top of page

छत्तीसगडमधील वेदांताच्या कारखान्यातील बॉयलर चा स्फोट...

  • dhadakkamgarunion0
  • 5 hours ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

छत्तीसगडमधील वेदांताच्या कारखान्यातील बॉयलर चा स्फोट हा अतिशय वेदनादायी अपघात आहे. ज्या २० कुटुंबांनी सर्वस्व गमावलं. त्यांना योग्य नुकसानभरपाई, रोजगाराची हमी आणि सखोल चौकशी मिळालीच पाहिजे. पण चौकशीपूर्वीच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यावर एफआयआर दाखल करणं गंभीर प्रश्न निर्माण करतं. अग्रवाल हे साध्या पार्श्वभूमीतून उभे राहिलेले, स्वतःच्या मेहनतीने जागतिक उद्योग उभारणारे उद्योजक आहेत. त्या प्रकल्पाच्या दैनंदिन कामकाजाशी त्यांचा थेट संबंध नव्हता. सार्वजनिक क्षेत्रातील कारखान्यांत किंवा रेल्वेत अपघात झाले तर अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला जातो का? होत नाही. मग खासगी क्षेत्रात वेगळा न्याय का? चौकशी करा, जबाबदारी पुराव्याने ठरवा आणि मग कारवाई करा. भारताच्या ‘विकसित भारत’ दृष्टिकोनाला अग्रवालसारख्या गुंतवणूकदारांची गरज आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवणं हेच खरी जबाबदारी आहे

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सत्तांतरानंतर सीरिया आमुलाग्र बदलला आहे. आणि हे खूप प्रेरणादायी आहे. एकेकाळी कट्टरपंथी विचारसरणीने ग्रासलेला हा देश होता त्यावेळी त्याची ओळख रक्तपात, युद्ध आणि अस्थिरता होती, आज इस्लामच्या खर्‍या शिकवणीला आत्मसात करून विकासाच्या मार्गावर चालतो आहे. कट्टरपंथापासून स्वतःला दूर करून त्यांनी शांतता, व्यापार आणि प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.. परस्परांच्या बद्दल प्रेम , चांगुलपणा आणि विकासाकडे वाटचाल हेच धर्माचे खरे स्वरूप असते. सऊदी, कुवैत, अमिरात यांनीही इस्लामच्या शिकवणीप्रमाणे स्वतःला बदलून आधुनिकतेकडे वाटचाल केली आणि जगाला दाखवले की धर्माचा अर्थ विनाश नव्हे तर उन्नती आहे. भारतातील मुसलमानांनीही हेच पाहावे. चांगल्या लोकांशी जोडून घ्यावे, सकारात्मक उदाहरणे घ्यावीत. कट्टरपंथ तुम्हाला ना तुम्हाला पृथ्वीवर आणि स्वर्गात कुठेही सुखी ठेवू शकणार नाही. शिक्षण, प्रगती आणि शांतता हाच मानवाच्या विकासाचा शाश्वर मार्ग आहे जो समाजाची उन्नती घडवतो आणि भविष्य उज्ज्वल करतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी मांडलेला युक्तिवाद की मोदींनी २०२९ च्या निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी परिसीमनाचा वापर केला आहे, हा अगदीच बालीश आणि निराधार आहे. भारताच्या घटनेत परिसीमनासाठी स्वतंत्र आयोगाची तरतूद आहे आणि त्या आयोगाला निष्पक्षपणे काम करावे लागते. निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी असताना अशा आरोपांना काहीही आधार नाही. मोदींच्या कार्यकाळात जनतेचे जीवनमान सुधारले आहे, आर्थिक स्थैर्य वाढले आहे आणि देशाची तुलना शेजारील राष्ट्रांशी केली तर भारत निश्चितच पुढे आहे. अशा परिस्थितीत मोदींना पराभवाची भीती वाटते असे बोलणे हा केवळ राजकीय गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांनी खोट्या आरडाओरडीत वेळ घालवण्याऐवजी जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

२०२३ मध्ये पास झालेलं महिला आरक्षण विधेयक पुन्हा नव्या अटींसह मांडलं गेलं आणि ते पास होऊ शकलं नाही, यावर जनता योग्य प्रश्न विचारते आहे. विरोधक सोडा, समर्थक जनतेलाही उत्तर हवं आहे की आधीच लागू झालेलं विधेयक पुन्हा का आणलं? पण कुणीही स्पष्ट स्वीकारार्ह उत्तर देत नाही. मग सततच्या लाईव्ह भाषणांना अर्थ काय? सर्वांना कळलं आहे की हा निवडणुकीचा मास्टरस्ट्रोक आहे—आरक्षण खरं तर द्यायचं नाहीये, फक्त राजकीय फायदा घ्यायचा आहे. महिला आरक्षणाला ढाल बनवून जनतेला भ्रमित करणं ही लोकशाहीची थट्टा आहे. खरी प्रामाणिकता म्हणजे दिलेलं वचन पाळणं, नुसते खेळ खेळणं नव्हे. जनतेचा विश्वास टिकवायचा असेल तर आरक्षण तातडीने लागू करावं लागेल, अन्यथा हा डाव उघडकीस आला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कल्याण बॅनर्जींनी मांडलेले मुद्दे महिला आरक्षणाच्या चर्चेत महत्त्वाचे ठरतात. त्यांचा प्रश्न साधा आहे—जर खरंच महिलांना ३३% आरक्षण द्यायचं असेल तर ते विद्यमान ५४३ जागांमध्ये तातडीने लागू करा किंवा थेट ५०% प्रतिनिधित्व द्या. मंत्रीमंडळ, स्पीकर पद, पंतप्रधानपद यांसाठीही महिलांना संधी द्या. पण सरकारने आरक्षणाला परिसीमनाशी जोडून राजकीय डाव साधला आहे. भाजपकडे स्वतःच्या पक्षात महिलांचे प्रमाण कमी आहे, तर तृणमूलने जवळपास ४०% पेक्षा जास्त महिलांना संधी दिली आहे. मग प्रश्न असा की महिलांना खरंच सशक्त करायचं आहे की फक्त निवडणुकीसाठी भावनिक खेळी करायची आहे? जनगणना पूर्ण न होता परिसीमनाची घाई, अधिवेशनाची वेळ, हे सारे संशयास्पद आहे. आरक्षण हे संविधानिक असावे, राजकीय नौटंकी नव्हे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page