अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Sep 11
- 3 min read
अभिजीत राणे लिहितात
मुंबईत ‘सर तन से जुदा’चे धक्कादायक प्रकरण ! मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथे घडलेला प्रकार धोक्याची घंटा आहे. ‘सर तन से जुदा’चे घोषवाक्य उराशी बाळगणारे अतिरेकी विचार आता महाराष्ट्राच्या राजधानीत डोके वर काढत आहेत. मुंबई ही फक्त आर्थिक राजधानी नाही तर भारताच्या सामुदायिक सौहार्दाची प्रतिकृती आहे. इथे अशा प्रकारचे घोषवाक्य फक्त कायद्याचा भंग नाही, तर थेट दहशतीची बीजे पेरणारा कट आहे. राज्य सरकारने हे प्रकरण केवळ एक अपघाती घटना म्हणून न पाहता, दहशतवादाच्या गंभीर इशाऱ्यासारखे घ्यायला हवे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होऊन असा विषारी विचारप्रवाह आत्ताच रोखला गेला पाहिजे. मुंबई पोलिसांनी त्वरित चौकशी सुरू केली असली तरी, शासनानेही या घटनेचा राजकीय वा धार्मिक विचार न करता ठामपणे सामना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची परंपरा सहिष्णुतेची आहे; पण सहिष्णुतेच्या नावाखाली अतिरेक्यांना पंख मिळू देणे हा आत्मघात ठरेल.
अभिजीत राणे लिहितात
पोलंड–रशिया तणाव : युद्धाचा भडका की थंड डावपेच? पोलंडने रशियाचे ड्रोन पाडल्याची वार्ता आली आणि लगेचच प्रश्न उभा राहिला—रशिया थेट नाटो राष्ट्रांशी भिडणार का? नाटोच्या पंखाखालील पोलंडवर जर रशियाने प्रतिहल्ला केला, तर तो एकप्रकारे नाटोविरुद्धची युद्धघोषणा ठरेल. पण वास्तवात दोन्ही बाजूंना याची किंमत माहीत आहे. रशियासाठी युक्रेन युद्ध अजूनही ओझं आहे, तर नाटोला थेट संघर्षात उतरल्यास अण्वस्त्रांचा धोका पत्करावा लागेल. त्यामुळे भडक्यापेक्षा सावध हालचाली आणि डावपेच वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. शीतयुद्धकाळात जसा धूर उठला तरी मोठं युद्ध टळायचं, तसंच काहीसं दृश्य आज पुन्हा दिसतंय. ड्रोन घटनेमुळे वातावरण नक्कीच तापलं आहे, पण युद्धाचा भडका उडण्याची शक्यता तितकीशी नाही. तरीही हा प्रसंग युरोपच्या सुरक्षेसाठी गंभीर इशारा ठरत आहे.
अभिजीत राणे लिहितात
भारत अस्थिर नाही, पाकिस्तानच पुढचा देश! काँग्रेस खासदार मनीष तिवारी विचारतात—“श्रीलंकेत झाले, बांगलादेशात झाले, आता नेपाळमध्ये झाले, मग पुढचा देश कोणता?” उत्तर स्पष्ट आहे: भारत नाही. गेल्या तीन वर्षांत शेजारी देशांत भ्रष्टाचार, आर्थिक कोंडी आणि राजकीय अपयशामुळे जनतेचा असंतोष उफाळला. पण भारताची परिस्थिती भिन्न आहे. इथे महागाई गेल्या आठ वर्षांत सर्वात कमी पातळीवर आहे, बेरोजगारी ५.२५% पर्यंत घसरली आहे, आणि GDP वाढ ७.८% वर पोहोचली आहे. उद्योग, पाऊसमान आणि कायदा-सुव्यवस्था या तिन्ही आघाड्यांवर स्थैर्य आहे. मग अशा राष्ट्रात असंतोष कुठून उभा राहील? शाहीन बाग, शेतकरी आंदोलन, भारत जोडो यात्रा अशा अनेक प्रयोगांतून विरोधकांनी प्रयत्न केले, पण जनता त्यांच्या मागे उभी राहिली नाही. सत्तेच्या हव्यासापोटी विरोधकांनी देश अस्थिर व्हावा अशी आशा करणे हीच खरी देशद्रोही वृत्ती आहे. पुढचा देश जर कोणी असेल तर तो पाकिस्तान आहे—कारण असंतोष, अस्थिरता आणि अपयशाचा ज्वालामुखी तिथेच धगधगत आहे.
अभिजीत राणे लिहितात
नेपाळपासून पत्रा चाळपर्यंतचा धडा! संजय राऊत यांनी अलीकडेच विधान केले की, “नेपाळमध्ये जे घडलं ते कुठेही घडू शकतं.” त्यांचं हे निरीक्षण वास्तवाशी जवळचं आहे. नेपाळमध्ये आंदोलनकर्त्यांनी एका भ्रष्टाचारी खासदाराचा बंगला जाळून टाकला, आणि परिस्थिती कशी बेकाबू झाली याचे चित्रण आपण पाहिलं. भ्रष्टाचार, जनतेचा अविश्वास आणि सत्ताधाऱ्यांचा अहंकार — ही साखळी कुठल्याही लोकशाहीत धोकादायक ठरते. पण त्याच वेळी राऊत यांनी स्वतःच्या घराकडेही एक नजर टाकली पाहिजे. पत्रा चाळ प्रकरण अजूनही महाराष्ट्राच्या स्मरणात ताजं आहे. तिथेही सामान्यांचा विश्वास तुटला होता, प्रश्न अनुत्तरीत राहिले होते. त्यामुळे नेपाळचा धडा योग्यच आहे, पण तो इतरांना दाखवण्यापूर्वी स्वतःलाही लागू करून पाहणं अधिक आवश्यक ठरेल. लोकशाहीत लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा जास्त काळ घेता येत नाही. कधी नेपाळ, कधी पत्रा चाळ — शिकवण नेहमी एकच असते, जनतेची उपेक्षा म्हणजे धोक्याला आमंत्रण.
अभिजीत राणे लिहितात
ठाकरे एकत्र आल्यानंतरचं ‘अकल्पनीय’ ! मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेची नवी ठिणगी पडली आहे. “ठाकरे एकत्र आले तर काहीतरी महान घडेल” या त्यांच्या शब्दांत अपेक्षेपेक्षा जास्त गूढता दडलेली आहे. पण खरोखर काय महान होऊ शकते? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तर शिवसेनेचे पारंपरिक मतदार पुन्हा एकत्र येतील, मराठी अस्मितेचा मुद्दा नव्या उंचीवर नेला जाईल, आणि मुंबई–ठाण्यासह संपूर्ण राज्यातील समीकरणे डळमळीत होतील. मात्र, हा एकत्रीकरणाचा खेळ फक्त भावनिक पातळीवर मर्यादित राहील की खरोखर सत्ता समीकरणांमध्ये धक्का देईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’च्या उपमेला टोलावत, जाधवांनी अकल्पनीय गोष्टीची हिंट दिली आहे. पण महाराष्ट्राचा मतदार फारच शहाणा आहे. त्याला फक्त घोषणांनी वा भावनिक खेळींनी नाही, तर ठोस नेतृत्वानेच प्रभावित करता येईल. ठाकरे बंधूंनी खरोखर एकत्र यायचं ठरवलं, तर ती घटना महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर ऐतिहासिक ठरेल.







Comments