top of page
dhadakkamgarunion0

भाजपाचे तारणहार महायुतीचे संकटमोचक नरेंद्र शिष्य: देवेंद्र फडणवीस!

दै. मुंबई मित्र वि शे ष सं पा द की य

=====

भाजपाचे तारणहार महायुतीचे संकटमोचक नरेंद्र शिष्य: देवेंद्र फडणवीस!


श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस या व्यक्तीच्या भोवती गेली दहा वर्षे महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा मराठा चेहरा पुसून आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीलाच आत्मसात करून; एका ब्राह्मणाने राजकीय अवकाश इतका दीर्घकाळ व्यापणे हा खरोखर एक चमत्कार आहे.


केवळ ५३ वर्षे वय असलेल्या देवेंद्रजींनी केलेलं कार्य नक्कीच खुप मोठे आहे. संघाची पार्श्वभूमी असलेले देवेन्द्रजी एक सभ्य, सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांची विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि ‘अभ्यास केल्याशिवाय बोलायचे नाही’ हा दंडक त्यांच्या मुखातून निघणार्या प्रत्येक शब्दातून जाणवतो.


नागपूर महापालिकेच्या नगरसेवक पदापासून सुरु झालेला राजकीय प्रवास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असा घडला आहे. या संपूर्ण कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला विरोधकांना मिळालेला एकमेव मुद्दा म्हणजे त्यांचे ब्राह्मण असणे. देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष ते ब्राह्मण आहेत म्हणून केला जातो.


ब्राह्मण असूनही आणि संघाचे असूनही आपल्या कृतीने ते शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत हे वारंवार सिद्ध करत असतात. त्यामुळे शाहू फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेत जातीयवादी आणि ब्राह्मणद्वेषाचे राजकारण करणाऱ्या पवारांसारख्या राजकारणी मंडळींची प्रचंड अडचण होते. त्यांना शेवटी “शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राचे अनुयायी’ हा मुखवटा उतरवून आपला अस्सल ब्राह्मणद्वेष्टा, हिंदू द्वेषी आणि मुस्लीम तुष्टीकरण करणारा सत्य चेहरा दाखवण्याची वेळ येते. पवारांच्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी नेत्यांचे आणि पत्रकारांचे बुरखे व मुखवटे टराटरा फाडण्याचे कार्य देवेन्द्रजींनी केलेले आहे.


२०१४ ते २०२१९ या पाच वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अत्यंत उत्तम काम केले. जलयुक्त शिवार च्या माध्यमातून तयार केलेली शेततळी आणि त्यातून होणारे सिंचन याचा शेतकऱ्यांना प्रचंड लाभ होतो आहे आणि त्याचे संपूर्ण श्रेय देवेन्द्र फडणवीसांनाच जाते. सलग पाच वर्षे महाराष्ट्रात विकासाचे राजकारण करून त्यांनी विरोधकांच्या सर्व चालींना नामोहरम करण्यात यश मिळवले. शरद पवारांना सतत पाच वर्ष स्टेल मेट देत त्यांनी उत्तम राज्य चालवून दाखवले. शिवसेना संपूर्ण पाच वर्ष विरोधी पक्षाच्या मानसिक अवस्थेत होती तरीही त्यांना बरोबर घेत त्यांनी उत्तम कारभार केला. या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत अर्वाच्य भाषेत टीका केली गेली.. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या चौथ्या पाचव्या स्तरावरील कार्यकर्त्यांना फडणवीस यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्यासाठी उद्युक्त केले होते, याला शिवसेना सुद्धा अपवाद नव्हती. परंतु या दर्जाहीन टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही. उलट सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामे सुद्धा पुरेसा निधी उपलब्ध करून देत मार्गी लावली. आपपरभाव न बाळगता काम करणारा हा मुख्यमंत्री सर्वच आमदारांच्या आदरास आणि प्रेमास पात्र झाला होता.


