शेकडो पायांची गोम – शरद पवार !!!
- dhadakkamgarunion0
- 9 hours ago
- 4 min read
संपादकीय
अभिजीत राणे
शेकडो पायांची गोम – शरद पवार !!!
शरद पवार ही एक व्यक्ति नाही तो एक विचार आहे. शरद पवार ही एक व्यक्ति नाही ती एक वृत्ती आहे. शरद पवार ही एक व्यक्ति नसून विशुद्ध उद्योजकता आणि वैश्य वृत्ती यांचा अनुपम संगम आहे. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या सगळ्या राजकारणावर मात करत भाजपला बहुमत मिळवून दिले आणि मुख्यमंत्रीपद त्यांना मिळणार हे निश्चित झाले. 123 जागा असणार्या भाजपाला युतीतील जुना साथीदार शिवसेनेची मदत लागणार हे उघड होते परंतु शिवसेनेने काहीही बोलण्यापूर्वी पवारांनी भाजपाला विनाशर्त आणि बाहेरून पाठिंबा घोषित केला आणि त्यामुळे शिवसेना भाजपा संबंधात पहिली अविश्वासाची ठिणगी पडली. पवारांना काय लाभ झाला.. आत्मिक पातळीवर देवेंद्रजींच्या गुड बुक्स मध्ये जात त्यांनी पुढील पाच वर्षात आपल्यावर आणि आपल्या सहकार्यांवर कठोर कारवाई होऊ नये याची त्यांनी तजवीज केली.
शरद पवार हे अत्यंत बुद्धिमान राजकारणी आहेत त्यांनी ज्या ज्या वेळी सत्ता मिळाली , त्या त्या वेळी अनेक संस्थांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आणि हे नियंत्रण त्यांनी अश्या पद्धतीने प्रस्थापित केले आहे की या सगळ्या संस्थांचे तहाहयात अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहील , अध्यक्षपद नसले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण त्यांच्याकडेच राहील आणि मारवाडी ज्या पद्धतीने चार आणे की पार्टनरशिप करतात तसे या संस्थांमधून त्यांच्याकडे पैशाचा ओघ अव्याहतपणे प्रवाहीत होतच राहील. या सगळ्या संस्था या वेगवेगळ्या क्षेत्रातील बहुसंख्य मंडळींशी निगडीत आणि संबंधित असतात. त्यामुळे त्या माध्यमातून पवारांचा एक स्वतःचा जनाधार सुद्धा निर्माण झालेला आहे. पवारांचे हे अध्यक्षपद धोरण क्रीडा क्षेत्रात क्रिकेट पासून कबड्डी कुस्तीपर्यंत आहे. सहकारात दूध संघ , साखर कारखाने संघ , वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट सारखी संस्था किंवा रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था या माध्यमातून प्रचंड विस्तारले आहे. त्यामुळे सत्तेत असो नसो पवारांचा प्रभाव कायम असतो. सत्तेत असो नसो पवारांच्या कडील लक्ष्मीचा प्रवाह कधीही आटत नसतो. त्या अर्थाने शरद पवार ही शेकडो पाय असणारी गोम आहे.
गेल्या 11 वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ज्ञात असणारे उत्पन्नाचे स्त्रोत आटवण्याचा प्रयास केला परंतु ते विफल ठरले आहे हे वेळोवेळी दिसून येत आहे. अर्थात या गोमेचे कितीही पाय फडणवीस यांनी तोडले तरी गोम आपल्या गतीने चालतच आहे.
नुकतेच उघड झालेले प्रकरण म्हणजे वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट. १९७५ साली पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ची स्थापना झाली. याआधी ही संस्था ‘डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट’ म्हणून ओळखली जात होती. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादकांनी एकत्र येऊन साखर उद्योगाच्या वैज्ञानिक उन्नतीसाठी ही संस्था उभी केली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे या संस्थेला नवे रूप मिळाले आणि ती त्यांच्या नावाने ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल अशी तरतूद वसंतदादांनी केली होती. 1978 साली शरद पवारांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या नियम बदल करून संस्थेचे तहहयात अध्यक्षपद मिळवले. आजतागायत या संस्थेचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडेच आहे.
