🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 28
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“धर्मरक्षणाच्या नावाखाली बेरोजगारीची नौटंकी”आज गावोगावी आणि सोशल मीडियावर भगवा झेंडा घेऊन घोषणाबाजी करणारे काही तथाकथित युवा नेते दिसतात. बाहेरून हे “धर्मरक्षक” असल्याचा आव आणतात; पण आतून ते अपयशी, दिशाहीन आणि बेरोजगारच असतात. करिअरच्या शर्यतीत मागे पडलेले हे लोक मोठ्ठा आवाज, कपाळावर टिळा आणि फेकबुक-इंस्टाग्रामवरील पोस्ट यावरच आपली नेतागिरी उभी करतात. गोरक्षणाच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी, मोर्चातली घोषणाबाजी, आणि रात्री दारूच्या पार्ट्या—इतकेच त्यांचे धर्मकार्य. घरच्यांच्या पैशांवर बॅनर, मशाली, आणि सोशल मीडियावर पोकळ घोषवाक्ये; पण स्वतःच्या आयुष्यात मात्र नोकरी नाही, संस्कार नाहीत, उद्देश नाही. खरं तर धर्म धोक्यात नाही, धोक्यात आहे यांची अक्कल, रोजगार आणि जबाबदारी. समाजाला दिशाभूल करणारे हे भोंदू धर्मरक्षक म्हणजेच अपयश झाकणारी बुजगावणी आहेत. पुढील पिढीला वाचवायचं असेल तर मुलांना प्रश्न विचारायला, वाचायला आणि विविधतेला स्वीकारायला शिकवलं पाहिजे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“ऑपरेशन कालनेमी : देवभूमीतून भोंदू बाबांचा सफाया!”उत्तराखंडच्या पवित्र देवभूमीत श्रद्धेचा गैरवापर करणाऱ्या बनावट बाबांचा अड्डा उभा राहिला होता. संताचा वेष घेऊन भक्तांची फसवणूक, पैसा उकळणे आणि सनातन धर्माला बदनाम करणे हा उद्योगच सुरू झाला होता. या पाखंडी प्रवृत्तीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी थेट आघाडी घेतली आणि ऑपरेशन कालनेमी राबवले.या कारवाईत तब्बल 4000 संशयितांची चौकशी झाली, तर 300 हून अधिकांना अटक करण्यात आली. हरिद्वारमध्ये सर्वात मोठी कारवाई झाली—2301 चौकश्या आणि 162 अटक. यात संताचा वेष घेतलेला एक बांगलादेशी नागरिकही होता. केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने या फसव्या जाळ्याचा पर्दाफाश झाला.रामायणातील कालनेमीप्रमाणे श्रद्धेची फसवणूक करणाऱ्यांना धामी सरकारने ठाम इशारा दिला आहे: देवभूमी पवित्र आहे आणि तिला कुणीही अपवित्र करू शकत नाही. श्रद्धेचे रक्षण करणारे खरे हिंदुत्वनिष्ठ नेतृत्व देवभूमीला सुरक्षित ठेवू शकते हे या मोहिमेने सिद्ध केले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“पाकिस्तानला चीनचा दणका!”पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अमेरिकेच्या दौर्यानंतर चीनने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. एप्रिल 2025 मध्ये जाहीर केलेली तब्बल 1.16 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत चीनने अचानक रोखून धरली आहे. या मदतीचा हप्ता याच महिन्यात मिळणार होता, पण बीजिंगने पावले मागे घेतल्याने पाकिस्तानचे आर्थिक गणित बिघडले आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आणि चलनवाढीने त्रस्त असलेला पाकिस्तान आता आणखी अडचणीत सापडणार आहे. असीम मुनीरच्या अमेरिकेच्या भेटीमुळे चीनचा विश्वास डळमळीत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. बीजिंगला इस्लामाबादचे वॉशिंग्टनकडे झुकणे अजिबात रुचलेले नाही. त्यामुळेच चीनने दिलेला हा दणका म्हणजे पाकिस्तानला थेट इशारा मानला जात आहे. भारतासाठी मात्र ही घडामोड रणनीतिकदृष्ट्या सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“मुंबई–कोकण रो-रो सेवा : सागरी प्रवासाचा नवा अध्याय” मुंबईकर आणि कोकणवासीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी! लवकरच मुंबई ते कोकण या मार्गावर रो-रो बोटसेवा सुरू होत आहे. या सेवेमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून रस्त्यावरील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे. गाडीसकट प्रवासी थेट समुद्रमार्गे पोहोचू शकतील, हीच योजनेची खासियत आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील सततची कामे, अपघातांचा धोका आणि दीर्घकाळाचा प्रवास या सगळ्यांना ही सेवा पर्याय ठरेल. पर्यटन, व्यापार आणि उद्योगक्षेत्रालाही याचा मोठा लाभ होणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रवास सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित ठरणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांतून आता हा सागरी स्वप्नप्रकल्प प्रत्यक्षात उतरणार आहे. समुद्रावरून कोकण गाठण्याची रोमांचक संधी आता मुंबईकरांच्या हाती येणार आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“भाजप अध्यक्षपदासाठी शिवराज सिंह चौहान आघाडीवर?” भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चर्चा जोरात सुरू असून, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव पुढील पक्षाध्यक्षपदासाठी सर्वात पुढे असल्याच्या शक्यता वाढल्या आहेत. काल रात्री चौहान, माजी हरियाणा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यापूर्वीच चौहान यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती, ज्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. शेतकरीहितैषी प्रतिमा, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क या बळावर चौहान हे एकमताचे उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. जर निर्णय त्यांच्या बाजूने लागला, तर भाजपचे आगामी राजकारण आणि निवडणूक रणनीती शेतकरी व ग्रामीण मतदारांशी अधिक घट्ट जोडली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
🔽












Comments