top of page

संपादकीय अभिजीत राणे अजित दादांच्या पश्चात पेटलेला सत्ता संघर्ष !!!

  • dhadakkamgarunion0
  • 3 hours ago
  • 3 min read

संपादकीय


अभिजीत राणे


अजित दादांच्या पश्चात पेटलेला सत्ता संघर्ष !!!


2014 साली विधानसभा प्रचारात नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचा उल्लेख नॅचुरली करप्ट पार्टी असा केला होता. फडणविसांनी सुद्धा अजित पवारांवर टिकास्त्र सोडले होते. 70000 कोटीचा घोटाळा बैलगाडी भरून पुरावे हे सगळे बोलून झाले होते. किंबहुना याच मुद्द्यावर महाराष्ट्रात मतदान होऊन भाजपाला 123 जागा मिळाल्या होत्या. याच निवडणुकीच्या आधी युती होऊ शकत असताना एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा केली आणि केंद्रीय आणि राज्य भाजपाला सुद्धा याचा धक्का बसला. पुढे हेच एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यावर आपोआप त्या घाईघाईने केलेल्या घोषणेचा अन्वयार्थ उमजला.


विधानसभेचा निकाल लागल्या लागल्या पवारांनी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देऊन भाजपाकडे मैत्रीचा हात पसरला. शिवसेना धुसफूस करत युतीत सामील झाली परंतु 25 वर्षांच्या अभेद्य युतीत अविश्वासाची ठिणगी टाकण्यात शरद पवारांना यश आले होते.


नंतर शिवसेना सत्तेत आणि भाजपाची विरोधक म्हणूनच काम करू लागली. 2014 ते 2017 शिवसेनेने भाजपाला प्रचंड त्रास दिला. इतका की मोर्चे काढून ही गर्दी कशाला मोदींच्या मयतीला या पद्धतीच्या घोषणा दिल्या. या पार्श्वभूमीवर 2017 साली भाजपा नेते , पवार, प्रफुल पटेल यांची अदाणी यांच्या घरी भेट झाली आणि राष्ट्रवादीला सरकार मध्ये घेण्याची चर्चा झाली. परंतु शिवसेनेला सोडण्याची अट पवारांनी घातली आणि भाजपाने मात्र शिवसेनेला सोडण्यास नकार दिला. आमची 25 वर्ष युती आहे आम्ही त्यांना सोडू शकत नाही हे भाजपा नेतृत्वाने सांगितले.


परंतु यामुळे 2017 ते 2019 राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षावरील सरकारी कारवाईचा वेग मंद झाला. छगन भूजबळ अटक झाले तरी पवारांच्या पत्रानंतर त्यांना तत्काल सोडले गेले. जरंडेश्वर साखर कारखाना आणि 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा दोन्हींची चौकशी थंडावली. या दोन वर्षात पवारांनी उद्धव रावांच्या मनात संजय राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा पेरण्यात यश मिळवले.


2019 साली केंद्रीय नेतृत्व विरोधात असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी युती करून लढण्याचा निर्णय घेतला आणि स्पष्ट बहुमत मिळवले. परंतु उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या पारड्यात वजन टाकून मुख्यमंत्रीपद बळकावले.


अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांचे सख्य 2017 पासून वृद्धिंगत होत गेले. नेतृत्व क्षमता असूनही मोकळीक न मिळणे आणि शरद पवारांचा कन्येकडे वारसा हस्तांतरित करण्याचा कल या दोन गोष्टींच्या मुळे अजित पवार अस्वस्थ होते , ते एक दोन वेळा आऊट ऑफ रिच होऊन त्यांनी आपली नाराजी दाखवली होतीच. 2019च्या घडामोडीत उद्धव ठाकरे यांच्यासारख्या अनुभवी माणसाच्या हातात राज्यशकट जाणार आणि आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करावे लागणार यामुळे अस्वस्थ अजित दादांनी शरद पवारांना विश्वासात घेऊन पहाटेचे बंड केले. परंतु पवारांनी आपल्या पुतण्याच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना माघारी येण्यास भाग पाडले. यात पवारांची पक्षातील दुसर्‍या क्रमांकाचा नेता ही प्रतिमा उध्वस्त व्हावी आणि सुप्रिया सुळेंच्या पदोन्नतीचा मार्ग प्रशस्त व्हावा हा प्रयास होता. त्याच प्रमाणे दादांची समाजातील आक्रमक नेता ही प्रतिमा उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र होते. जोडीला भाजपाला तोंडघशी पाडून त्यांची केविलवाणी अवस्था करण्याचा कट होता आणि हे सगळे शरद पवारांनी साधले.


