसतसे ‘मराठी विरोधी’ ठरवण्याचे प्रयत्न जोर धरतात. पण प्रत्यक्ष कामच सत्य सिद्ध करते. आजची वस्तुस्थिती अशी आहे की, ज्या मराठी कुटुंबांना कधीकाळी या शहरातून उखडून टाकले, त्यांना पुन्हा त्यांच्या हक्काच्या जागेवर सन्मानाने घरे मिळत आहेत. हे केवळ गृहनिर्माण प्रकल्प नाहीत, तर एका समाजाच्या पुनर्वसनाची आणि प्रतिष्ठेच्या पुनर्स्थापनेची कहाणी आहे. राजकीय आरोपांपेक्षा कामाची भाषा लोक ओळखतात, आणि त्या भाषेत मराठी माणसाचा मान सर्वात मोठा आहे. निवडणुकांपूर्वी आरोप होतील, अपप्रचार होईल, पण सत्याच्या पायावर उभी असलेली कामगिरीच मतदारांच्या मनात ठसे उमटवते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पुण्यात उड्डाणपुलांचा उद्देश ट्रॅफिक कमी करणे नसतो तर अपघातांची नवी लोकेशन्स तयार करणे असतो.सिंहगड रोडवर तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम आता “पूर्ण होण्याच्या” मार्गावर आहे मार्गावर, म्हणजे अजून थोडा मार्ग बाकी आहे. दोन महिन्यांपूर्वी १५ ऑगस्टला सुरू होईल असे जाहीर झाले होते, पण प्रशासनाची तारीख ही पुण्याच्या पावसासारखी कधी येईल, कशी येईल, ठाऊक नाही. आणि जरी सुरू झाले तरी काय फरक पडणार? कारण उड्डाणपुलाची शेवटची पायरी नेमकी एका अतिप्रेमळ सीएनजी पंपाच्या दहा मीटर पुढे संपते. आता इथून सुरू होईल पुण्याचा खास ट्रॅफिक सिनेमा रिक्षा, शाळेच्या बसेस, टँकर आणि ‘अभिमानी’ ट्रक ड्रायव्हर्स राँग साइडने पंपाकडे धाव घेतील. वाहतूक विभागाला हे सगळं दिसेल, पण कारवाईचे हात मात्र “बांधलेले” राहतील. उलट साइडचे हे दररोजचे नृत्य सुरू असतानाच, अपघातांची छोटी फुलबाग तयार होईल. पंधरा-वीस बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होईल, तोवर चौकाचा ‘चक्राकार मार्ग’ आखलेला असेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
एका लोकशाही राष्ट्राने स्वातंत्र्यासाठी लढणार्या लढवय्यांचा गळा घोटायचा नसतो. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही पाकिस्तानपासून स्वतंत्र राष्ट्रासाठी लढणारी संघटना. इंग्रजांच्या काळापासूनच बलुच जनतेला पाकिस्तानसोबत राहायचे नव्हते. १९४७च्या फाळणीनंतरही त्यांनी वेगळ्या राष्ट्राची किंवा भारतात सामील होण्याची मागणी केली. पण पाकिस्तानने त्यांचा आवाज दाबला. आजही बलुचिस्तानचे लोक स्वातंत्र्याच्या घोषणेसाठी लढत आहेत. अशा वेळी अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी व तिची सहयोगी मजीद ब्रिगेडला दहशतवादी घोषित करणे हा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा निर्णय ठरला आहे. भारत, रशिया आणि अफगाणिस्तान यांच्याकडून पाठिंबा असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी ठरवून अमेरिका पाकिस्तानला खूश करत आहे. मात्र पाकिस्तानचा “फेल्ड मार्शल” भारताला अणुबॉम्बच्या धमक्या देतो, आणि भारत त्याला सडेतोड उत्तर देतो. अमेरिकेचा हा निर्णय फक्त पाकिस्तानच्या हिताचा असून, बलुच जनतेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला धक्का देणारा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जेव्हा मित्रांमध्ये बाजारपेठेऐवजी टॅरिफची भाषा सुरू होते, तेव्हा मैत्रीच्या पाया ऐवजी भिंती उभ्या राहतात. कॅनडातील ऑंटेरियो प्रांताचे प्रीमियर डग फोर्ड यांनी अमेरिकेतील मिनेसोटा, मिशिगन आणि न्यूयॉर्कला होणाऱ्या वीज निर्यातीवर २५% अधिभार जाहीर करताच, उत्तर अमेरिकन व्यापारयुद्धाला नवा ताण मिळाला. या निर्णयामुळे अमेरिकन कुटुंबे व व्यवसायांचा खर्च वाढणार असून, दररोज सुमारे ४ लाख डॉलर्सचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर येईल. फोर्ड यांची खंत स्पष्ट आहे—त्यांना अमेरिकेसोबत सहकार्य करायचे आहे, पण ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणाने त्यांना हा मार्ग निवडण्यास भाग पाडले. “गरज पडल्यास पुरवठा बंद करण्यासही मागेपुढे पाहणार नाही” हा त्यांचा इशारा आर्थिक नातेसंबंधात गंभीर दरी निर्माण करू शकतो. या संघर्षात सर्वात मोठे नुकसान ग्राहक आणि कामगारांचे होणार आहे. व्यापारातील तणाव राजकीय गर्वातून वाढत चालला, आणि त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जेव्हा भारतासारखा देश आपली दारे जगासाठी उघडतो, तेव्हा सीमांच्या पलीकडे व्यापारच नव्हे तर विश्वास, संस्कृती आणि मानवतेची निर्यात सुद्धा सुरू होते. अमेरिकेसोबतचा व्यापार करार अद्याप अनिश्चित असला तरी भारत जागतिक पातळीवर आपल्या आर्थिक मैत्रीच्या जाळ्याचा विस्तार वेगाने करत आहे. अलीकडेच युकेसोबत फ्री ट्रेड अॅग्रीमेंट पार पडले, तर ओमानसोबतचा मुक्त व्यापार करार पुढील तीन महिन्यांत जाहीर होणार आहे. सौदी अरेबियासोबतचा द्विपक्षीय गुंतवणूक करार अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या सहा देशांबरोबर आणि युरोपियन युनियनच्या २७ देशांबरोबरचे FTA चर्चाही गतीत आहेत. गेल्या ११ वर्षांत भारताने या देशांशी बांधलेले विश्वासाचे नाते इतके दृढ झाले आहे की, ३३ देशांपैकी सात देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. हे केवळ वैयक्तिक सन्मान नव्हेत, तर भारताच्या उदयाची जागतिक मान्यताच आहे.
Comments