मुंबई जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रवेशद्वार ठरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास
- dhadakkamgarunion0
- Feb 18
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुंबई जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रवेशद्वार ठरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास
● जागतिकीकरणाच्या बदलत्या प्रवाहात महाराष्ट्र आता जागतिक भांडवलासाठीचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार असून, मुंबई जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यात निर्णायक भूमिका बजावेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत विदेश मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन २०२६' परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या प्रगतीचा आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाचा सविस्तर आराखडा मांडला. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी जी परिसंस्था तयार केली आहे, तिचा आधार घेत महाराष्ट्र २०२७-२८ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वेगाने काम करत आहे. राज्याने गेल्या काही वर्षांत सातत्याने १० टक्क्यांहून अधिक विकासदर राखला असून, आता आपण केवळ सुधारणांवर न थांबता रचनात्मक परिवर्तनाकडे झेप घेतली आहे. मुंबई हे केवळ भारताचे आर्थिक केंद्र नाही, तर ते जगातील प्रगत राष्ट्रांच्या राजधानींपेक्षाही अधिक प्रगत शहर म्हणून उदयास येईल. महाराष्ट्र सध्या देशातील एकूण डेटा सेंटर क्षमतेच्या दोन-तृतीयांश वाटा उचलत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिनटेक आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments