top of page

संघटित कामगारांच्या हक्कांसाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी ; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी केला ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन ॲण्ड आर्टिस्ट युनियनचा गौरव

  • dhadakkamgarunion0
  • Aug 20
  • 3 min read

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, जे कामगार आहेत त्यांचा उत्कर्ष कसा होईल, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य कसे येईल, त्यांना आनंदाने कसे जगता येईल, यासाठी युनियनने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी कामगार नेत्यांना सल्ला दिला. दिपकभाऊ काळींगण यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन ॲण्ड आर्टिस्ट युनियनचा योगेश वसंत त्रिवेदी यांनी गौरवही केला. संविधान सप्ताहाचे औचित्य साधून ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन ॲण्ड आर्टिस्ट युनियन तर्फे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रशस्त सभागृहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहोळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून योगेश वसंत त्रिवेदी हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी गिरणी कामगारांचा संप पुकारला होता. जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वेचा चक्का जाम केला होता. फुटपाथवर झोपून दिवस काढणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस या तळमळीच्या कामगार नेत्याने मुंबईत अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखण्यात येणाऱ्या आणि सूर्य चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, अशी दर्पोक्ती करणाऱ्या सदोबा पाटलांचा पराभव केला होता. या कामगार नेत्यांना माहित होते की संप करण्यापूर्वी संप मागे कधी घ्यायचा. परंतु १ जानेवारी १९८२ रोजी मुंबई मधल्या गिरणी कामगारांचा सुरु झालेला संप डॉ. दत्ता सामंत आणि दादा सामंत हे दोघेही काळाच्या पडद्याआड जाऊनही कागदोपत्री आजही सुरुच आहे आणि मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा गिरणी कामगार देशोधडीला लागला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर हे गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून प्रयत्न करताहेत. पाहु या किती कामगारांना घरे मिळताहेत ते. पण मुंबईत राहणाऱ्या कामगारांना मुंबईतच घरे मिळायला हवीत. . दिपकभाऊ कळींगण यांनी बूट पॉलिश करणाऱ्यांसाठी, तळागाळातील काम करणाऱ्यांसाठी कार्य केले. ही युनियन पडद्यामागे झटणाऱ्या असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी काम करीत आहे, हे फार मोलाचे योगदान म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येपासून मुंबईतील मराठी गुजराती, हिंदू, मुस्लिम या देशात राहणाऱ्या आणि या देशावर प्रेम करणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचा विस्तृत आढावा योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपल्या घणाघाती भाषणात घेतला तेंव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कामगार नेते अभिजित राणे, डॉ. सुकृत खांडेकर, हेमंत सामंत यांच्या कार्याचीही योगेश त्रिवेदी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. डॉ. मनोहर जोशी यांनी शिवसेनेवर, मनीष देशमुख आणि अनंत गुरव यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर पीएचडी केली तशीच सामना या दैनिकावर सुकृत खांडेकर यांनी पीएचडी केली. साध्या वार्ताहरापासून संपादक पदापर्यंत डॉ. सुकृत खांडेकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. अभिजित राणे यांनी एका बाजूला धडक कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार चळवळ, मुंबई मित्र, वृत्त मित्र ची चार दैनिके या माध्यमातून पत्रकारिता तसेच राजकारण या सर्वच क्षेत्रात लीलया संचार करणाऱ्या अभिजित राणे यांनी वयाच्या नवव्या वर्षी धरमतर खाडी पोहून जाण्याचा विक्रम केला आहे, असे सांगून योगेश त्रिवेदी यांनी प्रा. हेमंत सामंत यांनी मजिठिया आयोगाचा संपूर्ण अहवाल लिहिण्याचे शिवधनुष्य पेलले असल्याचे आवर्जून सांगितले.   बाबरी मशिदीच्या पतनानंतर उद्भवलेल्या जातीय दंगलीत बाळासाहेबांमुळे मुंबई सुरक्षित राहिली ; गुजराती बांधवांनी दिली शिवसेनाप्रमुखांना हिंदुहृदयसम्राट पदवी !                   १९९२-९३ मध्ये मुंबई शहरात झालेल्या जातीय दंगलीत मराठी गुजराती आणि तमाम हिंदू बांधव हा सुरक्षित राहिला म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गिरगांव चौपाटी जवळील एका शानदार सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचा सत्कार करून गुजराती बांधवांनीच हिंदुहृदयसम्राट ही पदवी दिली अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. योगेश त्रिवेदी पुढे म्हणाले, "बाळासाहेबांनी रिकाम्या पोटाला अन्न आणि रिकाम्या हाताला काम ही संकल्पना मांडली. ते खरे समाजवादी होते, ढोंगी नव्हते. कार्यकर्त्यांना त्यांची कार्यक्षमता ओळखून मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक बनविले. त्यांची जात बघितली नाही. मनोहर जोशी यांना ब्राह्मण म्हणून आणि नारायण राणे यांना मराठा म्हणून मुख्यमंत्री केले नाही, गणेश नाईक यांना आगरी म्हणून मंत्री केले नाही, साबिर शेख यांना मुस्लिम म्हणून मंत्री केले नाही किंवा छगन भुजबळ यांना माळी म्हणून महापौर केले नाही तर त्यांची कर्तबगारी पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पदे दिली. अनेक दगडांना बाळासाहेब ठाकरे यांनी शेंदूर फासला पण अनेक दगड स्वत:लाच देव समजायला लागले. ज्यांनी मातोश्रीचा उंबरठा ओलांडला नाही, बाळासाहेब ठाकरे यांना पाहिलेही नाही, ते आता बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याच्या गोष्टी करताहेत. आम्ही अनेक वर्षे धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत काम केले. परंतु ज्यांनी कधी आनंद दिघे यांना पाहिलेले नाही ते आनंद दिघे यांच्या तसबिरी बरोबर आपली छायाचित्रे झळकवीत आहेत. चांगली गोष्ट आहे आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अच्छे दिन आलेत, असेही योगेश त्रिवेदी यांनी ठणकावून सांगितले. विलास खानोलकर, नंदकिशोर खानविलकर, शशिकांत सावंत, संदिप पाटील, ॲड. राजू राम, शरद देशमुख, प्रतिभाताई पवार, बी. के. खोईया, दत्ता जवळगे, मनोहर सासे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page