संयमाचा बांध आणि सुन्नता
- dhadakkamgarunion0
- Jan 30
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संयमाचा बांध आणि सुन्नता
पुरुषांना उघडपणे रडण्याची मुभा नसलेल्या आपल्या समाजात, जबाबदारीचे ओझे वाहणाऱ्या नेत्यांची हतबलता काळजाला भिडणारी असते. अजितदादांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांचा सुन्न चेहरा आणि झुकलेले खांदे बरंच काही सांगून गेले. राजकीय गणितांपलीकडचे एक निखळ मैत्र आणि प्रशासकीय कामातला 'उजवा हात' गमावल्याचे दुःख त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट जाणवत होते. एकनाथ शिंदे यांनी तर स्वतःच्या आयुष्यात असा आघात सोसला आहे, त्यामुळे या दुःखाची झळ त्यांना अधिक ठाऊक आहे. आपल्या माणसाचे अचानक जाणे पचवणे कठीण असते; तिथे रडू येत नाही, फक्त मती गुंग होते. ही सुन्नता घालवण्यासाठी भावनांना वाट करून देणे गरजेचे असते. दादांच्या कुटुंबावर कोसळलेला हा डोंगर पचवण्याची आणि विस्कटलेली राज्याची घडी पुन्हा बसवण्याची ताकद नियतीने या दोन्ही नेत्यांना द्यावी, हीच प्रार्थना.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जर्मनीचा कल आणि उजव्या विचारसरणीचा उदय
जर्मनीच्या अलीकडील निवडणुकीचे निकाल संपूर्ण जगाला चकित करणारे आहेत. ६३० जागांच्या संसदेत बहुमतासाठी ३१६ चा आकडा हवा असताना, सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीला केवळ १२१ जागांवर समाधान मानावे लागले. याउलट, विरोधी ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी २०८ जागांसह मोठी ठरली असली तरी, खरा 'धमाका' केला आहे तो अवघ्या तीन वर्षे जुन्या A.F.D. (Alternative for Deutschland) या पक्षाने.१५१ जागा मिळवून या पक्षाने किंगमेकरच्या भूमिकेत झेप घेतली आहे. 'निओ-नाझी' कडे झुकणारी आणि कट्टर उजव्या विचारसरणीची ही संघटना प्रामुख्याने घुसखोर विरोधाच्या मुद्द्यावर लढली. युरोपमधील बदलती सामाजिक समीकरणे आणि घुसखोरांच्या प्रश्नावर स्थानिक जनतेमध्ये असलेला असंतोष या निकालांतून स्पष्टपणे दिसून येतो. आज परिस्थिती अशी आहे की, या पक्षाला सोबत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य झाले आहे. जागतिक राजकारण कोणत्या दिशेने वळत आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
स्पष्टवक्तेपणाचा एक झंझावात लोपला
राजकारणात 'बरं' बोलणाऱ्यांच्या गर्दीत 'खरं' बोलण्याचे धाडस जपणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. आचरट मागण्या किंवा अवास्तव अपेक्षा असणाऱ्यांना आरसा दाखवताना त्यांनी कधीही परिणामांची तमा बाळगली नाही. त्यांच्या या रोकठोक स्वभावाची किंमत त्यांनी राजकीय स्तरावर अनेकदा मोजली, तरीही त्यांनी आपला बाणा सोडला नाही. स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख आणि नवा प्रवास समर्थपणे सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. आज सर्वपक्षीय नेते आणि सामान्य जनता ज्या पद्धतीने हळहळ व्यक्त करत आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की दादा केवळ एका पक्षाचे नेते नव्हते. शिस्त, कामाचा उरक आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे त्यांनी पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक 'कर्तृत्ववान पर्वाचा' असा अकाली अंत होणे ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली!
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
कोणत्याही मोठ्या राजकीय व्यक्तीच्या निधनानंतर सहवेदना व्यक्त करण्याऐवजी 'घातपाताच्या' वावड्या उठवणारी एक विकृत टोळी समाजात सक्रिय होते. अजितदादांच्या अपघाताची बातमी पूर्णपणे स्पष्ट होण्याआधीच सोशल मीडियावर 'कॉन्स्पिरसी थिअरीज'चा बाजार मांडला गेला. ही प्रवृत्ती केवळ दुर्दैवी नसून मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखी आहे. राजकीय द्वेषातून किंवा स्वस्त प्रसिद्धीच्या हावेपोटी हे लोक मृताच्या कुटुंबीयांच्या दुःखावर मीठ चोळतात. वस्तुस्थिती ही आहे की, राजकीय नेते किंवा उद्योजक हेदेखील हाडामांसाचे सामान्य माणूसच असतात. त्यांनाही आजार, अपघात आणि निसर्गाचे नियम लागू होतात. मृत्यू कोणालाही वगळत नाही— "No one is immune to death." अशा अफवांकडे दुर्लक्ष करणे हीच त्या मृत आत्म्याला खरी श्रद्धांजली ठरेल. विवेकी समाजाने या डिजिटल प्रदूषणापासून लांब राहून सत्याचा स्वीकार करायला हवा.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ही शोकांतिका केवळ एका जननायकाच्या अंताची नाही, तर कर्तव्याच्या वाटेवर विरलेल्या पाच स्वप्नांची आहे. विमान अपघातात अजितदादांसोबतच विदीप जाधव, पिंकी माळी, शांभवी पाठक आणि सुमित कपूर या चार जिवांची झालेली एक्झिट काळजाला चटका लावणारी आहे. विदीप जाधव आयुष्यभर सावलीसारखे सोबत राहिले आणि अखेरच्या प्रवासातही ती सोबत सुटली नाही. पिंकी माळी आणि शांभवी पाठक यांसारख्या कर्तबगार महिलांच्या जाण्याने दोन कुटुंबांचे भविष्य काळवंडले आहे. लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या शांभवीची अशी 'विदाई' कोणालाच अपेक्षित नव्हती. अनुभवी सुमित कपूर यांच्या १६ हजार तासांच्या अनुभवावरही मृत्यूने मात केली. इतिहास अनेकदा फक्त 'राजा'ची नोंद ठेवतो, पण त्यासोबत शहीद होणाऱ्या निष्ठावंतांच्या त्यागाचे मोलही कमी नसते. ही पाचही माणसे आपापल्या कुटुंबाचे 'विश्व' होती. ही हानी केवळ महाराष्ट्राची नाही, तर माणुसकीची आहे.
🔽







Comments