top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Aug 18
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“भावकीचा पोस्टल पंच!” मारत रोहित पवारांनी अजितदादांना एक भावनिक आवाहन केलं – “आपण सगळे भावकी एक आहोत.” पण अजित पवारांनी यावर लगेचच राजकीय पंच मारला – “हो, भावकी तर आहेच… म्हणूनच पोस्टल मतांच्या जोरावर तुला आमदार होऊ दिलं!” बारामतीच्या रंगमंचावर ही संवादफेक जणू नाटकातला खडाखडीचे दृष्यच वाटले. भावकीच्या नावाखाली मतं मागायची, आणि भावकीचं पोस्टल अकाऊंट उघडून जगासमोर सादर करायचं हेच सध्याचं शरदकाकांचं वारसापरीक्षा राजकारण आहे ! मतदार मात्र विचारतोय: “आम्हाला रोजगार, शेती व उद्योगाचं भविष्य हवंय की पोस्टल मतांच्या गोष्टी?” नात्यांच्या झेंड्याखाली खेळणाऱ्या या नेत्यांना जनतेला पोस्टल प्रेम नको, तर प्रत्यक्ष कामगिरी हवी आहे! याचा विसर पडला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुंबईजवळील कल्याण येथे स्पर्धा परीक्षांच्या परप्रांतीय असणार्‍या कोचिंग क्लासच्या प्रमुखाला एमएनएस कार्यकर्त्यांनी अक्षरशः ठोकून काढले. फी जास्त, फसवणूक झाली, हा बहाणा पुढे करून कार्यकर्त्यांनी वर्गात घुसून थापडांचा वर्षाव केला, बाटल्या फेकल्या आणि शिव्यांच्या फैरी झाडल्या. शिक्षणाच्या मंदिरात गुंडगिरीचा नंगा नाच सुरू झाला आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोरच “राजकीय ट्युशन” सुरू झाली. बार फोडाफोड, व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर दगडफेक आणि आता कोचिंग क्लासवर हल्ला—एमएनएसची ही मालिका जणू राजकीय पोर्टफोलिओच ठरली आहे. प्रश्न असा की, लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे; पण मारहाणीचा अभ्यासक्रम कुठल्या संविधानात लिहिलेला आहे? विद्यार्थ्यांचे भवितव्य मातीमोल करणारे आणि समाजात दहशत निर्माण करणारे मनसे कार्यकर्ते हे आधुनिक दहशतवादी सिद्ध होत असून राज्य सरकारची निष्क्रियता चीड आणणारी आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कोणत्याही मोठ्या आणि महत्वाच्या पदासाठी चर्चेत नसणारे असे वेगळेच नाव देण्याची धक्कादायक परंपरा मोदी सरकारने कायम राखली आहे. “सी.पी. राधाकृष्णन यांना महाराष्ट्राच्या ‘राजभवनातून थेट ‘उपराष्ट्रपती भवनात’ पाठवणारा निर्णय मोदींनी घोषित केला आणि राजकीय पंडित म्हणवणारे पत्रकार तोंडघशी पडले. ”महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. एकीकडे विरोधक आपली गणिते मांडण्यात व्यस्त असताना, भाजपने आपल्या धक्कातंत्राने त्यांना गारद केले आहे. राधाकृष्णन यांची प्रतिमा साधी, पण ठाम आहे ; तामिळनाडूचा हा अचर्चित राजकीय चेहरा राष्ट्रीय स्तरावर उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. “राजभवनातील निवांतपणातून दिल्लीतील राजकारणाच्या रणांगणात” अशी त्यांची झेप आहे. आता उपराष्ट्रपतींचे आसन केवळ औपचारिक राहते की संसदेतला निर्णायक आवाज बनते, यावर सगळ्यांचे लक्ष खिळणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मोदी सरकारने १९९७ नंतरची सर्वात मोठी करसुधारणा जाहीर केली आहे. मोदी सरकारनेच पहिल्यांदा जी एस टी प्रणाली कार्यान्वित केली आणि त्या माध्यमातून करयंत्रणेला अधिकाधिक सुटसुटीत करण्याचा प्रामाणिक प्रयास केला. गेले काही वर्ष जी एस टी कलेक्शनचे मासिक आकडे हे अत्यंत आनंद प्रदान करणारेच होते. आता संपूर्ण कररचनेला अधिक सुटसुटीत करणे आणि जी एस टी च्या टक्केवारीत बदल आणि सुसूत्रीकरण घडवून करवसुलीचे जाळे अधिकाधिक विस्तृत करण्याचे सरकारचे धोरण असून केली गेलेली संपूर्ण करप्रणालीची त्या पद्धतीने पुनर्रचना केली गेली असून अनेक ठिकाणी जीएसटीचे समान असणे आता इतिहासजमा होणार असून काही घटकांवरील जी एस टी चक्क कमी केला गेला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

संयुक्त राष्ट्र पुन्हा एकदा गाझातील मानवी आपत्तीबद्दल इशारा देत आहे. लाखो जीव अन्न, औषध आणि निवाऱ्याविना तडफडत आहेत. परंतु तरीही त्यांना हमासला पाठीशी घालण्याची हौस कायमच आहे. जगातील महासत्ता शांततेची भाषा बोलतात, पण शस्त्रांचा पुरवठा बंद करत नाहीत. दुर्दैव म्हणजे या संकटाकडे पाहताना पाश्चिमात्य राष्ट्रे आणि इस्रायल यांच्यात मतैक्य नाही. पाश्चिमात्य राष्ट्रांना मानवता आठवते आहे आणि इस्रायल मात्र हमासला समूळ नष्ट करण्यासाठी मानवतेला सुद्धा बाजूला ठेवण्यास आतुर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देश आपापला अजेंडा राबवतो , राजकारण करतो पण यात मानवी मूल्ये मात्र गाडली जातात. गाझातील उपाशी मुलांच्या यातना सुसंस्कृत समाजाला आरसा दाखवत आहेत. संयुक्त राष्ट्र ओरडते आहे, पण ऐकतो कोण? आंतरराष्ट्रीय राजकारणाला रक्तपिपासू खेळापेक्षा दुसरे काहीच महत्त्व उरलेले नाही.

🔽

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page