🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काँग्रेससमोर निवडणूक आयोगाची भिंत
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारामुळे विरोधकांची अस्वस्थता वाढली आहे. मतदारयादीतील बनावट नावे व घुसखोरांना दिलेले खोटे कागदपत्रे उघडकीस आणण्यासाठी सुरू केलेल्या एस आय आर प्रक्रियेमुळे काँग्रेस आणि मित्रपक्ष हतबल झाले आहेत. बिहारमध्ये लाखो मतदार वगळले गेले तरी एकाही व्यक्तीने तक्रार केली नाही, यावरून ते मतदार वैध नव्हते हे स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयानेही आयोगाच्या अधिकाराला मान्यता दिल्याने विरोधकांचे प्रयत्न फोल ठरले. आगामी जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेत आयोगाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसला भीती वाटते की त्यांच्या राजकीय गणितावर घाव बसेल. सतत हल्ले करूनही आयोग ठाम राहिला आहे. जनतेचा पाठिंबा आणि केंद्र सरकारची साथ मिळाल्याने विरोधकांचे नैराश्य वाढले आहे. निवडणूक आयोगाची पारदर्शकता हीच लोकशाहीची खरी ताकद ठरत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संवेदनशीलतेतून घडलेले नेतृत्व
नेतृत्व केवळ पदाने नव्हे तर लोकांच्या भावनांशी जोडले गेले की ते खरे ठरते. नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व याचे उदाहरण आहे. बिहारमध्ये छठ गाण्यांचा प्रतिध्वनी ऐकून त्यांनी त्याचा आदर केला, तर काशी विश्वनाथातील पुजाऱ्यांसाठी स्वतःच्या खात्यातून पहाडी पुल्ला मागवून दिला. ही कृती राजकीय नव्हती, तर मानवी संवेदनशीलतेची होती. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांचे दुःख समजून घेणे, त्यावर उपाय करणे—यातूनच विश्वास निर्माण होतो. निवडणुका मतपत्रिकेने जिंकल्या जात नाहीत, त्या मनाने जिंकल्या जातात. आणि मन तेच जिंकतात जे लोकांच्या लहान गरजांना मोठी जबाबदारी मानतात. मोदींची ताकद त्यांच्या पदात नाही, तर त्यांच्या संवेदनशीलतेत आहे. म्हणूनच लाखो लोक म्हणतात— “म्हणूनच मोदीजी हे मोदीजी आहेत.”
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मराठीचा खरा लढा रस्त्यावर नव्हे, बोर्डरूममध्ये
मराठी अस्मिता जागवण्याची मोहिम रिक्षावाले, टपरीवाले, छोटे व्यापारी यांच्यावरच का थांबते? खरा अन्याय तिथे होतो जिथे अर्थकारणाची नाडी धडधडते—BSE–NSE, Bloomberg–Reuters, JP Morgan, BlackRock, Morgan Stanley. तिथे मराठीचा आवाज दुर्मिळ आहे. जर खरंच मराठीचा अभिमान जपायचा असेल तर ट्रेडिंग फ्लोअरवरील Buy–Sell चे मराठीकरण करा, IPO प्रॉस्पेक्टस मराठीत छापा, Bloomberg वर टिकर मराठीत चालवा. ODIN प्लॅटफॉर्मवर मराठी आदेश लागू करा. आणि सर्वात महत्त्वाचे—उच्च पगाराच्या नोकऱ्यांमध्ये मराठी युवकांना संधी द्या. मराठीचा लढा फक्त गरीबांवर सक्ती करून नव्हे, तर कॉर्पोरेट बोर्डरूममध्ये नेऊनच जिंकता येईल. भाषा ही सर्वांसाठी आहे, निवडकांवर दादागिरीसाठी नाही. मराठीचा खरा विजय तोच, जेव्हा जागतिक वित्तीय संस्थांच्या दरवाज्यावर मराठीचे फलक झळकतील.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
Straw Man युक्ती आणि परंपरेचा अपमान
वाद जिंकण्यासाठी लोक अनेकदा Straw Man Fallacy वापरतात—समोरच्याने कधीही न केलेला दावा त्याच्या नावावर लावायचा आणि मग त्याच काल्पनिक दाव्याचे खंडन करून स्वतःला विजेता घोषित करायचे. अलीकडेच जावेद अख्तर यांनी हवनाबाबत केलेले वक्तव्य याचे उदाहरण आहे. हिंदू परंपरेने कधीच ताऱ्यांना हलवण्याचा दावा केलेला नाही. हवनाचा उद्देश सूक्ष्म परिणामांवर—मन, श्वसन, वातावरण, ऊर्जा—यावर आधारित आहे. औषधी धूर हवेतल्या जंतू कमी करतो, मंत्रोच्चारण मन शांत करते, समूह विधी भावनिक बंध वाढवतात. हे सर्व परिणाम मानवावर होतात, ताऱ्यांवर नाहीत. आधुनिक विज्ञानही सूक्ष्म कणांमधून विश्व समजते, जसे परंपरेने सांगितले होते. पाश्चात्य देश आज यालाच Aroma Therapy किंवा Mindfulness म्हणून महागात विकतात. म्हणून परंपरेवर टीका करताना तिचा मूळ हेतू समजून घेणे गरजेचे आहे. धर्म माणसासाठी आहे, आकाशगंगेसाठी नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भाजपची ओळख धोक्यात
महाराष्ट्रात भाजपने अजित पवारांना महायुतीत सामील करून घेतल्यापासून पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हिंदुत्ववादी आणि भ्रष्टाचारमुक्त अशी भाजपची मूळ ओळखच या निर्णयामुळे ढासळत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही याबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता. पण राजकीय अहंकार तृप्त करण्यासाठी भाजपने भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे दिली. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री पद मिळाल्यानंतर अजित पवारांवर असलेले जुने घोटाळे बाजूला सारले गेले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे. भ्रष्टाचाराच्या छायेत भाजपची स्वच्छ प्रतिमा मलिन होत आहे. हिंदू समाज भाजपकडे रक्षक म्हणून पाहतो, पण भ्रष्ट नेत्यांना आश्रय दिल्यास विश्वास डळमळीत होईल. भाजपने तातडीने भ्रष्टाचार्यांना दूर करून आपली मूळ ओळख जपली पाहिजे. अन्यथा पक्षाची विश्वसनीयता गमावण्याचा धोका वाढत आहे.
🔽












Comments