🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Dec 19, 2025
- 2 min read





🖋️ अभिजीत राणे लिहितात
शिल्पमहर्षी राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जगप्रसिद्ध शिल्पकार, धातूला प्राण देणारे आणि पाषाणालाही भावविश्व देणारे शिल्पमहर्षी राम सुतार यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्रातील एक सुवर्णयुग संपले. शंभर वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ साधनेतून त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास आणि विचारधारा जगभर पोहोचवली. स्टॅच्यू ऑफ युनिटी, महात्मा गांधींची फिरकी चाल, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांसारखी त्यांच्या हातून घडलेली शिल्पकृती आजही भारताच्या आत्म्याचे प्रतीक बनून उभी आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्मितीत कला, तत्त्वज्ञान आणि राष्ट्रभाव यांचा अद्वितीय संगम दिसतो. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी दीपस्तंभ राहील. अशा महान कलावंताला विनम्र, भावपूर्ण श्रद्धांजली.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
निवडक संवेदनशीलतेच्या जगात हरवलेली मानवी वेदना
ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून शोकसंदेश आणि निषेध उमटले—हे अपेक्षितच. पण त्याच वेळी सुदानमध्ये एका दिवसात शेकडो निरपराध नागरिक मारले गेले, गावं जाळली गेली, महिलांवर अत्याचार झाले, आणि जागतिक समुदाय जवळपास शांत राहिला. ही शांतता अधिक अस्वस्थ करणारी आहे. आफ्रिकेतील संघर्षांना “स्थानिक समस्या” म्हणून बाजूला सारण्याची सवय जागतिक माध्यमांना आणि राजकीय गटांना लागली आहे. कोणत्याही हिंसेचे मूल्यमापन मानवी जीवावर नव्हे, तर त्या घटनेतून कोणता राजकीय कथानक पुढे नेता येईल यावर होत असल्याची भावना निर्माण होते. काही घटनांवर मोठा आवाज उठतो, तर काही ठिकाणी मृत्यू फक्त आकडे बनून राहतात. सीरिया, येमेन, अफगाणिस्तान किंवा सुदान—या सर्व ठिकाणी मानवी वेदना सारख्याच आहेत. निवडक संवेदनशीलतेपेक्षा सार्वत्रिक मानवतेची गरज आज अधिक तीव्र आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आरोपांच्या राजकारणात हरवलेली जबाबदारी
एप्स्टिन पेपर्ससंदर्भात केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेली राजकीय धूळ ही प्रत्यक्ष मुद्द्यांपेक्षा अधिक गोंधळ निर्माण करणारी ठरते. कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या संदर्भात गंभीर आरोप केले जातात, तेव्हा त्यामागे ठोस माहिती, पारदर्शकता आणि जबाबदारी अपेक्षित असते. परंतु पक्षांतर्गत स्पर्धा, नेतृत्वाच्या जागांसाठीची चढाओढ आणि आगामी निवडणुकांचे गणित यामुळे अशा विधानांचा वापर अनेकदा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी केला जातो. काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत सुरू असलेली चर्चा, बिहारमधील कामगिरीवरील नाराजी आणि उच्चपदांसाठीची अंतर्गत हालचाल या सर्वांचा परिणाम म्हणून काही नेते अधिक आक्रमक भूमिका घेतात. परंतु वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि पक्षीय संघर्ष यामुळे सार्वजनिक चर्चेचा स्तर खालावतो. लोकशाहीत आरोपांपेक्षा उत्तरदायित्व आणि स्पष्टता अधिक महत्त्वाची ठरते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महसूल विभागाचा ‘आदर’ आणि महाराष्ट्रातील अदृश्य गुलबकावली
लोकसत्ता डॉट कॉमवरील बातमीत लिहिलं होतं की “जनतेत महसूल विभागाबद्दल आदराची भावना आहे.” हे वाक्य वाचताच महाराष्ट्रभरातल्या वीजतारा हलल्या असतील. कारण महसूल खात्याच्या कार्यालयात जाऊन निरपेक्ष, झटपट आणि पारदर्शक सेवा मिळाली, असा अनुभव सांगणारा नागरिक शोधणं म्हणजे गुलबकावलीचं फूल शोधण्यासारखं—कथा आहे, प्रत्यक्षात कुणी पाहिलेलं नाही. बिनचौकशी निलंबनांच्या मालिकेमुळे कर्मचारी दहशतीत आहेत, असं म्हणतात. पण जनतेला दहशत नवीन नाही; ती तर वर्षानुवर्षे कागदपत्रांच्या फेऱ्यांमध्ये, सही‑शिक्क्यांच्या जंगलात आणि ‘उद्या या’ संस्कृतीत रुजलेली आहे. आदराची भावना कुठे आहे, हे विचारण्यापेक्षा ती कधी निर्माण होईल, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मुंबई मनपात विरोधकांची उमेदवारांची टंचाई आणि वास्तवाचा सामना
मुंबई मनपा निवडणुकीत विरोधी पक्षांची अडचण दिवसेंदिवस उघडी पडत आहे. स्वबळाचा नारा देणारी काँग्रेस अखेर वंचित बहुजन आघाडीला ४५ जागा देण्याच्या तयारीत आहे, याचा अर्थ उमेदवारांची कमतरता हीच खरी अडचण असावी. राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर २२७ जागांसाठी अर्ज मागवूनही प्रत्यक्षात १०० च्या आसपासच सक्षम उमेदवार उभे करू शकतील, अशी परिस्थिती दिसते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात फूट पडल्याने त्यांची ताकद अर्ध्यावर आली आहे. मनसेसमोरही विश्वसनीय उमेदवारांची समस्या कायम आहे. मविआ एकत्र आले किंवा वेगळे लढले, तरी त्यांचा विजय आजच्या घडीला धूसरच वाटतो. मात्र विधानसभा निवडणुकीपेक्षा मुंबई मनपेत त्यांना तुलनेने थोडे चांगले यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
🔽



Comments