🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पूजाच्या माघारीतला जनतेचा इशारा
पूजा मोरे यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घटना ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही; ती भाजपच्या निर्णयप्रक्रियेतील गंभीर त्रुटी दाखवते. भाजपविरोधी आंदोलनांतून आलेली, अनेक पक्ष बदललेली आणि पहलगाम हल्ल्यावरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली व्यक्ती थेट पुण्यातून उमेदवार म्हणून पुढे करणे हे निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्याय ठरले. सोशल मीडियावर तिच्या भूतकाळाचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आणि जनतेचा रोष उफाळून आला. अखेर अर्ज मागे घ्यावा लागला. हा प्रसंग स्पष्ट करतो की मतदार फक्त आघाड्या, युती किंवा प्रचारावर विश्वास ठेवत नाहीत; ते उमेदवाराचा भूतकाळ आणि पक्षाची भूमिका पाहतात. भाजपने वेळोवेळी अशा चुका केल्या तर जनतेचा विश्वास ढासळेल. पूजाच्या माघारीतून महाराष्ट्र भाजपला मिळालेला हा इशारा दुर्लक्षित करणे म्हणजे भविष्यातील पराभवाला आमंत्रण देणे होय.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारतीय अर्थव्यवस्थेचा चौथा क्रमांक
भारतीय अर्थव्यवस्थेने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ७.४% वाढ साध्य करेल असा अंदाज फिच आणि इक्रा यांनी वर्तवला आहे. ही वाढ पूर्वीच्या सर्व अंदाजांपेक्षा जास्त असून सुमारे १.३५ लाख कोटी रुपयांच्या उत्पादनवाढीचे प्रतीक आहे. कालच भारताने अधिकृतरीत्या जाहीर केले की जपानला मागे टाकून भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ही कामगिरी भारतीय जनतेच्या श्रम, उद्योग आणि सेवाक्षेत्राच्या सामर्थ्याचे द्योतक आहे. विरोधकांनी मृत अर्थव्यवस्था म्हणून हिणवलेली भारताची आर्थिक घोडदौड आता जागतिक स्तरावर मान्यता मिळवत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून ही उपलब्धी राष्ट्रीय अभिमानाची आहे. पुढील आव्हान म्हणजे ही वाढ सर्वसामान्यांच्या जीवनमानात कशी उतरवायची. आर्थिक प्रगतीचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला तरच चौथा क्रमांक खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बिनविरोध निवडणुकीतील गोंधळ
मनसेने २९ मनपांच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या ६६ उमेदवारांविरुद्ध कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाराष्ट्र टाइम्सच्या आकडेवारीनुसार असे ६९ उमेदवार विजयी झाले असून त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि एक अपक्ष यांचा समावेश आहे. गंमत अशी की मनसेने फक्त भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्धच तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे, तर राष्ट्रवादी व अपक्षांविरुद्ध कोणतीही कारवाई नाही. हे पक्षपाताचे उदाहरण ठरते. याहून महत्त्वाचा प्रश्न असा की मनसेने स्वतः किती प्रभागांत उमेदवार उभे केले होते आणि ते लढाई सुरू होण्याआधीच का माघार घेतले? आत्मपरीक्षण न करता इतरांवर आरोप करणे ही राजकीय सोय आहे. न्यायालयीन लढाईसाठी ठोस पुरावे लागतात; अन्यथा हे प्रकरण केवळ गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपांत अडकून राहील. निवडणुकीनंतरही हे गुऱ्हाळ दीर्घकाळ सुरू राहणार हे निश्चित.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
साहित्य परिषदेतील अध:पतन
साताऱ्यातील साहित्य संमेलनात घडलेली घटना ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही; ती संपूर्ण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या अध:पतनाचे प्रतीक आहे. निवडणुका न घेता संस्था ताब्यात घेणे, आपल्या निकटवर्तीयांना व्यासपीठ व पुरस्कार देणे, विरोधकांचे सदस्यत्व रद्द करणे – हे सर्व लोकशाहीविरोधी कृत्य आहे. कार्यकारिणीवर असणाऱ्या मंडळींचे साहित्यिक योगदान किती? त्यांच्या पुस्तकांना रसिकांनी किती मान्यता दिली? हा प्रश्न गंभीर आहे.साहित्य परिषद ही विचारांचे, संस्कृतीचे आणि लोकशाहीचे व्यासपीठ असायला हवे. परंतु ती आता गटबाजी, खोट्या सह्या आणि सत्तेच्या लोभात अडकली आहे. विश्वस्त मंडळीही डोळे मिटून या भ्रष्टाचाराला पाठबळ देत आहेत. साहित्यिक संस्थेचे राजकारणात रूपांतर होणे ही लाजिरवाणी बाब आहे. परिषदेचे पुनरुज्जीवन पारदर्शकता आणि लोकशाही प्रक्रियेतूनच शक्य आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
गाडीभर पुरावे, रिकामे निष्कर्ष
छत्रपती संभाजीनगरात ७० हजार कोटींच्या घोटाळ्याविरोधात देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी गाडीभर पुरावे शासनाला दिले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात आजही ती आठवण कोरलेली आहे. पण गंमत अशी की गाडीभर पुरावे दिल्यानंतरही निष्कर्ष मात्र शून्यच. भ्रष्टाचाराविरोधात लढाईचे गाजावाजा झाले, पण भ्रष्ट लोक मात्र अजूनही पदावर, सत्तेत आणि प्रभावात आहेत. पुरावे गाडीभर असले तरी न्याय मात्र रिकाम्या हाताने परतला. भ्रष्टाचाराविरोधात लढाई ही घोषणांमध्येच राहिली, कृतीत मात्र ती हरवली. जनता विचारते: गाडीभर पुरावे दिले, पण निकाल कुठे? की पुरावे फक्त राजकीय नाटकासाठी होते? भ्रष्टाचाराविरोधात लढाईचे ढोल वाजवणाऱ्यांनीच भ्रष्टाचाराला कवेत घेतले, हीच खरी शोकांतिका आहे.
🔽







Comments