top of page
dhadakkamgarunion0

🖋️ अभिजीत राणे लिखित दै. मुंबई मित्र वि श्ले ष ण रा ज का र णा चे विधीनिषेधशून्य राजकारणी !

🖋️ अभिजीत राणे लिखित

दै. मुंबई मित्र

वि श्ले ष ण रा ज का र णा चे

=====

विधीनिषेधशून्य राजकारणी !

उद्धव ठाकरे!


उद्धव ठाकरे यांचा मूळ पिंड फोटोग्राफरचा होता. त्यांना राजकारणात रस नव्हता. असे म्हटले जाते की पत्नी आणि मित्राच्या आग्रहामुळे त्यांनी राजकारणात लक्ष घातले. उद्धव ठाकरे यांनी २००२ च्या बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. निकाल उत्तम आला आणि म्हणून त्यांना २००३ सालच्या महाबळेश्वर अधिवेशनात शिवसेनेचे प्रमुखपद दिले गेले.


पुढे दोन वर्षात राज ठाकरे , नारायण राणे शिवसेना सोडून गेले. जाताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कंपूवर तोंडसुख घेतले आणि त्यांनी बाळासाहेबांना पिंजऱ्यात ठेवले आहे अशी टीका केली. या टीकेला त्यावेळी कोणीच गांभीर्याने घेतले नाही पण आज मागे वळून पहिले तर लक्षात येते की २००३ पासून २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या सारखा वाघ घरात जेरबंद करून ठेवणारे आणि अंतिमतः त्यांच्याच मुखातून माझ्या उद्धव आणि आदित्यचा सांभाळ करा हे वदवून घेणारे उद्धव ठाकरे किती कसलेले राजकारणी आहेत. त्यांनी शिस्तबद्ध रित्या आपल्याला आव्हान देऊ शकतील अश्या प्रत्येक नेत्याला पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवत स्वतःचे नेतृत्व स्थिर केले. मनोहर जोशींच्या सारख्या जेष्ठ नेत्याचा अवमान करत त्यांनी मीच पक्षाचा एकमेव नेता आहे हे क्रूरपणे सिद्ध केले.


बाळासाहेबांनी हयात असताना भाजपचा कायमच अवमान करत स्वतःच्या अटींवर त्यांच्याशी युती केली होती. पण ही राजकीय भूमिका होती. वैयक्तिक पातळीवर बाळासाहेब अत्यंत दिलदार होते. त्यांचे भाजपच्या आणि संघाच्या जेष्ठ नेत्यांशी अत्यंत मधुर संबंध होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्याच पद्धतीने भाजपशी संबंध ठेवण्याचे धोरण आखले आणि ते यशस्वी रीत्या पार पाडले.


शिवसेना ही कायमच हार्ड निगोशिएटर राहिली आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा त्याच पद्धतीने उद्धव यांनी जागावाटप करण्याचा प्रयास केला. उद्धवच्या क्षमतेचे चुकीचे मुल्यांकन करत आणि बाळासाहेब हयात नाहीत हे लक्षात घेऊन भाजपाने २०१४ च्या विधानसभेला युती तोडली. ही गोष्ट उद्धव यांच्या जिव्हारी लागली आणि त्यावेळी सगळेच प्रमुख पक्ष एकेकटे लढले अश्या लढाईत उद्धव यांनी ६३ जागा जिंकून दाखवल्या जी शिवसेनेची आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.ंची उद्धव नाईलाजाने युतीत समाविष्ट झाले परंतु पुढील पाच वर्ष ते कट्टर विरोधक याच भूमिकेत होते. ज्या पद्धतीची भाषा शिवसैनिक मोदींच्या बद्दल वापरत होते त्यातून भाजप नेतृत्व सावध झाले नाही. उद्धव यांचा कुटील स्वभाव आणि दीर्घद्वेष याचे मुल्यांकन करण्यात भाजपा नेतेच नाही तर महाराष्ट्रातील पत्रकार सुद्धा चुकले आहेत.


