ठाकरे बंधूंना ऐक्याचा लाभ होईल ???
- dhadakkamgarunion0
- Oct 26
- 3 min read
संपादकीय
अभिजीत राणे
ठाकरे बंधूंना ऐक्याचा लाभ होईल ???
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नाव आजही भावनिक, सांस्कृतिक आणि राजकीय वजन असलेले आहे. परंतु गेली दोन दशके ठाकरे घराणं दोन भागात विभागलं गेलं आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे. आता या दोघांच्या पुनर्मिलनाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. पण प्रश्न असा आहे — हे पुनर्मिलन केवळ भावनिक असेल का राजकीय आणि या पुनर्मिलनाचा राजकीय लाभ संभवतो का ?
मुंबईत मराठी मतदारांचे प्रमाण सुमारे 35 ते 38 टक्क्यांच्या दरम्यान आहे. या मतांवर सर्व मराठी पक्षांचा परंपरेने प्रभाव राहिला आहे. मात्र गेल्या दोन दशकांत मुस्लिम, उत्तर भारतीय, गुजराती आणि दक्षिण भारतीय मतदार हे निर्णायक बनले आहेत. अशा स्थितीत फक्त भावनिक “मराठी कार्ड” खेळून संपूर्ण सत्ता मिळवणे कठीण झाले आहे.
शिवसेना (उद्धव) आणि मनसेची एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना, काँग्रेसमध्ये मात्र काही नेते स्वतंत्र लढाईची भाषा बोलू लागले आहेत. जर विरोधी पक्ष पुन्हा फुटले, तर त्याचा थेट फायदा भाजप–शिंदे–अजित पवार यांच्या महायुतीला होईल. मागील निवडणुकांप्रमाणेच मतविभाजनाची शक्यता वाढेल आणि “विरोधकांची कमजोरी” हेच सत्ताधाऱ्यांच सर्वात मोठ बळ बनेल.
महायुतीने सध्या मुंबई वगळता बहुतांश ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्देश आहे — प्रत्येक पक्षाची ताकद वेगळी मोजणे आणि स्थानिक समीकरणे तपासणे. पण या राजकीय जुगारात जर गणित चुकले, तर त्याचा परिणाम थेट मुंबईवर होऊ शकतो. कारण मुंबई ही केवळ प्रतीकात्मक नाही तर शिवसेना उबाठा आणि मनसे च्या राजकीय अस्तित्वासाठी निर्णायक रणभूमी आहे.
परंतु एकनाथ शिंदे यांनी मोदींची भेट घेऊन पुन्हा चर्चेत वेगळे रंग भरले आहेत. मुंबईत महायुती असणे भाजपासाठी आवश्यक आहे कारण भाजपाला या वेळी काहीही करून बृहन्मुंबई महापालिका जिंकणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे एकनाथ शिंदे यांना त्यांचा ठाण्याचा गड राखणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी मोदींकडे बृहन्मुंबई प्रमाणेच ठाण्यातही महायुतीच असावी यासाठी रदबदली केली असणार आहे किंवा कदाचित संपूर्ण महाराष्ट्रासाठीच महायुती कायम ठेवण्यासाठी मोदींना विनंती केली गेली असेल. मोदी शिंदे यांच्या बैठकीत काय घडले हे दोन तीन दिवसात उघड होईल पण तोपर्यंत मुंबईत तरी महायुती लढणार हे नक्की आहे आणि त्यानुसार ठाकरे बंधु सुद्धा एकत्र लढण्याचाच निर्णय घेतील यात शंका नाही.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांसाठीही येणाऱ्या महापालिका निवडणुका म्हणजे अस्तित्वाची परीक्षा आहेत. उद्धवसाठी शिवसेनेच्या मूळ ओळखीचा प्रश्न आहे, तर राजसाठी मनसेचा पुनरुज्जीवनाचा प्रश्न आहे. दोघेही “मराठी अस्मिता”चा झेंडा उंचावतीलच, पण मतदारांना केवळ भावना नव्हे तर ठोस पर्यायही हवा आहे. तो देण्याचे सामर्थ्य या दोन्ही पक्षात आहे का ? हा महत्वाचा मुद्दा आहे.
