top of page

टेरिफ वाढ – आपदा मे अवसर !!!

  • dhadakkamgarunion0
  • Aug 29
  • 4 min read

🖋️🖋️विशेष संपादकीय🖋️🖋️

.................................

.................................

अभिजीत राणे

टेरिफ वाढ – आपदा मे अवसर !!!

भारतावर अमेरिकेने 50 टक्के टेरिफ लावले आणि भारतातील आंदोलनजीवी , अराजकतावादी , इंडिया आघाडीचे विघ्नसंतोषी नेते आणि परकीय पैशावर पोसला जाणारा मिडिया हे सगळे लोक प्रचंड आनंदी झाले. कारण नरेंद्र मोदींना सत्तेवरून दूर करणे हा एकमेव कार्यक्रम राबवणार्‍या या लोकांना यातून एक सुसंधी दिसली. अशी सुसंधी जिचा वापर करून ते समाजात असंतोष निर्माण करू शकतात.

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या ई पेपरने हा दुष्प्रचार सुरू सुद्धा केला आहे. टेरिफ लागू होऊन चार दिवस झाले आहेत आणि बीबीसीच्या ई पेपर मध्ये बातम्या येत आहेत की टेरिफ लागल्यामुळे सोलापूर मधील वस्त्रोद्योग आर्थिक अडचणीत आले आहेत. कामगारांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड पडणार आहे. या धादांत खोट्या बातम्या आहेत.

सगळ्यात पहिल्यांदा टेरिफ म्हणजे काय हे समजून घ्या.

आपण अमेरिकेला जी उत्पादने विकतो समजा त्यांचे देशांतर्गत मूल्य 100 रुपये असेल तर आपण अमेरिकेला विकतानाच ते 200 रुपयांना विकतो कारण अमेरिकेला निर्यात करण्यासाठीचे मानक कठोर आहेत. त्या दर्जाचे कापड किंवा कोणतेही उत्पादन बनवणे हे 20 ते 25 % अतिरिक्त खर्चिक असते. त्याच प्रमाणे वाहातूक खर्च इत्यादि लक्षात घेतले तर तसेही अमेरिकेला जाणारे उत्पादन हे 200 रुपयांना जात असते. त्यात पण अमेरिकेने जर 50 % टेरिफ लावला तर ते उत्पादन अमेरिकन बाजारपेठेत अधिकच महाग होईल.. कदाचित 400 रुपयांना ते विकले जाईल.

पण हे विकणारी कंपनी अमेरिकन आहे. भारतीय व्यापार्‍याकडून घेणारी कंपनी सुध्दा अमेरिकन आहे. त्यामुळे भारतीय विक्रेता नेहमीच्या किंमतीला सामान विकणार आहे. त्याचा नफा कायम आहे. टेरिफ मुळे ते उत्पादन अमेरिकेत विकणे हे त्या विक्रेत्या कंपनीवर आलेले दडपण आहे. याचा भारतातील उत्पादकावर काहीही दबाव नाही.

याचा परिणाम काय होईल ??

आपली वस्त्रोद्योगातील उत्पादने , हीरे , दागिने आणि बासमती तांदूळ यासारखी उत्पादने अमेरिकन बाजारपेठेत दुप्पट किंमतीला विकली जाऊ लागतील. त्यामुळे अर्थातच या उत्पादनांची मागणी कमी होईल आणि त्यामुळे भारतातील उद्योजक आणि व्यापारी यांचे नुकसान होईल.

काही अंशी हे खरे आहे.

पण असे घडू नये म्हणून भारत सरकार काय करत आहे ???

आपण ब्रिटनशी मुक्त व्यापार करार केला आहे त्यामुळे अमेरिकेत जाणारी आपली उत्पादने ब्रिटन मध्ये विकली जाऊ शकतात.

ब्रिक्स देश सुद्धा एकत्र येऊन भारतीय उत्पादने खरेदी करायला उत्सुक आहेत. नाटो ही अमेरिकेने स्थापन केलेली संघटना आहे. तिचे अमेरिका वगळता अन्य देश भारताकडून ही उत्पादने खरेदी करण्याचा प्रस्ताव देत आहेत. चीन आणि रशियाने सुद्धा भारतीय उत्पादनांच्या साठी आपली बाजारपेठ मोकळी करून दिली आहे. भारत सरकारने सुद्धा अमेरिका वगळता इतर देशांशी संवाद साधत आपल्या मालासाठी वेगवेगळ्या बाजारपेठा शोधण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे अमेरिकेने टेरिफ लादल्यामुळे आपला अमेरिकेशी होणारा व्यवहार कमी झाला तरी पूर्ण शून्य होणार नाही. पण साधारण 50 % तरी फरक नक्की पडेल.