२०१९ च्या निवडणुकीपूर्वी आरे आंदोलनाच्या वेळी उद्धव यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात आमचे सरकार आल्यावर अश्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ हे वक्तव्य खरे तर खूप गांभीर्याने घेण्याचा मुद्दा होता पण भाजपा आणि पत्रकार मंडळी बेसावध होती. माझा अंदाज चुकीचा नसेल तर निवडणुकीच्या पूर्वीच सत्ता वाटप , मुख्यमंत्री कोण अश्या बहुसंख्य मुद्द्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात सगळे काही ठरले होते आणि म्हणूनच शरद पवार यांनी त्यांच्या एका सभेत कुत्रे घुसल्यावर शिवसेना वाले आले असे म्हटले होते.


एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव यांच्याकडे फक्त २० टक्के शिवसेना उरली. तरीही उद्धव यांच्या कार्यशैलीत बदल झाला नाही. उलट मेथड इन् मैडनेस या सूत्राचा त्यांनी अधिक प्रभावी वापर सुरु केला. अत्यंत अतार्किक वर्तन आणि भाष्य करणे हे हास्यास्पद वाटते पण यातून तुम्ही परिपक्व राजकारणी मंडळींना सुद्धा बैकफूटवर आणू शकतात हे उद्धव यांनी वारंवार सिद्ध केले आहे. बालिश वर्तन हे निरागस पणाचे द्योतक मानले जाते आणि यामुळे तुम्ही सामान्य मतदारांच्या मनात सहानुभूती निर्माण करू शकता हे सुद्धा मानसशास्त्रीय सत्य आहे. उद्धव ठाकरे या सिद्धांतांचा अत्यंत प्रभावी वापर करत आहेत. संपूर्ण देशात आजवर राजकारणात या शैलीचा कोणीही वापर केलेला नाही त्यामुळे त्यातील धक्का तंत्राचा फायदा घेत उद्धव ठाकरे एकीकडे आपल्या मतदारांना बांधून ठेवत आहेत आणि दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मधील कसलेल्या राजकारणी मंडळींना आपल्याला हवे तसे झुकायला भाग पाडत आहेत.


२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उद्धव यांच्या ब्लॅकमेल कार्यशैलीचा अंदाज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला आला परंतु मोदींना पराभूत करणे आवश्यक असल्याने त्यांनी उद्धव यांचे नाईलाजाने लाड केले.


शिवसेना उद्धव गट यांची स्वतःची राजकीय ताकद खूप मर्यादित आहे. त्यांचे स्वतःचे हक्काचे मतदार खूप मर्यादित आहेत. स्वबळावर ते लढले तर दोन आकडी आमदार सुद्धा निवडून आणू शकत नाहीत. परंतु महाआघाडी या रूपाने लढताना त्यांची ताकद वाढते कारण त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची हक्काची मते मिळतात , मुस्लीम गठ्ठा मतांचा बुस्टर डोस मिळतो. याचाच लाभ घेत त्यांनी २०२४ ला ९ खासदार निवडून आणले जे त्यांच्या पक्ष म्हणून क्षमतेपेक्षा खूप अधिक आहेत.


आत्ता विधानसभेला सुद्धा ते महाआघाडीत अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयास करत आहेत. त्यात सुद्धा ते खास करून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची बलस्थाने असणाऱ्या जागांसाठी आग्रही आहेत. जेणेकरून त्यांना अधिकाधिक आमदार निवडून आणता येतील. यासाठी त्यांचे सगळे प्रयास हे बालिश याच पातळीवर आहेत जसे की ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर लोटांगण घालतात परंतु स्थानिक नेत्यांना किंमत देत नाहीत. तिन्ही पक्षांनी सगळे जागावाटप करून जागा घोषित करणे हे ठरलेले असताना स्वतःची यादी घोषित करणे, ज्यात कॉंग्रेसच्या बलस्थान असणाऱ्या जागा पण अंतर्भूत आहेत आणि नंतर काही ठिकाणी जागांची अदलाबदल करू अशी मखलाशी करणे. हा सगळा बालिशपणा, हा वेडाचार अत्यंत नियोजनबद्ध आहे. यात सर्व स्वरूपाच्या शक्यता गृहीत धरल्या आहेत.