मुंबई–ठाणे–पुणे या शहरी पट्ट्यात मराठी मतं गेल्या १५ वर्षांत शिवसेना आणि मनसे मध्ये तुटलेली आहेत. उद्धव आणि राज जर एकत्र आले, तर हे मतविभाजन थांबेल. दोघांसाठी एकसंघ मराठी मत पुन्हा तयार होऊ शकते जे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही मतदारसंघात निर्णायक ठरू शकते. ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचा भावनिक मुद्दा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा निर्माण करू शकतो. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, विचार आणि जुनी शिवसेना संस्कृती पुन्हा एका झेंड्याखाली येऊ शकते. उद्धव ठाकरे यांचे संघटनकौशल्य आणि राज ठाकरे यांचे प्रभावी वक्तृत्व एकत्र आले तर, ते महाराष्ट्रात एक ‘पॉलिटिकली बॅलन्स्ड फोर्स’ निर्माण करू शकतात. एकीकडे सहानुभूती आणि स्थैर्य, दुसरीकडे जोश आणि प्रभाव या दोन्हीच्या बळावर ठाकरे बंधु निवडणुकीत महायुतीला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात.
जर हे पुनर्मिलन वास्तवात आले, तर महा विकास आघाडीत ठाकरे घराण्याचे स्थान अधिक मजबूत होईल.काँग्रेस–राष्ट्रवादीलाही मराठी भावनांच्या एकत्र येण्याचा लाभ होईल. परंतु कोंग्रेस पक्षाची सध्या तरी भाषा मनसेला बरोबर घेण्याच्या विरोधात आहे. दुसरीकडे कोंग्रेस सुद्धा स्वबळावर लढण्याची भाषा करत दोन्ही ठाकरे एकत्र लढले तर कोंग्रेस एकटे लढण्याच्या मनःस्थितीत आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
ठाकरे बंधूंचे हे एकत्र येणे परिस्थितीच्या दडपणाखाली असले तरीही त्यांच्या दोघांच्या स्वभावातील भिन्नता आणि त्यांचे मतभेद अजूनही कायम आहेत. उद्धव आणि राज दोघेही स्वतःला ‘मुख्य चेहरा’ मानतात. “पार्टीचा चेहरा कोण?” या प्रश्नावर मतभेद निर्माण होणे निश्चित आहे. हा संघर्ष सुरुवातीला लपवला गेला तरी, तो पुढे संघटन पातळीवर उफाळणारच. उद्धव शांत, संघटनप्रिय आणि मर्यादित बोलणारे. राज स्पष्टवक्ते, आक्रमक आणि व्यक्तिनिष्ठ निर्णय घेणारे. या दोन भिन्न शैली एका पक्षात टिकवणे कठीण ठरू शकते. दोघे एकत्र आले की, प्रचारात “मराठी माणूस” हा टोन अधिक ठळक होईल. त्याचा परिणाम — गैरमराठी मतदारांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता. त्यामुळे मराठी मते ही जशी ताकद आहे त्याच प्रमाणे तो एक कमकुवत दुवा सुद्धा सिद्ध होऊ शकतो कारण मुंबईत गैर मराठी मतदारांची संख्या सुद्धा तशी लक्षणीय आहे.
उद्धव ठाकरे कडे आज खासदार, आमदार आणि नगरसेवक सर्व आहेत. राज ठाकरे यांच्याकडे काही नाही. अशा परिस्थितीत दोन्ही प्रश्न जागा वाटप कसा करणार हा यक्ष प्रश्न आहे. उद्धव आणि राज या दोघांमध्ये व्यक्तिगत दुरावा फक्त राजकीय नव्हता, तो भावनिक पातळीवरही खोल होता. दोघांनीही एकमेकांना अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे एकत्र येणं हे केवळ गणित नव्हे, तर विश्वास पुनर्स्थापनेचं मोठं मानसिक समीकरण आहे. राजकीय भूमिका एकत्र करता येतात, पण स्वभाव आणि दृष्टिकोन यांचा समन्वय साधणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे.
उद्धव–राज पुनर्मिलन हे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हेडलाईन देणारे ठरू शकते. पण ते टिकण्यासाठी दोघांनी राजकारणाऐवजी विचारधारा आणि संघटने ला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. मराठी मतांचे एकत्रीकरण हा त्याचा अल्पकालीन लाभ असेल. पण दीर्घकालीन टिकावासाठी एकमेकांवरील विश्वास आणि जबाबदारीची विभागणी हेच निर्णायक घटक असतील.








Comments