2019 ते 2022 ची उद्धव ठाकरे यांची कारकीर्द हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. इतका अकार्यक्षम , अनुभवी, खुनशी आणि बालिश मुख्यमंत्री आजवर कोणत्याच राज्यात झाला नसेल. त्यांच्या हाताखाली काम करण्याची शिक्षा अजित पवार अनुभवत होते. या पार्श्वभूमीवर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे कारस्थान सरकार मध्ये सुरू झाले आणि त्याला शरद पवारांचा आशीर्वाद आहे हे अजित पवारांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी योग्यवेळी देवेंद्र फडणवीस यांना सावध केले. एकनाथ शिंदेंचे बंड अजित दादांना माहिती होते आणि त्यांनी ते घडू दिले. त्याच वेळी त्यांनी स्वतःच्या सुद्धा त्याच पद्धतीच्या बंडाची भाजपाकडून संमती मिळवून ठेवली होती.


त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ अजित पवार सुद्धा शरद पवारांची साथ सोडून भाजपाकडे आले. त्यावेळी अजित पवारांच्या बरोबर आलेला प्रत्येक शिलेदार ईडीच्या संभाव्य कारवाई पासून वाचण्यासाठी , पवारांच्या दडपण ठेवणार्‍या राजकारणापासून मुक्त होण्यासाठी आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या अनिच्छेतून भाजपाशी हात मिळवणी करत होता. थोडक्यात त्यांनी परतीचे दोर कापूनच अजित पवारांच्या बरोबर येणे स्वीकारले होते.


महापालिका निवडणुकीनंतर परत एकदा अदाणी यांच्या मध्यस्थीने शरद पवार आणि भाजपा यांचे मनोमिलन घडवण्याचा प्रयास झाला. त्यात शरद पवार गट हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये विलीन होईल आणि मग शरद पवार सुद्धा एनडीए चा भाग होतील. यातून कदाचित सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद देण्याचे सुद्धा आश्वासन दिले गेले असेल. या आश्वासनामुळे सुप्रिया सुळे आजवरचा भाजपा विरोध त्यागून सरकार मध्ये सामील होण्यास तयार झाल्या होत्या. त्यांचे अदाणी यांना मोठा भाऊ म्हणणे , त्यांचे मी ऐकते हे सांगणे याच दृष्टिकोनातून जाणून घेतले पाहिजे. परंतु या सगळ्या घटनाक्रमात राज्य पातळीवर आणि पक्ष म्हणून अजित पवारांचे नेतृत्व मान्य करणे हा सर्वात महत्वाचा भाग अधोरेखित झाला होता.


ही सगळी पार्श्वभूमी अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या नंतर घडलेल्या राजकारणाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.


अजित दादांच्या अकाली आणि धक्कादायक निधनाच्या नंतर ही प्रक्रिया गतिमान होईल आणि सत्तेचे आणि पक्षाचे संपूर्ण सुकाणू सुप्रिया सुळे यांच्या हातात येईल अश्या पद्धतीची नेपथ्यरचना शरद पवारांनी सुरू केली आणि त्यामुळे अजित पवारांचे सगळे विश्वासू शिलेदार अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दुःखाचे सावट बाजूला सारून सुनेत्राताईंना पक्षाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्याची वेळ आली.


जो घटनाक्रम पवार पिता आणि पुत्रीला घडवायचा होता त्याला भाजपाच्या मदतीने अजित दादांच्या निष्ठावंत मंडळींनी मात दिली. आता भविष्यात दोन्ही पक्षांचे विलीनीकरण जरी झाले तरी राज्यातील आणि पक्षातील नेतृत्व हे सुनेत्राताईंच्या हातातच असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कधीही मान्य नसेल त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण ही तर खूप दूरची गोष्ट आहे आता भविष्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक झाल्याचे दिसून येईल असेच चित्र आहे.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page