टाळेबंदीच्या अफवा पसरवणारे 'देशद्रोही', मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा
- dhadakkamgarunion0
- Mar 31
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
टाळेबंदीच्या अफवा पसरवणारे 'देशद्रोही', मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा
● आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक देशात आणि राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू होणार असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणे हा निव्वळ बेजबाबदारपणा नसून तो एक प्रकारे देशद्रोहच आहे, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जनतेमध्ये विनाकारण घबराट निर्माण करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकार आता कठोर पावले उचलणार आहे. राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा भासणार असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरवली जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, भारताचे राजनैतिक संबंध आणि केंद्र सरकारचे नियोजन यामुळे देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची किंवा गॅस सिलिंडरची साठेबाजी करण्याची अजिबात गरज नाही. पुरवठा साखळी विस्कळीत झालेली नसून सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला विश्वास दिला आहे की, महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचे निर्बंध किंवा टाळेबंदी लावण्याच्या विचारात नाही. शेजारील देशांमध्ये जरी काही समस्या असल्या, तरी भारताची अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन मजबूत आहे. नागरिकांनी केवळ अधिकृत सरकारी घोषणांवरच विश्वास ठेवावा आणि कोणत्याही चिथावणीखोर किंवा भीतीदायक मेसेजला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



Comments