१९५०च्या दशकात मुंबई राज्य सरकारने साखर कारखान्यांच्या स्थापनेसाठी सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले. त्यातून साखर उद्योगाचा विस्तार झाला, पण संशोधन आणि तांत्रिक मार्गदर्शनाची गरज भासू लागली. याच गरजेतून वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची निर्मिती झाली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे साखर उद्योगाशी संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक आणि शैक्षणिक कार्य एकाच छत्राखाली पार पाडणे. संस्था तीन मुख्य माध्यमांतून कार्य करते:
• शैक्षणिक विभाग: ऊस उत्पादन, साखर प्रक्रिया, पर्यावरणीय विज्ञान, अल्कोहोल तंत्रज्ञान, जैवइंधन, ऊस वाण निर्मिती, ऊस रोगनियंत्रण, ऊस कीटकशास्त्र, ऊस मृदशास्त्र, ऊस ऊतकसंवर्धन इत्यादी विषयांवर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात.
• संशोधन विभाग: ऊस वाणांचे संशोधन, जैविक खतांचे परिणाम, ऊसाच्या उत्पादनक्षमतेवर हवामानाचा परिणाम, साखर प्रक्रिया सुधारणा, ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरणीय टिकाव यावर संशोधन केले जाते.
• विस्तार विभाग: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, कार्यशाळा, प्रात्यक्षिके आणि शेतशाळा यांद्वारे ज्ञान प्रसार केला जातो.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने साखर उद्योगात खालील क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे:
• ऊस वाण संशोधन: VSI ने उच्च उत्पादनक्षम, रोगप्रतिरोधक ऊस वाण विकसित केले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली.
• ऊस उत्पादन तंत्रज्ञान: ठिबक सिंचन, जैविक खतांचा वापर, माती परीक्षण, हवामान आधारित सल्ला यामुळे उत्पादन खर्चात घट आणि गुणवत्तेत वाढ झाली.
• साखर प्रक्रिया सुधारणा: नवीन यंत्रणा, ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरणीय टिकाव यावर आधारित तंत्रज्ञान विकसित करून कारखान्यांची कार्यक्षमता वाढवली.
• शैक्षणिक योगदान: हजारो विद्यार्थी आणि संशोधकांना साखर उद्योगाशी संबंधित शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन उद्योगात कुशल मनुष्यबळ निर्माण केले.
• जैवइंधन आणि पर्यावरणीय संशोधन: VSI ने अल्कोहोल तंत्रज्ञान, बायोगॅस, इथेनॉल उत्पादन, साखर उद्योगातील कचऱ्याचे व्यवस्थापन यावर संशोधन करून पर्यावरणपूरक उपाय सुचवले.
ही सकारात्मक बाजू झाली आता याची राजकीय आणि आर्थिक बाजू समजून घेऊया. गेल्या 11 वर्षात ( 2013-2024 ) महाराष्ट्रात 104.096 लाख टन इतके ऊस उत्पादन झाले आहे.
समस्त साखर कारखानदार आपल्याकडे आलेल्या ऊसाच्या प्रत्येक टनामागे एक रुपया या संस्थेला देतात. याचा अर्थ समस्त साखर कारखानदारांनी वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटला गेल्या 11 वर्षात 104 कोटी रुपये दिले आहेत. वर्षाला साधारण 10 कोटी रुपये गृहीत धरा..
हा फक्त येणारा एक निधी सांगितला आहे. बाकीचे पैसे वेगळे.. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी 1978-2024 असे 46 वर्ष सातत्याने कोणत्याही साखर कारखान्याला जो ऊस घालतो आहे त्यातील प्रत्येक टनामागे एक रुपया वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडे खर्च करायला पोचतो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच टनामागे जो एक रुपया संस्थेला मिळतो आहे त्याचा विनियोग कसा केला याची चौकशी सुरू केली आहे आणि त्यामुळे शरद पवार आणि त्यांचे सहकारी भडकले आहेत. देवेंद्र फडणवीस हे कसे शेतकरी द्वेष्टे आहेत हा प्रचार कालपासून सुरू झाला आहे. परंतु यामागील सत्य हा एक रुपयाचा हिशोब लावणे हा आहे. यात शेतकर्यांचा कुठेही संबंध नाही.. असलाच तर त्यांना जो टनामागे एक रुपयाचा भुर्दंड बसतो आहे तो थांबेल का ? किंवा त्या पैशाचा खरच त्यांना काही उपयोग होईल का इतकाच असू शकतो.
या चौकशीच्या माध्यमातून देवेंद्रजी पवार रूपी गोमेचा अजून एक पाय तोडण्यात यशस्वी होतील.. पण हे असे किती पाय आहेत हे शरद पवारांनाच माहिती.








Comments