फडणवीसांची वाहतूक कोंडी संपवण्यासाठी मोठी घोषणा
- dhadakkamgarunion0
- 5 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
फडणवीसांची वाहतूक कोंडी संपवण्यासाठी मोठी घोषणा
● मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. भुयारी मार्गांच्या एका विशाल जाळ्याला त्यांनी मिश्किलपणे 'पाताळ लोक' असे नाव दिले आहे. सध्याच्या रस्त्यांना समांतर असे हे भूमिगत नेटवर्क मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी 'शॅडो नेटवर्क' म्हणून काम करेल. या प्रकल्पांमुळे येत्या तीन वर्षांत मुंबई शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या नवीन समांतर मार्गांवर वाहनांचा सरासरी वेग ८० किमी प्रति तास पर्यंत पोहोचू शकेल. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सुमारे ६०% वाहतूक कोंडी कमी करण्यावर या योजनेत प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल, कारण सध्या मुंबईतील सर्वाधिक वाहतूक याच महामार्गावरून चालते. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन असून, महत्त्वाचे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्ग जोडले जाणार आहेत. फडणवीस यांनी केवळ भुयारी मार्गांचीच नव्हे, तर संपूर्ण मुंबईतील वाहतूक सुधारणेसाठीच्या व्यापक धोरणाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उपनगरीय रेल्वेने दररोज सुमारे ९० लाख नागरिक प्रवास करतात. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी, या सर्व उपनगरीय सेवा टप्प्याटप्प्याने वातानुकूलित केल्या जातील, मात्र दुसऱ्या श्रेणीच्या भाड्यात एक रुपयाचीही वाढ होणार नाही. 'मुंबई इन मिनिट्स' या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी रस्ते, मेट्रो आणि कोस्टल रोड यांच्या समन्वयातून अखंड आणि जलद प्रवासाचे जाळे तयार केले जात आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments