top of page

सिद्ध साधकांचा खेळ !!!

  • dhadakkamgarunion0
  • 1 day ago
  • 4 min read

संपादकीय


अभिजीत राणे


सिद्ध साधकांचा खेळ !!!


आजपासून बरोब्बर एक वर्षापूर्वी महायुतीने 232 जागा खिशात घालून विधानसभा जिंकली होती. भाजपाला 132 जागा , शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी कोंग्रेसला 43 जागा मिळाल्या होत्या. आज एक वर्ष झाले आहे आणि पुढील 4 वर्षांनी अर्थात 2029 साली पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या एक वर्षात आणि पुढील चार वर्षात प्रत्येक पक्षाचे ध्येय आणि त्या दृष्टीने केले जाणारे नियोजन याचा हा लेखाजोखा.


देवेन्द्र फडणवीस उर्फ देवा भाऊ हे महाराष्ट्र भाजपाचे अत्यंत लाडके नेते, कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आधुनिक चाणक्य आहेत. त्यांच्या खेळी भल्या भल्यांना उमगत नाहीत आणि उमगल्यानंतर काही फायदा नसतो कारण सगळे काही हातातून निसटून गेलेले असते. 2014 साली स्वतंत्र लढून 123 जागा. 2019 साली युती मध्ये लढून 105 जागा आणि आता 2024 साली महायुतीमध्ये लढून 132 जागा असा सातत्यपूर्ण शंभरच्या वर जागा निवडून आणण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अत्यंत महत्वाकांक्षी , तोंडात साखर ठेवून बोलणारे आणि करेक्ट कार्यक्रम लावणारे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस ओळखले जातात.


मागील एक वर्षात सत्ता मिळूनही देवेंद्र फडणवीस यांनी इनकमिंग थांबवलेले नाही. प्रत्येक पक्षातील ताकदवान मराठा नेता त्यांनी भाजपात आणायचा सपाटा चालूच ठेवला असून दुसरीकडे ओबीसी समाजाला सातत्याने चुचकारणे सुद्धा सुरू ठेवले आहे. यामागे 2029 ची विधानसभा निवडणूक भाजपाने स्वबळावर लढवण्याचा निर्धार आहे. महाराष्ट्रात आजही शाहू फुले आंबेडकर विचार प्रभावी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजही मराठा फॅक्टर प्रभावी आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना या दोन्ही घटकांना खुश ठेवून 2029 साली स्वबळावर सत्ता मिळवायची आहे.


स्वतःच्या अंगभूत क्षमतांची पुरेपूर जाणीव असणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस ओळखले जातात. त्यामुळेच ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्यावर सुद्धा ते शांतपणे उपमुख्यमंत्री पद भूषवू शकले. महायुतीच्या दोन वर्षांच्या कारकि‍र्दीत दुय्यम भूमिका स्वीकारून ते शांतपणे काम करत राहिले. आता 232 जागा जिंकून आणून त्यांनी हक्काने पुन्हा मुख्यमंत्रीपद स्वीकारले. एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ऊंची त्यातून दिसून आली.


एकनाथ शिंदे हे कायम दुय्यम भूमिकेतच राजकारण करत आले आहेत. शिवसेनेसारख्या घराणेशाही पक्षात सत्ता ही फक्त मालकाकडे असते बाकी सगळेच नोकर असतात. शिंदे सुद्धा सर्वोत्तम नोकर होते. पुढे फुटून निघाल्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. भाजपाने सुद्धा त्यांना मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरे यांना त्यांच्या गद्दारीची खरी जाणीव करून दिली. उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या कच्छपी न लागता भाजपालाच काही काळासाठी मुख्यमंत्रीपद मागितले असते तर भाजपाने कदाचित दिले सुद्धा असते. परंतु उद्धव ठाकरे यांना संवाद न साधणे भोवले आहे याची जळजळीत जाणीव करून देण्यासाठी आणि केवळ त्याच साठी शिंदेंना मुख्यमंत्री केले गेले हे कटू सत्य आहे.


शिंदेंना सुद्धा मुख्यमंत्रीपद मिळेल ही आशा नव्हती. परंतु एकदा ते पद मिळाल्यावर मात्र त्यांना त्या पदाचा मोह पडला आणि त्याचा त्याग करणे त्यांच्या जिवावर आले होते. भाजपाला जनतेने दिलेला जनादेश इतका स्पष्ट होता की तो डावलून शिंदे मुख्यमंत्री रहाणे अशक्य होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या क्षणापासून शिंदेंचे सुर बिघडले आहेत आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने विचार करत ते सातत्याने ऊचापती करत आहेत. पक्ष, संघटन आणि व्यक्ति या मर्यादांचा विचार करता शिंदे कधीही स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत हे सत्य आहे. 2029 पर्यन्त त्यांच्या पक्षाने तग धरला तरी त्या निवडणुकीत सुद्धा एकट्याने लढून शिंदे 50-60 पेक्षा जास्त आमदार कधीही निवडून आणू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या मर्जीनेच होणे शक्य आहे. थोडक्यात ते मुख्यमंत्री म्हणून नेमले जाऊ शकतात , निवडले जाऊ शकत नाहीत.


