'राजकीय' सोयीचं मनोमिलन !
- dhadakkamgarunion0
- 10 minutes ago
- 3 min read

संपादकीय
अभिजीत राणे
'राजकीय' सोयीचं मनोमिलन !
मुंबईच्या राजकारणात 'ठाकरे' हे नाव आजही भावनिक लाटा निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरते. गेल्या काही दिवसांत मुंबईने जो काही नाट्यमय घटनाक्रम पाहिला—राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंचे आगमन, मावशींनी केलेले ओवाळण, बाळासाहेबांच्या स्मारकासमोर नतमस्तक होणे आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद—हा सर्व प्रकार म्हणजे एखाद्या 'मराठी कौटुंबिक सिनेमा'चा साचा असावा, असाच भासला. मराठी अस्मिता आणि मुंबईवरचे संकट या जुन्याच मुद्द्यांना पुन्हा एकदा 'इमोशनल फोडणी' देऊन समोर आणण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनीही या घटनेचे वर्णन 'ऐतिहासिक' असे केले असले, तरी या सर्व भावनिक नाट्याच्या पडद्यामागे लपलेली 'राजकीय मजबुरी' आणि 'अस्तित्वाची लढाई' सुज्ञ मुंबईकर मतदारांपासून लपून राहिलेली नाही.
ठाकरे बंधूंचे हे मनोमिलन जितके भावनिक दिसते, तितकेच ते तांत्रिक आणि गणिताच्या दृष्टीने किचकट आहे. कोणत्याही निवडणुकीत केवळ नेत्यांचे चेहरे एकत्र येऊन चालत नाही, तर कार्यकर्त्यांचे जाळे (कॅडर) आणि आर्थिक नियोजन या दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात. आजच्या घडीला उद्धव ठाकरेंची शिवसेना (यूबीटी) आपल्या शाखा आणि कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी झगडत आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे निवडणुकीच्या रिंगणात वारंवार अपयशी ठरल्याने 'निष्प्रभ' वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा स्वतःचे घर वाचवणे कठीण होते, तेव्हा मराठी अस्मितेची ढाल पुढे करून मतदारांना साद घालणे, हाच एकमेव पर्याय या दोन्ही बंधूंसमोर उरलेला दिसतो. प्रश्न असा पडतो की, हे 'मनोमिलन' बाळासाहेबांच्या हयातीत का झाले नाही? त्याचे उत्तर स्वच्छ आहे—तेव्हा दोन्ही नेत्यांना एकमेकांच्या ताकदीची गरज नव्हती, आज ती अपरिहार्यता आहे.
मुंबईच्या मतदारासमोर आज काही मूलभूत प्रश्न उभे आहेत. गेली तीन दशके मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. या तीस वर्षांत मुंबईतील मराठी माणूस शहराबाहेर का फेकला गेला? मराठी माणसाच्या नावाने राजकारण करत असतानाच, मुंबईतील मोक्याच्या जमिनी बिल्डरांच्या घशात कशा गेल्या? पावसाळ्यात मुंबई तुंबणे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडणे आणि कोव्हीड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप यावर केवळ 'मराठी अस्मिता' हे उत्तर असू शकत नाही. आजचा मुंबईकर केवळ भावनिक घोषणांवर समाधान मानणारा राहिलेला नाही. त्याला हवी आहे ती 'इज ऑफ लिव्हिंग' (Ease of Living). मुंबईतील मध्यमवर्गीय आणि नोकरदार मराठी माणूस आज तासन् तास ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा किंवा लोकलच्या गर्दीत चिरडण्यापेक्षा प्रगत पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना दिसत आहे.
येथेच भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रभाव वाढत गेलेला दिसतो. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या चेहऱ्यामोहरा बदलणारे प्रकल्प—मग ते मेट्रोचे जाळे असो, कोस्टल रोड असो, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ असो वा मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक असो—हे सर्व प्रकल्प गतीने पूर्ण होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या काळात मेट्रो कारशेडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना 'स्थगिती' मिळाल्याने मुंबईकरांच्या खिशातील कराचा पैसा वाया गेला आणि प्रकल्पांचा खर्च वाढला. ही बाब आजचा तरुण मतदार विसरलेला नाही. भाजप केवळ आश्वासने न देता 'डिलिव्हरी' (काम पूर्ण करणे) वर भर देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचणार असेल आणि अंडरग्राउंड रस्त्यांमुळे ट्रॅफिक जॅममधून सुटका होणार असेल, तर मतदार केवळ 'भावनिक नात्यासाठी' आपले भविष्य पणाला लावणार नाही.
ठाकरे बंधूंच्या युतीचा आणखी एक कमकुवत दुवा म्हणजे मतदानाच्या गणितातील विसंगती. राज ठाकरेंची आक्रमक भूमिका अमराठी मतदारांना दूर लोटणारी ठरते, तर उद्धव ठाकरेंची सध्याची 'हिंदुत्वापासून दुरावलेली' प्रतिमा पारंपारिक मतदाराला संभ्रमात टाकते. दुसरीकडे, भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा आणि 'विकास' यांची सांगड घालत एक मोठी मतपेढी तयार केली आहे. २०१४ आणि २०१९ नंतरच्या विविध निवडणुकांमध्ये (लोकसभा वगळता) मुंबईकरांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे, हे याकडे स्पष्ट निर्देश करते की मतदार आता 'ब्रँड' पेक्षा 'रिझल्ट'ला महत्त्व देत आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये या युतीमुळे मोठी लाट येईल, असा भास निर्माण केला जात असला तरी वास्तवात त्याचा परिणाम 'मार्जिनल' किंवा मर्यादित राहण्याची शक्यता अधिक आहे. ज्या मराठी माणसाला मुंबईबाहेर जावे लागले, तो आता केवळ एका फोटोसेशनमुळे पुन्हा ठाकरे बंधूंकडे वळेल, अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल. मुंबईचा विकास रोखणारे 'विकासशत्रू' आणि मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवू पाहणारी 'विनिंग मशीन' अशा दोन टोकांच्या पर्यायांमध्ये मुंबईकरांना निवड करायची आहे.
शेवटी, महाराष्ट्र किंवा मुंबई ही कोण्या एका कुटुंबाची जहागीर नाही. मराठी अस्मिता ही केवळ निवडणुकांपुरती वापरण्याची गोष्ट नसून ती जनतेच्या प्रगतीत प्रतिबिंबित व्हायला हवी. मेट्रो, बुलेट ट्रेन आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईकरांचे दैनंदिन दुःख कमी होत असेल, तर तो मतदार 'शिळ्या कढीला दिलेली भावनिक फोडणी' नाकारून विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या नेतृत्वाला पसंती देईल. ठाकरे बंधूंची ही युती म्हणजे 'अस्तित्वाचा निकराचा प्रयत्न' आहे, पण मतदारांच्या मनात आज 'अस्मिते'पेक्षा 'विकासाची' ओढ अधिक प्रबळ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचे निकाल हे केवळ भावनेवर नाही, तर 'कर्तृत्वावर' लागतील हे निश्चित.







Comments