एक सिद्धांत आहे की लहान मुल हे भावनिक आणि आवेगाने संवाद साधते आणि वयस्क व्यक्ती हा तर्क आणि कारण यांच्यावर आधारित संवाद साधतो. उद्धव ठाकरे यांचे बालिश वर्तन संवादाच्या पातळीवर आल्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना समजूतदारपणाचीच भूमिका घ्यावी लागते आणि यांनी केलेल्या अवास्तव मागण्यांच्या पैकी बहुसंख्य मागण्या मान्य करणे याला पर्याय उरत नाही.


कॉंग्रेस पक्ष आणि भाजपा सध्या भविष्यातील २० वर्ष या देशावर कोण राज्य करणार यासाठीची लढाई लढत आहेत आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही टप्प्यावर आपल्या शक्तीचे खच्चीकरण होऊ देणे परवडणार नाही हे सत्य आहे. त्यामुळे भाजपा उद्धव बधत नाही म्हटल्यावर शिंदे यांना फोडून शिवसेनेची अधिकाधिक ताकद आपल्याकडे ओढून घेत आहे त्याच वेळेला कॉंग्रेस आपल्याकडे आलेल्या उद्धव यांच्या अवास्तव मागण्यांना सुद्धा निमूटपणे संमती देते आहे कारण भविष्यासाठी उद्धव यांचे आपल्याकडे असणे हे फायद्याचे आहे याची त्यांना जाणीव आहे.


अमरवेल ही एखाद्या मोठ्या वृक्षाला बिलगून वाढते आणि ती त्या वृक्षाचा रस शोषून घेत स्वतःचे अस्तित्व टिकवते. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव यांच्या एक व्यक्ती , एक नेता, एक संघटक म्हणून असणाऱ्या समस्त मर्यादा लक्षात घेता त्यांना भाजप किंवा कॉंग्रेस अश्या एका वृक्षाचा आधार घेणे आवश्यक होते. भाजपा नेतृत्व हे आपल्याला संपवून पक्ष ताब्यात घेऊ शकते हा धोका लक्षात घेऊन उद्धव कॉंग्रेसकडे गेले आहेत. कॉंग्रेस हा मुघली पद्धतीने काम करणारा आणि अधिक परिपक्व मानसिकता असणारा पक्ष असल्याने त्यांना अश्या पद्धतीची अमरवेल पोसण्यात काही गैर वाटत नाही. याच पद्धतीने त्यांना वारंवार लत्ताप्रहार करणाऱ्या शरद पवारांना सुद्धा त्यांनी इतकी वर्ष सांभाळले आहेच. त्यामुळे उद्धव आणि कॉंग्रेस एकमेकांशी याच पद्धतीने भांडत भांडत सुखाने जगू शकतात.


क्षमता या पातळीवर देवेंद्र फडणवीस किंवा शरद पवार हे नक्कीच श्रेष्ठ आहेत. परंतु सर्वार्थाने अत्यंत मर्यादित क्षमता असताना सुद्धा उद्धव ठाकरे हे अधिक कुटील, अधिक चाणाक्ष आहेत आणि म्हणून ते राजकारणी म्हणून या दोघांच्या पेक्षा अधिक यशस्वी आहेत हे सत्य आहे.

शरद पवार यांच्याबद्दल एक जवळचा राजकारणी मला म्हणाला होता की पवार साहेबांवर कोणीही प्रेम करत नाही परंतु ते अशी परिस्थिती निर्माण करून ठेवतात की तुम्हाला त्यांच्यावर नाईलाजाने का होईना पण प्रेम करावेच्च लागते.


हे वाक्य उद्धव ठाकरे यांना सुद्धा तितकेच लागू होते. उद्धव ठाकरे हे पवार साहेबांना आणि सोनिया गांधीना आपल्यावर नाईलाजाने प्रेम करायला भाग पाडत आहेत हे पहाता उद्धव ठाकरे हे अधिक उत्तम राजकारणी आहेत असे आपल्याला सुद्धा नाईलाजाने कबूल करावेच लागेल... !






5 views0 comments

Comentarios


bottom of page