बांगलादेशातील रक्तलांछित वास्तव !!
- dhadakkamgarunion0
- 12 hours ago
- 3 min read
संपादकीय
अभिजीत राणे
बांगलादेशातील रक्तलांछित वास्तव !!
शेजारील राष्ट्रात जेव्हा अराजक माजते, तेव्हा त्याचे चटके भारताला बसणे अपरिहार्य असते. मात्र, सध्या बांगलादेशात जे सुरू आहे, ते केवळ अराजक नसून लोकशाहीच्या नावाखाली घडवून आणलेले एक भयानक षडयंत्र आहे. बांगलादेशात झालेले सत्तांतर हे केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन नव्हते, तर त्यामागे जागतिक महासत्तांचे भूराजकीय खेळ आणि कट्टरपंथीयांची हिंस्र महत्त्वाकांक्षा दडलेली आहे. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात जे चित्र उमटले आहे, ते कोणत्याही सुसंस्कृत समाजाला हादरवून टाकणारे आहे. या संपूर्ण सत्तांतरामागे अमेरिकेची गुप्तचर संस्था 'सीआयए'चा हात असल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. मोहम्मद युनूस यांच्यासारख्या पाश्चिमात्य जगाच्या 'लाडक्या' व्यक्तीला सत्तेच्या खुर्चीवर बसवून बांगलादेशाला दक्षिण आशियातील एक अस्थिरतेचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न होतोय. या खेळात चीनची साथ मिळणे हे अधिक चिंताजनक आहे. कारण भारताला चहुबाजूंनी घेण्याच्या धोरणात बांगलादेश हा एक महत्त्वाचा दुवा आहे. या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या खेळात सामान्य हिंदू मात्र भरडला जातोय. बांगलादेशातील हिंदूंची घरे जळत आहेत, मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत आणि हे सर्व तथाकथित 'पुरोगामी' क्रांतीच्या नावाखाली सुरू आहे.
बांगलादेशातील नवीन सरकार, तिथले सैन्य दल आणि पोलीस प्रशासन यांच्यावर आता 'जमाते-इस्लामी' सारख्या मूलतत्ववादी संघटनेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्या कट्टरपंथी विचारसरणीला शेख हसीना यांनी दाबून ठेवले होते, ती आता अधिक हिंस्र होऊन बाहेर आली आहे. पोलीस आणि सैन्यात घुसलेले हे मूलतत्ववादी घटक हिंदूंवरील अत्याचारांकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करत आहेत. गेल्या काही दिवसांत हिंदू शिक्षकांना जबरदस्तीने राजीनामे द्यायला लावणे, त्यांच्या घरांवर हल्ले करणे आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. हे केवळ गुन्हेगारी कृत्य नाही, तर एका विशिष्ट समुदायाला संपवण्याचा हा नियोजनबद्ध 'वंशसंहार' आहे. जमाते-इस्लामीचा वाढता प्रभाव बांगलादेशला मध्ययुगीन अंधकारात ढकलत आहे. जिथे अल्पसंख्याकांना केवळ जगण्यासाठी आपली श्रद्धा आणि स्वाभिमान गहाण ठेवावा लागत आहे. हे चित्र अत्यंत भयावह आहे, कारण तिथल्या प्रशासकीय यंत्रणेनेच आता कट्टरपंथीयांसमोर गुडघे टेकले आहेत, ज्यामुळे हिंदूंना संरक्षण मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे.
या क्रौर्याचा कळस म्हणजे दोन दिवसांपूर्वी एका हिंदू तरुणाला ज्या प्रकारे जाळून मारण्यात आले, ती घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. केवळ धार्मिक द्वेषापोटी एका जिवंत माणसाला अग्नीच्या स्वाधीन करणे, हे त्या समाजातील वाढत्या हिंसेचे आणि कट्टरतेचे लक्षण आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ फिरत असतानाही तिथले सरकार आणि जागतिक मानवाधिकार संघटना मौन बाळगून आहेत. हा केवळ एका तरुणाचा मृत्यू नाही, तर बांगलादेशातील उर्वरित हिंदूंच्या सुरक्षिततेवर पडलेले ते एक प्रश्नचिन्ह आहे. "आम्ही तुमचे रक्षण करू" अशी पोकळ आश्वासने देणारे युनूस सरकार प्रत्यक्षात या नरसंहाराचे मूक प्रेक्षक बनले आहे. या घटनेने हे सिद्ध केले आहे की, बांगलादेशातील हिंदू आता मृत्युच्या सावटाखाली जगत आहेत आणि त्यांच्यासाठी काळ आता झपाट्याने संपत चालला आहे.