त्यामुळे गेले वर्षभर आणि पुढील चार वर्षे सुद्धा ते सातत्याने दिल्लीश्वरांच्या नजरेत आणि मर्जीत रहाण्याचा आटोकाट प्रयास करणार यात संशय नाही. देवेंद्र फडणवीस यांची गुणवत्ता लक्षात घेता त्यांना बाजूला सारून शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणे कालत्रयी अशक्य आहे. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद किंवा पक्षाध्यक्षपद जर दिले गेले तर आणि तरच आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाची खुर्ची रिकामी होऊ शकते. परंतु त्या परिस्थितीत भाजपा श्रेष्ठींनी आपल्या पारड्यात वजन टाकावे यासाठीची सगळी फिल्डिंग लावण्यात शिंदे व्यस्त आहेत. पुढील चार वर्षे सुद्धा त्यांचे हेच उद्योग सुरू असतील यात संशय नाही.


अजित पवारांची गोष्टच वेगळी आहे. कन्यामोहाने ग्रस्त काकांचा आशीर्वाद घेऊनच त्यांनी राष्ट्रवादी कोंग्रेस फोडली आणि सत्तेची ऊब मिळवली आहे. काकांचे अष्टप्रधान पण अजित पवार आपल्याबरोबर घेऊन आले हे पुरेसे बोलके आहे. कोंग्रेस बरोबर राहून आणि स्वबळावर राष्ट्रवादी कधीही 50 च्या मागे पुढेच राहिली आहे. ही त्यांची मर्यादा भेदण्यासाठीच पुतण्याने भाजपाचा हात पकडला आहे हे काका समजून आहेत आणि मनोमन आशीर्वाद सुद्धा देत आहेत.


अजित पवारांनी पक्ष फोडून पहिला मेळावा घेतला त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की आपल्याला भविष्यात 90 ते 100 आमदार निवडून आणायचे नियोजन करायचे आहे आणि आपले 100 आमदार आले की मुख्यमंत्री पद आपलेच असणार आहे हा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपा मुख्यमंत्रीपदाच्या जोडीला गृहमंत्री पद कदापि सोडणार नाही याची त्यांना खात्री होती. नागरी भागातच शिवसेनेचा मोठा जोर असल्याने ते नगरविकास खाते सोडणार नाहीत याची सुद्धा त्यांना जाणीव होती त्यामुळे त्यांनी अर्थमंत्री पद घेत दोघांनाही खुश केले.


परंतु त्याच वेळी आपल्या आमदारांना आणि आपल्या संभाव्य 100 मतदारसंघांना त्यांनी प्रचंड प्रमाणात निधी मिळेल याची काळजी घेतली आहे. महाराष्ट्रात सध्या तरी मुस्लिमांचा कोणी मसीहा म्हणवला जाईल असा राजकीय नेता नाही ती पोकळी अजित पवार भरून काढत आहेत. त्यांनी मुस्लिमांवर दौलतजादा करायला आरंभ केला आहे. मदरशांना भरघोस अनुदान मिळत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात हज हाऊस उभे रहात आहे. दर्ग्याना अनुदान मिळते आहे. थोडक्यात मुस्लिमांची चंगळ होईल याची काळजी अजित दादा घेताना दिसत आहेत. दुसरीकडे गोरक्षकांना आवरा असा सज्जड दम पोलिसांना देत सामान्य मुसलमान सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहील याची ते काळजी करत आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट हे दाखवायचे दात आहेत. 2029 मध्ये अजित पवार 100 आमदार निवडून आणू शकले तर दूसरा गट सरळ विलीन होत अजित दादांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा बळकट करू शकतो.


हा धोका देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा ज्ञात आहे त्यामुळेच ओबीसी मराठा संघर्ष पेटत ठेवत आणि दोघांना सुद्धा आरक्षण आणि अन्य लाभ देत आपल्याकडे वळवण्याची खेळी देवेंद्र खेळत आहेत. जोडीला त्यांनी इनकमिंग सुरू ठेवत ठिकठिकाणी पवारांच्या विरोधकांना आपल्याकडे ओढून घेत आपली शक्ति वाढवण्याची आणि पवारांना शह देण्याची तयारी सुरू केली आहे.


या सत्तेच्या सारिपाटातील सर्वात कमकुवत खेळाडू एकनाथ शिंदे आहेत. हिंदुत्व हा शिवसेनेचा प्राण होता आणि एकनाथ शिंदे अजूनही कट्टर हिंदुत्ववादी पक्ष ही भूमिका स्वीकारण्यास कचरत आहेत. वास्तवात त्यांनी ही भूमिका स्वीकारली तर त्यांचा जनाधार प्रचंड वाढू शकतो परंतु त्या दृष्टीने त्यांची पावले पडत नाहीत. ते केंद्रीय भाजपातील नेत्यांच्या सूचनांचे पालन करत आहेत कारण त्यांचा तो पिंड आहे. त्यामुळे एक वर्षात जी परिस्थिती आहे कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती पुढील चार वर्ष राहिली तर निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यावेळी शिंदे यांचा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मुख्य संघर्ष अजित पवारांशीच होईल. आजपासून त्यासाठीची तयारी केली नसेल तर शिंदे कमकुवत पडतील. याचा लाभ अजित पवार घेऊ शकतात.


महायुती एकत्र लढली आणि अजित पवार 100 जागा आणू शकले तर त्यांचा दावा अधिक प्रबळ होऊ शकतो आणि त्यावेळी देवेन्द्र केंद्रात गेले तर ऐनवेळी दिल्लीश्वर अजित दादांच्या पदरात मुख्यमंत्रीपदाचे दान टाकू शकतात. ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.


त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती स्वरुपात सत्ता भोगणार्‍या तीन पक्षांच्या तीन सर्वोच्च नेत्यांचा हा सिद्ध साधक खेळ पुढील चार वर्ष असाच सुरू रहाणार आहे यात संशय नाही.

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page