महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला पूर्णविराम
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला पूर्णविराम
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. मात्र, या सर्व चर्चांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कुठलाही तणाव नसून, हे केवळ काही माध्यमांनी निर्माण केलेले चित्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुराव्याच्या बातम्या फेटाळून लावल्या. ‘हा वेड्यांचा बाजार सुरू आहे आणि यामध्ये काही माध्यमे वेडी झाली आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. हुतात्मा स्मारक आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटी आणि संवाद झाला नसल्याचे दाखवले गेले, पण त्यात काहीच तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आल्यावर आणि जाताना आम्ही भेटलो. ते कुठे जात आहेत हे त्यांनी सांगितले आणि मी कुठे जातोय हे त्यांना सांगितले. न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही.’ महायुतीत कोणताही तणाव नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्या स्पष्टीकरणामुळे महायुती स्थिर असल्याचा संदेश मित्रपक्षांना आणि कार्यकर्त्यांना मिळाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकजुटीने उतरण्याची गरज असताना, अशा चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती. मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केल्यामुळे, आता महायुती पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणूकीला सामोरे जाईल.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments