top of page

अफगाणिस्तानच्या जिगरबाज खेळाडूंचा गौरव

  • dhadakkamgarunion0
  • 1 day ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अफगाणिस्तानच्या जिगरबाज खेळाडूंचा गौरव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने दाखवलेली जिद्द अविस्मरणीय ठरली. डबल सुपर ओव्हरमध्ये गुरबाजने सलग तीन सिक्स मारून सामना जवळजवळ पलटवला होता. इतक्या दबावात अशी कामगिरी करणे हे अशक्यप्राय असते, पण त्याने ती करून दाखवली. शेवटच्या चेंडूवर तो आऊट झाला तरी त्याची धडाडी क्रिकेटप्रेमींच्या मनात कायम राहील. अफगाणिस्तानची ही टीम कठीण परिस्थितीतून उभी राहिली आहे. देशात मूलभूत सुविधा नसतानाही त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळून दाखवले. पराभवाचे भांडवल न करता, बांगलादेश-पाकिस्तानसारखे बहाणे न करता त्यांनी नेहमी जिगर दाखवली. त्यांच्या खेळामुळे केवळ अफगाण नागरिकांनाच नव्हे तर भारतीय चाहत्यांनाही अभिमान वाटतो. ही पहाडी पोरं निराशेतूनही आनंदाचे क्षण निर्माण करतात, आणि त्यांचे क्रिकेट हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पुण्यातील वादग्रस्त प्रकारावर टीका

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हल दरम्यान विद्यार्थ्यांनी तलवारींचा नृत्यप्रकार सादर केला आणि बांगलादेशी झेंडे फडकवले. या कार्यक्रमावर भाजप युवा मोर्चाने आक्षेप घेतला आणि नंतर बांगलादेशी विद्यार्थ्यांचा स्टॉल उधळून लावला तसेच झेंडा जाळल्याची घटना घडली . ही घटना अत्यंत निंदनीय आहे. महाविद्यालय हे सांस्कृतिक आदानप्रदानाचे केंद्र असते, हिंसक निदर्शने किंवा परकीय झेंड्यांचा अपमान करण्याचे ठिकाण नव्हे. विद्यार्थ्यांनी तलवारींचा वापर करून केलेला नृत्यप्रकारही धोकादायक आणि असंवेदनशील ठरतो. अशा कृतींमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळतो आणि पुण्याच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का बसतो. लोकशाही समाजात मतभेद व्यक्त करण्याचे मार्ग असतात, पण हिंसा, तोडफोड आणि परकीय राष्ट्रांचा अपमान हा मार्ग कधीच स्वीकारार्ह ठरू शकत नाही.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात

संवेदनशीलतेचा अभाव

फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये घडलेली घटना ही आपल्या पोलीस यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभारते. एका महिलेने जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलले जात असल्याची तक्रार केली, पण महिला पोलीस कॉन्स्टेबलने तिची तक्रार नोंदवण्याऐवजी तिला पुन्हा दलालाच्या हवाली केले. ही कृती केवळ कायद्याचा भंग नाही तर मानवी मूल्यांचा अपमान आहे. निलंबन हा तात्पुरता उपाय असला तरी अशा अधिकाऱ्यांना पुन्हा गुपचूप नोकरीवर घेणे ही प्रथा थांबली पाहिजे. भ्रष्टाचार आणि दलालीत महिला अधिकारीही पुरुषांइतक्याच पुढे आहेत, हे अनेक अनुभव सांगतात. पोलीस दलात दयामाया, संवेदनशीलता आणि जबाबदारी या मूल्यांना प्राधान्य दिले नाही तर नागरिकांचा विश्वास कायमचा ढासळेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बांगलादेशातील तकलादू लोकशाही

बांगलादेशात सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीला लोकशाहीचे स्वरूप फारसे राहिलेले नाही. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या अवामी लीगला निवडणुकीत भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, मैदानात केवळ तीन प्रमुख स्पर्धक उरले आहेत—तारेक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनल पार्टी, अकरा पक्षांचा जमात-ए-इस्लामी मंच आणि विद्यार्थी संघटनांनी स्थापन केलेला नॅशनल सिटीझन्स पार्टी. ज्यांनी देशावर अकरा वर्षे सत्ता गाजवली त्या पक्षाला निवडणुकीतून वगळणे ही लोकशाहीची पायाभरणीच कमकुवत करणारी बाब आहे. या प्रक्रियेतून निर्माण होणारे सरकार कितीही लोकप्रिय असले तरी त्याला खरी लोकशाही मान्यता मिळणार नाही. निवडणूक ही केवळ आवरण ठरते आणि त्यामागे हुकूमशाही व अस्थिरतेचे सावट दिसते. बांगलादेशाची वाटचाल ही तकलादू लोकशाहीच्या आड दडलेल्या आतंकवादाकडे होत असल्याचे हे संकेत आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ढोंगीपणाचा आरसा

राजकारणात सातत्य आणि नैतिकता हीच खरी कसोटी असते. महायुती सरकारने नवाब मलिक यांना क्लीन चिट दिली, संघाने सलमान खानच्या कार्यक्रमाला मान दिला, तर भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांनी वादग्रस्त व्यक्तींशी संबंध ठेवले—या तिन्ही प्रसंगांवर अनेकांनी कठोर टीका केली होती. पण परभणी महापालिकेत शिवसेना उबाठा यांनी सय्यद इकबाल यांना महापौर केले तेव्हा जर तीच मंडळी शांत राहिली, तर त्यांची टीका आज ढोंगीपणाच ठरते. येशू ख्रिस्ताचे वचन आहे—“ज्याने पाप केले नसेल फक्त त्यानेच दगड मारावा.” राजकीय टीका ही निवडक प्रसंगांपुरती नको, तर सातत्याने असावी. अन्यथा ती केवळ पक्षनिष्ठेची ढाल ठरते. खरी लोकशाही म्हणजे सर्वांना समान निकषांनी तपासणे, आणि त्यातच नागरिकांचा सन्मान आहे.

🔽



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page