हे करत असतानाच त्यांनी प्रत्येक विरोधी पक्षातील मुख्य नेत्यांशी वैयक्तिक मैत्रीचे बंध सुद्धा निर्माण केले. याचमुळे आपल्या पक्षश्रेष्ठींशी संघर्ष निर्माण झाल्यावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि कोन्ग्रेसचे मुख्य नेते विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपात आले. त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक पक्षात स्थापित करण्याचे कार्य देवेंद्रजींनी केले.


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना वेगळा विचार करत आहे याची कुणकुण लागली होती. केंद्रीय भाजपा नेते सुद्धा एकट्याने निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने विचार करत होते तरीही केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत युती झाली. सुस्पष्ट बहुमत सुद्धा मिळाले होते. भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. पुन्हा युती सरकार स्थापन होणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते.


परंतु उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली आणि त्यांनी महा विकास आघाडी बनवत देवेंद्र फडणवीस यांना चक्क फसवले. नंतर अजित पवारांसह औटघटकेचे सरकार बनविले गेले आणि शरद पवारांनी सुद्धा त्यांचा सुप्रसिद्ध खंजीर प्रयोग परत एकदा राबवून दाखवला. मुख्यमंत्री पद भूषवत असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्याची, त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तरीही देवेंद्र फडणवीस यांनी कधीही उद्धव ठाकरे यांना दुरुत्तर केले नाही. त्यांचा हा संयम त्यांच्या समर्थकांना संतप्त करत होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी कधीही मर्यादा भंग केला नाही. एक स्टेट्समन कसा असावा याचा वस्तुपाठ ते महाराष्ट्रातील जातीवादाने आणि ब्राह्मण द्वेषाने बरबटलेल्या राजकारणातील सहकाऱ्यांच्या समोर निर्माण करत होते.


या सगळ्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यावर चोहोबाजूने टीका होत होती. त्यांच्या संयमी राजकारणामुळे ते सेटलमेंट करत आहेत हा आरोप विरोधक आणि मिडीयाच नव्हे तर त्यांचे कट्टर समर्थक सुद्धा करत होते. परंतु देवेंद्रजी शांत होते. या सगळ्या टीकेला अत्यंत धीरोदात्तपणे सहन करत होते. त्या नंतरच्या राजकीय घटनाक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या अजातशत्रू राजकारणाची पीछेहाट होते आहे असे सलग अडीच ते तीन वर्ष वाटत होते. पडद्यामागे घडणाऱ्या घटनांची कुणालाही कल्पना येऊ नये म्हणून त्यांनी ही शांतता बाळगली होती हे आज लक्षात येते आहे.


उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री म्हणून असणाऱ्या मर्यादा पहिल्या दिवसापासून दिसत होत्या. त्यात कोरोना कालखंडात त्यांच्यावर अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून शिक्का बसला. हिंदुत्वाशी उद्धव ठाकरेंनी घेतलेली फारकत, मुस्लीम तुष्टीकरण आणि पवारांच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करणे यामुळे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले सगळेच शिवसैनिक अवस्थ झालेले होते. या अस्वस्थतेला हळुवार फुंकर घालत, त्यांचा विश्वास जिंकत देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन गुवाहाटी यशस्वी केले. इतकेच नाही राजकारणात अत्यंत दुर्मिळ असलेला स्वार्थत्याग करत स्वतःकडे उपमुख्यमंत्रीपद ठेवत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवले. एक व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस हा माणूस अस्सल बावन्नकशी सोने आहे हे सिद्ध करणारा तो क्षण होता.


असा निर्णय घ्यायला खूप मोठे मन लागते. आपल्या पक्षावर अव्यभिचारी निष्ठा असावी लागते. देवेन्द्रजींनी केलेल्या त्या त्यागाने त्यांची जनमानसातील प्रतिमा अत्यंत झळाळून निघाली. घराणेशाहीने दिलेले परम अहंकारी , कर्तुत्वशून्य, स्वार्थी, कुटील आणि खुनशी राजकीय नेते महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे बघत आला आहे. या सगळ्या खड्यांमध्ये देवेंद्र फडणवीस हा हिरा आपल्या अंगभूत गुणांच्या तेजाने चमकतो आहे याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी नक्कीच घेतली असणार आणि भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या मतांच्या त्सुनामीने यावर नक्कीच शिक्कामोर्तब होणार आहे.


एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष राजकीयदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या ताब्यात घेण्याची मोहीम सर्वार्थाने यशस्वी होण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची तपस्याच आहे हे सर्वज्ञात गुपित आहे. कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनू सिंघवी यांच्या सारखे जेष्ठ वकील नेमून सुद्धा सर्वोच्च न्यायालयात शिंदेंच्या बाजूने लागलेला निकाल हा देवेंद्र फडणवीस यांच्यातील कायद्याचा सखोल अभ्यास असणाऱ्या, अत्यंत बुद्धिमान आणि कसलेल्या वकिलाचे यश आहे. ऑपरेशन गुवाहाटी असेल किंवा राज्यसभेतील खासदारांच्या साठी झालेली निवडणूक असेल; या घटना एक संसदपटू, एक योजक म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब करतात.


सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्यानंतर आता हे सरकार स्थिर आहे आणि आपला कार्यकाल पूर्ण करेल याबद्दल कोणताच संशय उरला नव्हता. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांना आता चेकमेट करण्याची वेळ आली होती. सत्तेचा मोह पवारांना सुटत नाही हे जुने सत्य परत एकदा अधोरेखित होऊ लागले होते. सत्ता हातातून गेल्यावर पवार पक्षावरील पकड काही केल्या सोडायला तयार नव्हते आणि याचा लाभ घेत देवेंद्र फडणवीसांनी आपला वैयक्तिक मित्र अजित पवार याला महाविकास आघाडी आणि सेक्युलर तंबूचा त्याग करत NDA चा भाग होण्यासाठी प्रेरित केले.


संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी घडामोड झाली आणि अजित पवार आपल्या ३५ सहकाऱ्यांच्यासह भाजप आणि शिवसेना या युती सरकारला पाठींबा देऊन मोकळे झाले. अर्थात हा पाठींबा दिल्या दिल्या त्यांना नऊ मंत्रिपदे देण्यात आली. या नऊ मंत्र्यांकडे पाहिले तर शरद पवार यांच्या दरबारातील नवरत्नेच देवेंद्रजी घेऊन आले आहेत हे लक्षात येईल.


या सर्व घटनाक्रमात सगळ्यांना देवेंद्र फडणवीस हे धुरंधर राजकारणी वाटतील परंतु माझे मत भिन्न आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अजातशत्रू स्वभाव हे या यशाचे खरे गुपित आहे. मला स्वतःला असे वाटते की एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार हे राजकारणी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून किंवा आपल्या राजकीय स्थैर्याचा आणि प्रगतीचा विचार करून आज भाजपाशी संलग्न नाहीत; तर त्यांना त्यांचा मित्र देवेंद्र फडणवीस याने भाजपाबरोबर येण्यासाठी उद्युक्त केले आहे आणि मित्राचा शब्द प्रमाण मानून त्यांनी आपली आजवरची राजकीय वाटचाल बदलून हिंदुत्ववादी राजकारणाला अंगिकारले आहे.


सत्ता असली किंवा नसली तरी अनाकलनीय राजकीय चाली चालत सत्तेच्या जवळ पोचण्याचे पवारांचे कसब सर्वज्ञात आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा युती सरकार आलेले असताना शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी जेम्स लेन प्रकरण पेटवत महाराष्ट्रातील वातावरण जातीयवादी आणि विषारी करत सत्ता मिळवली होती हा इतिहास आहेच. त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा इथे झालेल्या दंगलीचा राजकीय लाभ घेण्याचा त्यांनी २०१९ला मोठा प्रयत्न करून बघितला होता पण जनतेने तरीही त्यांना नाकारले. आता पवारांनी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात परत एकदा जातीयवाद पेटवला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा केला आहे. त्यांच्या या कटू चालींना लोकसभा २०२४ मध्ये निश्चित यश मिळाले.