अशा परिस्थितीत भारताने आपली आजवरची 'संयमी' आणि 'मुत्सद्दी' भूमिका बदलण्याची वेळ आली आहे. बांगलादेश चीनच्या कुशीत जाईल या भीतीने आपण आजवर मवाळ धोरण स्वीकारले, पण आता तो देश आधीच भारताच्या शत्रूंच्या हातात खेळू लागला आहे. त्यामुळे आता केवळ शब्दांनी निषेध नोंदवून चालणार नाही, तर कठोर आर्थिक आणि राजनैतिक कारवाईची गरज आहे. सर्वात आधी बांगलादेशशी असलेले सर्व क्रीडा संबंध तोडून टाकले पाहिजेत. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या बांगलादेशी खेळाडूंना तात्काळ हाकलून देऊन त्यांना आपली जागा दाखवून दिली पाहिजे. क्रिकेटच्या मैदानावर मैत्रीचे नाते तेव्हाच जपले जाते जेव्हा सीमेच्या पलीकडे रक्ताचे पाट वाहत नसतात.
आर्थिक आघाडीवर तर भारताने बांगलादेशाची नाकेबंदी करणे आवश्यक आहे. बांगलादेशाचा कापड उद्योग हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि हा उद्योग भारतीय कच्च्या मालावर आणि मदतीवर जिवंत आहे. त्यांच्या निर्यातीसाठी त्यांना भारताच्या बंदरांचा वापर करावा लागतो. भारताने हे बंदर वापरण्याचे अधिकार आणि व्यापार पूर्णपणे बंद केला पाहिजे. आपण सवलतीच्या दरात जो तांदूळ आणि जीवनावश्यक वस्तू बांगलादेशला पुरवतो, तो पुरवठा तातडीने रोखला पाहिजे. जेव्हा पोटाला चिमटा बसेल, तेव्हाच तिथल्या सरकारला हिंदूंच्या रक्ताची किंमत कळेल. चीन किंवा अमेरिकेच्या मदतीच्या जोरावर ते भारतविरोधी कारवाया करत असतील, तर त्यांना याची किंमत मोजावीच लागेल हे भारताने ठामपणे सांगायला हवे.
यासोबतच, भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. संपूर्ण भारतात, विशेषतः सीमावर्ती राज्यांमध्ये बेकायदेशीरपणे घुसलेले लाखो बांगलादेशी मुसलमान हे भारतासाठी 'टाईम बॉम्ब' आहेत. या घुसखोरांना शोधण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवून त्यांना परत धाडणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आपण आपल्या भूमीवरील या घुसखोरांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांचे मनोबल कमी होणार नाही. ही घुसखोरी रोखणे आणि असलेल्या घुसखोरांना बाहेर काढणे हाच तिथल्या हिंदूंना वाचवण्याचा एक मोठा राजनैतिक दबाव ठरू शकतो.
शेवटी, जर हे सर्व प्रयत्न करूनही बांगलादेशातील हिंदू नरसंहार थांबला नाही, तर भारताने केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये. आपल्या नागरिकांचे आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सीमा ओलांडून लष्करी कारवाई करणे, हाच शेवटचा पर्याय उरतो. १९७१ मध्ये भारताने ज्याप्रमाणे एका अत्याचारी राजवटीचा अंत करून बांगलादेशची निर्मिती केली होती, तशीच वेळ आज पुन्हा आली आहे. जर तिथले सरकार आपल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करू शकत नसेल, तर भारताला तो भाग आपल्या ताब्यात घेऊन तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा नैतिक अधिकार आहे. आता वेळ चर्चेची नाही, तर कृतीची आहे. भारताची शक्ती आणि संकल्प काय आहे, हे जगाला आणि विशेषतः आपल्या शेजाऱ्यांना दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे. जर आपण आज गप्प बसलो, तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही.








Comments