top of page

विशेष संपादकीय🖋️ अभिजीत राणे संघशक्ती युगे युगे !!

  • dhadakkamgarunion0
  • Aug 31
  • 4 min read

🖋️🖋️विशेष संपादकीय🖋️🖋️

.................................

.................................

.................................

अभिजीत राणे

संघशक्ती युगे युगे !!!

‘होय, मी म्हणतो हे हिंदूराष्ट्र आहे,” अशी अभिमानाने गर्जना करणारे प्रखर राष्ट्रभक्त आणि रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार! काँग्रेसच्या ब्रिटिशधार्जिण्या आणि हिंदूविरोधी भूमिकांचा विरोध करून, डॉक्टरांनी ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व’ या विचारांनी पेटून उठत १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्तमेढ रोवली. आज रा. स्व. संघ शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर आहे. पण, १०० वर्षांनंतरही डॉक्टरांची विचारप्रेरणा आजही संघाच्या उक्ती आणि कृतिशीलतेचा आत्मा म्हणावी लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वर्षी शतायु होतो आहे. या 100 वर्षाच्या कालावधीतील संघ कार्याचे संचित काढायचे असेल तर एकचालकानुवर्ती असणार्‍या या संघटनेने या देशाला बरेच काही अर्पण केले आहे. आज 22 राज्यांचे मुख्यमंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाच्या स्वयंसेवकांनी ओसंडून वाहाणार्‍या भारतीय जनता पक्षाची आज केंद्रात तिसर्‍यांदा राजवट सुरू आहे आणि भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. परिव्राजक आहेत. थोडक्यात शंभर वर्षात संघ या वृक्षाची मुळे देशाच्या कानाकोपर्‍यात रूजली असून या शाखांचा अधिकाधिक विस्तार होतो आहे.

डॉ. हेडगेवार यांनी हिंदू संघटनाच्या रचलेल्या पायावरच पू. श्रीगुरूजी, बाळासाहेब देवरस, रज्जूभैय्या, सुदर्शनजी अशा त्यापुढील प्रत्येक सरसंघचालकांनी कळसच चढविला. डॉ. मोहनजी भागवतही त्याला अपवाद नाहीत. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने दिल्लीतील विज्ञान भवनात परवा संपन्न झालेल्या तीनदिवसीय ‘१०० वर्ष की संघयात्रा-नए क्षितिज’ या व्याख्यानमालेतून मोहनजींनीही ‘न्यायाचे राज्य म्हणजे हिंदूराष्ट्र’ असे ठामपणे प्रतिपादित केले. ते म्हणाले की, "भारत हे हिंदूराष्ट्रच आहे आणि त्यासाठी कोणतीही औपचारिक घोषणा आवश्यक नाही. आपल्याकडील ऋषी आणि द्रष्ट्यांनी भारताला आधीच हिंदूराष्ट्र घोषित केले आहे. त्यामुळे ते कोणत्याही अधिकृत घोषणेवर अवलंबून नाही, हेे सत्य आहे. तेव्हा त्याचा स्वीकार करणे फायद्याचे आणि हे न स्वीकारल्याने तुमचे नुकसान होते.” अशा प्रकारे एकूणच संघविचारांची व्यापकता, विविध विषयांवरील सखोल भूमिका सरसंघचालकांनी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने सुस्पष्टपणे विशद केली.

ree

हिंदूराष्ट्राचा गजर करताना, सरसंघचालकांनी लोकसंख्यात्मक बदलांच्या भारतासमोरील मोठ्या संकटावर भाष्य करत धर्मांतरणालाही तीव्र विरोध दर्शविला. घुसखोरी थांबलीच पाहिजे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना नव्हे, आपल्या देशातील नागरिकांना नोकर्या दिल्या पाहिजेत, याबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली. तसेच ‘उदरनिर्वाह म्हणजे नोकरी, हा भ्रम असून, रोजगार घेणारे नाही, तर रोजगार निर्माण करणारे व्हा,’ असा कानमंत्रही सरसंघचालकांनी दिला. रोजगाराच्या प्रश्नाबरोबरच दिवसेंदिवस ढासळणारी सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये, त्यातून निर्माण होणारे ‘कॅन्सल कल्चर’ आणि बळावणार्या ‘वोकिझम’वरही सरसंघचालकांनी संधान साधले. जगाला संतुलन साधणारा धर्म देण्याची जबाबदारी ही भारताचीच आहे, असे सांगत भारताच्या विश्वबंधुत्वाच्या, ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या दायित्वाचे स्मरणही सरसंघचालकांनी यावेळी करून दिले.

आता आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा संघानेच तयार केला असून त्याने सुद्धा जगभर कार्य सुरू केले आहे. थोडक्यात द्विशताब्दी पूर्तीला संघ विश्वव्यापी झाला असेल आणि त्यामाध्यमातून संघाने जगभर भारतीय संस्कृती रुजवली असेल आणि वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाने स्वीकारली असेल. सेवेच्या , कष्टाच्या सातत्यपूर्ण सकारात्मक कामाच्या बळावर सुद्धा तुम्ही “कृण्वंतो विश्वमार्यम” हे स्वप्न मूर्त स्वरुपात आणू शकता या कार्याचा जागतिक मापदंड संघ होणार आहे यात काहीच संशय नाही

भारतात वास्तव्यास असणारे सर्व जाती-धर्मांचे बांधव हे हिंदूच आहेत, याचा पुनरुच्चार करीत हिंदू हीच समस्त भारतीयांची ओळख असल्याचे सरसंघचालकांनी अधोरेखित केले. आपल्या सर्वांचे पूर्वज, संस्कृती एकच असल्याची आठवणही सरसंघचालकांनी यावेळी करून दिली. पण, त्याचबरोबर ‘मुस्लीम, ख्रिश्चनांनीही आपण अरबी, तुर्की, युरोपीय नव्हे, तर भारतीय आहोत,’ असा विचार रुजवण्याचा मोलाचा संदेश सरसंघचालकांनी या दोन्ही धर्माच्या प्रमुखांना विशेषत्वाने दिला. कारण, येथील मुस्लिमांना अरबी, तुर्की राष्ट्रविचार अधिक जवळचे वाटल्यामुळे, ते भारतीयत्वापासून आपसुकच दुरावतात.

काही वर्षांपूर्वी रोहिंग्या मुसलमानांवर म्यानमारमध्ये होणार्या अत्याचारांविरोधात मुंबईत धर्मांधांनी रस्त्यावर अक्षरश: हैदोस घातला होता. असे प्रसंग टाळायचे असतील, तर हा देश आपला आहे, असे मुस्लीम आणि ख्रिश्चनांनी सर्वप्रथम मनोमन मानायला हवे आणि महत्त्वाचे म्हणजे, तसे त्यांच्या वर्तनातूनही प्रतिबिंबित झाले पाहिजे. भारतात राहायचे, कमवायचे, खायचे, सरकारी सुविधांचे लाभही घ्यायचे आणि येथील संस्कृतीलाच तुच्छ लेखायचे, त्या संस्कृतीचा, सांस्कृतिक प्रतिकांचा वारंवार अपमान करायचा, हे सर्वस्वी अमान्यच! याच अनुषंगाने ‘अन्य धर्मीयांशी हातमिळवणी करणे, म्हणजे इस्लामला धोका नाही,’ हेदेखील निदर्शनास आणून देत, ‘संघ मुस्लिमांवर अत्याचार करतो,’ या अपप्रचारालाही सरसंघचालकांनी बाद ठरविले.

सरसंघचालकांनी मुस्लीम समाजातील धर्मगुरूंची वेळोवेळी भेट घेतली आहे, त्यांच्याशी विविध विषयांवर अगदी मनमोकळेपणाने चर्चाही केली आहे . ‘मुस्लीम राष्ट्रीय मंचा’सारख्या संघाच्या सहयोगी संघटनाही मुस्लीम समाजात राष्ट्रवादी विचारांचा जागर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच संघाच्या शाखेत प्रवेशासाठी कधीही जात-धर्म विचारण्याची पद्धत पूर्वीही नव्हती, आजही नाही आणि ती भविष्यातही नसेल. एवढेच काय तर, नैसर्गिक आपत्तीच्या काळातही सदैव तत्पर असणारा संघ हा जात-धर्म विचारून कुुणालाही मदतीचा हात देत नाही. त्यामुळे संघ हे सर्वार्थाने सर्वसमावेशक आणि एक सहिष्णू संघटन आहे हेच सत्य आहे.

मुस्लीम आक्रमकांच्या नावाने रस्त्यांच्या नामकरणाला विरोध असल्याचे स्पष्ट करत, अब्दुल हमीद, अशफाक उल्ला खान आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसारख्या राष्ट्रभक्त भारतीय मुसलमानांची प्रेरणा घेण्याचे आवाहनही सरसंघचालकांनी मुस्लीम समाजाला केले. त्यामुळे संघाला मुद्दाम जातीयवादी, मुस्लीमविरोधी ठरविणार्यांनी, संघाला सेक्युलॅरिझमचे धडे देणार्यांनी आधी संघ नीट समजून घेण्याची आणि त्यासाठी सरसंघचालकांची ही व्याख्यानमाला कान उघडून ऐकण्याची नितांत गरज आहे.

आजघडीला पाच ते सात लाख स्वयंसेवक आणि ३ हजार, ५०० पूर्णवेळ प्रचारक लाभलेला संघ अवघ्या काही दिवसांत आपल्या शताब्दी वर्षात प्रवेश करेल. १०० वर्षांपूर्वी हिंदू समाजाचे सशक्त संघटन, भारताला परमवैभवाकडे नेण्याचे संघाचे ध्येय होते आणि आजही त्याच ध्येयपूर्तीकडे संघाची अविरतपणे वाटचाल सुरू आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षा, कट्टर विरोध, बंदी सहन करूनही संघ समाजात सज्जनशक्तीच्या बळावर कार्यरत राहिला आणि तो भविष्यातही तसाच क्रियाशील राहील.

शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या रा. स्व. संघाचे क्षितिज किती अफाट विस्तारलेले आहे, त्याचे दर्शनच सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या तीनदिवसीय व्यापक उद्बोधनातून देशाला झाले आहे . हिंदूराष्ट्र, मुस्लीम मानसिकता, संस्कृती, राजकारण, रोजगार अशा मानवी आयुष्यातील प्रत्येक बिंदूंना स्पर्श करणारे सरसंघचालकांचे विचारामृत हे संघाच्या आजवरच्या प्रवासाची फलश्रुती आणि भविष्याची दिशा स्पष्ट करणारे असेच होते आणि आता तरी संघाचे सामर्थ्य आणि त्याची राष्ट्र व मानवते प्रती असणारी अव्यभिचारी निष्ठा भारतातील कुपमंडूक प्रवृत्तीच्या घराणेशाही विचारांच्या पक्षांनी आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन समाजाला विभाजित करणार्‍या पत्रकारांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.


ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page