लोकसभा निवडणुकीच्या नंतर महायुती सरकार ने दुसरा गियर टाकून विकास आणि कल्याणकारी योजना यांचा धडाकाच लावला. लाडकी बहिण योजना , लाडका भाऊ योजना , शेतीसाठी लागणारी वीज मोफत देणे योजना, महिलांना एस टी प्रवास मोफत करणे. ब्राह्मण समाजाच्या प्रदीर्घ मागणीला मान्यता देत परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, मराठा आरक्षण लागू करणे अशा कित्येक योजना अत्यंत लोकप्रिय होत आहेत आणि पवारांनी निर्माण केलेले नकारात्मकतेचे मळभ नष्ट होते आहे.


देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दूरदृष्टी असणारे नेते आहेत आणि हे त्यांनी कायमच सिद्ध केले आहे. मग मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार करून त्यांचे महाराष्ट्रात उत्पादन सुरु करणे जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल हे त्यांचे धोरण यशस्वी होते आहे. आज महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत पहिला क्रमांक परत मिळवला आहे. मध्यंतरी महाआघाडी सरकार मध्ये परकीय गुंतवणूक ठप्प झालेली होती.


मेट्रो प्रकल्प गतिमान करणे , अटल सेतू , कोस्टल रोड प्रकल्प , समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ मार्ग, मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प, बुलेट ट्रेन पकल्प या सगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या मेगा एक्सप्रेसवेवर नेले आहे पुढील पाच वर्षात महाराष्ट्राचे चित्रच पालटलेले असेल.


देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहेत.


कृष्ण आणि चाणक्य यांचा उल्लेख आपण नेहमीच धुरंधर राजकारणी म्हणून करतो. हे दोघेही सकारात्मक राजकारणी होते. यांनी जनकल्याण हाच हेतू मनात ठेवून सर्व राजकारण केले आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर देवेंद्र फडणविसांनी स्वतःला त्यांच्याप्रमाणेच अजेय सिद्ध केले आहे. जातीयवादी , घराणेशाही विचारधारेच्या नेत्यांनी महाराष्ट्र ही दुभती गाय आहे आणि हिचे दोहन करून आपल्या कुटुंबाचे कल्याण करणे हा एकमेव हेतु ठेवून आजवर राजकारण केले होते. हे जातीयवादाचे विष महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात संपूर्ण भिनले आहे आणि अश्या पार्श्वभूमीवर एक ब्राह्मण व्यक्ती निखळ विकासाची दिशा डोळ्यासमोर ठेवून राजकारण हे राज्याच्या सर्वांगीण विकास साधण्याचे एक साधन आहे असे समजतो हे चित्रच अत्यंत विरळ आहे.


देवेंद्रजीची ही विकासात्मक दृष्टी हळूहळू जनसामान्यांच्या हृदयात सुद्धा घर करत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार हे फक्त जातीयवादी बोलतात, जातीयवादी शिवीगाळ करतात आणि देवेंद्र फडणवीस कायमच विकासावर आणि समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेवर भाष्य करतात यातील फरक महाराष्ट्रातील जनतेला उमजू लागला आहे आणि याचा सकारात्मक परिणाम आपल्याला विधानसभा २०२४ मध्ये नक्कीच दिसणार आहे.


” देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी, चाणक्य आणि नरेंद्र मोदी यांच्या उत्तमोत्तम गुणांचा संगम आहे.”


महाराष्ट्राला खूप काळ हुलकावणी दिलेले पंतप्रधानपद आई भगवतीच्या कृपेने व देवेंद्रजी फडणवीस यांच्या रूपाने प्राप्त होवो हीच तिच्या चरणी प्रार्थना.


 








3 views0 comments

Comments


bottom of page