top of page

हमाम मे सारे (नेता) नंगे ! घराणेशाही ऐवजी परिवारशाही!

dhadakkamgarunion0

🖋️ अभिजीत राणे लिखित

दै. मुंबई मित्र

वि श्ले ष ण रा ज का र णा चे

=====

हमाम मे सारे (नेता) नंगे !

घराणेशाही ऐवजी परिवारशाही!


अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत भाजपा ही सातत्याने काँग्रेसच्या एवं गांधी घराण्याच्या घराणेशाहीवर टीका करीत आली आहे.

नेहरू मग इंदिरा गांधी - संजय गांधी यांच्या अकाली मृत्यू नंतर राजीव गांधी मग सोनिया गांधी मग राहुल गांधी आणि त्याबरोबर आता प्रियांका गांधी. नेहरू गांधी परिवाराने कसा काँग्रेस पक्षावर आणि त्या द्वारे देशावर राज्य केले - करू पाहत आहे याचे रसभरीत वर्णन टीका भाजपा लोकांपुढे करत आली आहे.


परंतु आता भाजपाचं पक्षम्हणून एक नव्हे तर अनेक परिवाराचा पुरस्कार करीत आहे. त्यांच्या जोडीला त्यांचे मित्रपक्ष आणि इतर ही आहेत. इंडिया आघाडीतले पक्ष हे तर अनेक परिवारांनी स्वतः साठी सुरु केलेल्या प्रायव्हेट कंपन्याच आहेत. त्यामुळे म्हणतो की हमाम मे सारे नंगे..


महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत देण्यात आलेल्या उमेदवाऱ्या वरून आता परिवार शाही सर्वसंमत असून, निवडणूक जिंकण्यासाठी तिचाच आधार घ्यावा लागत असल्याची अपरिहार्यता दिसून येते. त्यामुळेच परिवार शाही हा आता राजकीय मुद्दा राहिलेला नाही.


दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांशी थेट स्पर्धा असलेल्या ‘इंडिया’ आघाडी आणि ‘एनडीए’ आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपल्या नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली आहे.


कोणताही मोठा राजकीय पक्ष घराणेशाहीच्या आरोपांपासून अस्पर्श राहिलेला नाही.


महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी घराणेशाहीचा सारखाच पुरस्कार केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती किंवा ‘एनडीए’ आघाडीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 27 म्हणजेच ११ टक्के उमेदवार हे राजकीय घराण्याशी संबंधित असल्याचे एका सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. त्याच वेळी, विरोधी महाविकास आघाडीने घोषित केलेल्या उमेदवारांपैकी 31 म्हणजेच १२ टक्के तिकिटे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटली आहेत.

यानंतर कोणताही पक्ष कोणावरही घराणेशाहीचा आरोप करू शकणार नाही.


महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या संदर्भात कुटुंबांमध्ये वाटलेल्या तिकीटांचे आकडे बघितले, तर भाजपने १० तिकिटे कुटुंबात दिली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ तिकिटे दिली आहेत.


या लढतीत ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने पैकी ८ तिकिटे दिली आहेत, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने १० तिकिटे दिली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ८ तिकिटे घराणेशाहीतील उमेदवाराला दिली आहेत.


विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना तिकीट दिले आहे. यासोबतच आशिष व विनोद शेलार अशी एकाच कुटुंबाला दोन तिकिटे देण्यात आली आहेत. आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून तर त्यांचे धाकटे बंधू विनोद शेलार यांना मालाडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितीश राणे, नीलेश राणे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष, त्यांची कन्या संजना जाधव, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे लहान बंधू अमल महाडिक, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील, माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.


घराणेशाहीविरोधात सर्वाधिक आवाज उठवणाऱ्या भाजपने झारखंड विधानसभा निवडणुकीतही वेगळे पाऊल टाकले आहे. झारखंडमध्ये भाजपने माजी मुख्यमंत्री आणि सध्या ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांची सून पूर्णिमा दास, माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि त्यांचा मुलगा बाबुलाल सोरेन, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा यांना उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा, धनबादचे खासदार धुल्लू महतो यांचे भाऊ आणि आजारी आमदार इंद्रजीत महतो यांच्या पत्नी तारा देवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.


‘झारखंड मुक्ती मोर्चा’च्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’आघाडीचे सत्ताधारी कुटुंब झारखंडच्या राजकारणात सक्रिय आहे. शिबू सोरेन कुटुंबातील दोन मुलगे आणि दोन सून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांच्या पत्नी कल्पना आणि धाकटा भाऊ बसंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाच्या तिकिटावर बऱ्हेत, गांडे आणि दुमका येथून निवडणूक लढवत आहेत. त्याचवेळी शिबू यांची मोठी सून आणि हेमंत सोरेन यांची भावजयी सीता जामतारा येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.


काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरेन्स, पी डी पी, हरियाणात चौटाला, उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यादव कुटुंब, बिहारमध्ये लालू यादव कुटुंब, शरद पवार यांची राष्ट्रवादी, महाराष्ट्रात शिवसेना, तामिळ नाडू मध्ये डी एम के पक्ष - चोहोंकडे नजर टाका तुम्हाला परिवारासाठी पक्ष आणि मग पक्षांसाठी परिवार असेच चित्र दिसेल.


मंत्री, खासदार, आमदारांच्या घरातील लोकांना तिकीट वाटपात प्राधान्य मिळते, हे आता उघड सत्य आहे.


घराणेशाही संपली. परिवारशाही झिंदाबाद.


 




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page