नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले ...
- dhadakkamgarunion0
- Jul 7
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले आंदोलन सध्या देशभरात चर्चेत आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळवून हे आंदोलन वेग घेत असतानाच, दीपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे. अण्णांना आंदोलनात सामील करणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी ६०-७० पार केलेल्या ज्येष्ठांनी चळवळींमधून निवृत्त होऊन आश्रमात विश्रांती घ्यावी, असा सल्ला दिला. तरुणांनी स्वतःचे भवितव्य स्वतः ठरवावे हा विचार योग्य असला, तरी ज्या अण्णा हजारेंनी देशात आंदोलनाचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांच्याबद्दल अशी 'म्हातारे' सारखी भाषा वापरणे केवळ धक्कादायक नसून अशोभनीय आहे. आंदोलनाचा आवेश असणे गरजेचे आहे, पण त्यात ज्येष्ठ नेतृत्वाचा अवमान करू नये हा संकेत अभिजीत दीपके यांनी पाळला नाही हे खेदजनक आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरू लागतात याचा अनुभव सध्या सुनेत्रावहिनी घेत असतील. अजित पवारांच्या धक्कादायक निधनानंतर पक्ष एकजूट ठेवण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारून सत्तेच्या परिघात राहावे लागले. परंतु अजित दादांची तडफ त्यांच्याकडे नसल्याने त्या सत्तेत गुरफटून गेल्या आहेत. सुनील तटकरे, छगन भूजबळ आणि प्रफुल पटेल तिघेही सध्या मैदानात उतरण्यात उत्सुक नाहीत. पार्थ आणि जय यांचा पिंड नाही. त्यामुळे अजित दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी मजबूत करण्याचे काम कोणीच केले नाही. याचा परिणाम असा झाला आहे की राज्यभरातील अजित दादांशी एकनिष्ठ परंतु नवीन व्यवस्थेत आपले भवितव्य अंधःकारमय आहे असे समजणारे स्थानिक पातळीवरील प्रभावी नेते संभ्रमित झाले असून एकनाथ शिंदे त्यांना गळाला लावत आहेत. परभणीचे जिल्हाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे विश्वासू नेते प्रताप देशमुख यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण दिले असले तरी परभणीतील स्थानिक राजकीय समीकरणे आणि निवडणुकीतील पक्षाच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. मराठवाड्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे नाराज नेत्यांना पक्षात घेण्यावर भर देत असून, प्रताप देशमुखांच्या संभाव्य प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
चीनच्या आर्थिक महासत्तेमागे केवळ स्वस्त कामगार नसून, तिथली वेगवान आणि पारदर्शक 'औद्योगिक परिसंस्था' (Industrial Ecosystem) आहे, हे एका भारतीय उद्योजकाच्या अनुभवातून स्पष्ट होते. जागा निवडीपासून अवघ्या सहा महिन्यांत उत्पादन सुरू होणे, लालफितीचा कारभार नसणे, एक खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि सुस्पष्ट करप्रणाली (फॅपिओ) यामुळे चीनमध्ये उद्योगांची भरभराट झाली. टेबलाखालची देवाणघेवाण नसणे आणि उद्योगांना पूरक अशा पायाभूत सुविधा हे चिनी मॉडेलचे बलस्थान आहे. भारताला जर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जागतिक केंद्र बनायचे असेल, तर केवळ 'मेक इन इंडिया'च्या घोषणा पुरेशा नाहीत; तर चीनसारखी 'व्यवसाय सुलभता' (Ease of Doing Business) प्रत्यक्षात आणावी लागेल. भारतीय उद्योजक अधिक तरबेज आणि अनुभवी आहेत. गरज आहे ती फक्त नोकरशाहीचा अडथळा दूर करून, उद्योगांना शांतपणे आणि वेगाने काम करू देणारे वातावरण देण्याची. तरच भारत चीनला मागे टाकू शकेल.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांची धाकधूक वाढवणारी घटना घडलेली आहे. मागील वर्षी विजय यांची करूर येथे जी रॅली झाली होती त्या रॅली मध्ये घडलेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी डीएमकेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी होणार आहे. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू, तर 142 जण जखमी झाले होते. या सुनावणीत जर विजय यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ठपका ठेवला तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. डीएमकेने मंत्री आधव अर्जुन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची आणि सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत टीव्हीकेच्या मंत्र्यांना या प्रकरणावर सार्वजनिक वक्तव्य करण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचे भांडवल करून विजय यांना पदच्युत करण्याचा पूर्ण प्रयास डीएमके कडून सुरू आहे. त्यांनी विजय यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या कोणीही पीडित कुटुंबीयांशी थेट संपर्क करू नये असा आदेश न्यायालयाने द्यावा ही मागणी सुद्धा केली आहे. या सुनावणीकडे आता संपूर्ण तामिळनाडूचे लक्ष लागले आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनजीवन व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यात कनेक्टिंग लिंक बंद पडली आणि जोडीला मुंबई पुणे रेल्वे सुद्धा दरड कोसळल्याने थंडावली. या परिस्थितीचा लाभ घेऊन सुप्रिया सुळे अस्तन्या सरसावून महाराष्ट्र सरकार विरुद्ध मैदानात उतरल्या. सुप्रिया सुळे यांनी सरकारवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. मुंबई-पुण्यासाठी पाऊस नवा नसतानाही, एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र 'पॅरालाइज' (हतबल) झाल्याचे चित्र समोर आले आहे. या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावर उत्तर द्यावे, ही सुळे यांची मागणी ढासळत्या व्यवस्थेवर अचूक बोट ठेवले. मुळातून भाजपा सरकार आणि कंत्राटदार यांचे मधुर संबंध आणि कोट्यवधी रुपये खर्च वाढवून होणारे प्रकल्प यावर सातत्याने टीका होत आहे. त्यातूनच दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या घटना घडल्यामुळे विरोधक आणि सामान्य जन संतापले आहेत.
🔽








Comments