भारताची अमेरिकेला होणारी वार्षिक निर्यात 87 बिलियन डॉलर्स इतकी आहे. यात औषधी व्यवसाय 10 टक्के आहे. ऑइल आणि एनर्जी व्यवसाय 7 टक्के आहे. इंजिनियरिंग उत्पादनांचा हिस्सा 48 टक्के आहे आणि अन्य घटकांचा वाटा उर्वरित आहे. त्यात तांदूळ आदि अन्न घटक 10 टक्के असून बाकीचे प्रक्रिया केलेले अन्न घटक आहेत.

अमेरिकेने स्वतःच्या देशात क्षोभ निर्माण होऊ नये म्हणून औषधी आणि ऑइल व एनर्जी उत्पादने या टेरिफ च्या बाहेर ठेवली आहेत. अर्थात 17 % माल जुन्याच दराने स्वीकारला जाणार आहे. खरा फटका औद्योगिक उत्पादनांना बसणार आहे. अन्न घटकांना बसणारा फटका नाममात्र असेल कारण आपली उत्पादने यापूर्वी सुद्धा सर्वात महाग विकली जात असत. भारतीय बासमती तांदूळ हा पाकिस्तान आणि अन्य देशांच्या पेक्षा यापूर्वी पण महाग होता आणि तरीही तितकाच चवीने घेतला जात होता. त्यामुळे आता भाव वाढला तरीही या प्रिमियम दरावर सुद्धा तो घेतला जाईलच यात काहीही संशय नाही.

औद्योगिक उत्पादनांना फटका बसणार असला तरीही उद्योगांना त्याचा परिणाम जाणवू नये म्हणून सरकारने जी एस टी चे दर कमी करून देशांतर्गत मागणी वाढावी याची तरतूद केली आहे. आणि अन्य मार्केटचा शोध व्यापारी आणि उद्योजकांच्या जोडीने सरकार सुद्धा घेत आहे आणि उद्योगांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत आहे. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारत एकूण जितकी निर्यात करतो त्याच्या फक्त 17 % निर्यात तो अमेरिकेला करतो. आपले उद्योजक आणि व्यापारी 83 % माल इतर देशांनाच विकत होते त्यामुळे सुद्धा आपल्याला या टेरिफमुळे फार फरक पडणार नाही. म्हणूनच या परिस्थितीत हातपाय गाळण्यासारखे काहीही नाही.

जोडीला पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड हा संदेश देत भारतीयांना जागतिक उत्पादन केंद्र बनण्यासाठी कार्यरत होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्याच्या दृष्टीनेच धोरणे आखली जात आहेत.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अमेरिकेने 50 % नाही 200 % टेरिफ लावला तरीही भारताला काहीही फटका बसू नये असे नियोजन पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यामुळे मिडियाच्या या खोट्या वातावरण निर्मितीला बळी पडू नका...

जाता जाता एक किस्सा सांगतो. भारतातील तगर नावाचे एक गाव, ज्याचे आजचे नाव तेर आहे, जे आपल्या धाराशीव जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे... त्या गावातील कापड रोमन साम्राज्यात प्रचंड प्रसिद्ध होते. तगर चे वस्त्र धारण करणे ही तत्कालीन अमीर उमराव समाजात प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. त्यामुळे तगर इथला कापड व्यवसाय प्रचंड तेजीत होता. तिथल्या कापडाची मागणी रोमन साम्राज्यात इतकी वाढली की त्यामुळे त्यांच्याकडील स्थानिक कापड उद्योग बंद पडण्याची वेळ आली.

तत्कालीन रोमन सम्राट अलेक्झांडर द ग्रेट अर्थात सिकंदर याच्यापर्यंत ही तक्रार गेली त्यामुळे त्याने तगर येथून येणार्‍या कापडावर प्रचंड कर लादला परंतु त्यामुळे अधिकच महाग झालेले हे तगरचे कापड रोमन श्रीमंतांसाठी आपली श्रीमंती दाखवण्याचे एक मानक बनले आणि या कापडाची मागणी अधिकच वाढली. भारताच्या समृद्धीच्या आणि श्रीमंतीच्या कथा ऐकून तर सिकंदराला भारतावर स्वारी करण्याची इच्छा झाली.

त्यामुळे अमेरिकन बाजारपेठेत अत्यंत महाग झालेले हिर्‍याचे दागिने आणि सोन्याचे दागिने अधिक आवडीने विकत घेतले जातील. भारतातून आलेला अत्यंत महाग बासमती तांदूळ खाणे हे श्रीमंतीचे लक्षण सिद्ध झाल्याने तो अधिकच प्रमाणात विकला जाईल. त्यामुळे टेरिफ वाढ हे शस्त्र जारी डोनाल्ड ट्रंप यांनी उगारले असले तरी त्याचा एकूण परिणाम भारताची निर्यात वाढणे आणि अमेरिकन बाजारात भारतीय उत्पादनांना अधिकच मागणी येण्यात रूपांतरित होईल यात संशय नाही. थोडक्यात ट्रंप यांचा हा साहसवाद त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता अधिक आहे.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page