अभिजित राणे युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न...
अभिजीत राणे युथ फौंडेशन आयोजित वृत्तपत्रलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता गोरेगाव मुंबई येथील केशव गोरे ट्रस्ट हॉल मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच वृत्तपत्रलेखक मोठया संख्येने उपस्थित होते. राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धेसाठी जवळपास १५० पत्रलेखकांनी आपल्या प्रवेशिका पाठवल्या होत्या. त्यातून परीक्षकांनी १५ पत्रांची पुरस्कारासाठी निवड केली. यात विश्वनाथ पंडित-चिपळूण यांच्या पत्राला प्रथम क्रमांक मिळाला, दत्ता खंदारे धारावी यांच्या पत्राला द्वितीय क्रमांक तर प्रिया मेश्राम-नागपूर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच सिराज शेख-बीड चतुर्थ, सुधीर कनगुटकर-दिवा पंचम, दत्तप्रसाद शिरोडकर मुलुंड-सहावा, सुभाष अभंग ठाणे-सातवा, यशवंत चव्हाण बेलापूर-आठवा, गणेश लेंगरे सोलापूर-नववा व किरण धुमाळ-अकलूज यांनी दहावा क्रमांक प्राप्त केला. जनार्दन नाईक, शांताराम वाघ, रोहित रोगे, संगीता जांभळे व अनुज केसरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे कैलास रांगणेकर-संपादक दै.मुंबई संघर्ष, महेश्वर तेटांबे, निसार अली, शांताराम गुडेकर, सुरेश पोटे, आकाश पोकळे, पंकजकुमार पाटील-संपादक साप्ताहिक आदर्श वार्ताहर , लक्ष्मण राजे, रफिक घाची- संपादक दै.डहाणू मित्र, गणेश हिरवे, उदय सांगळे- संपादक आपला समाज मार्गदर्शक, निलेश धुरी, श्याम ठाणेदार, वैभव मोहन पाटील, गुरुनाथ तिरपनकर, शशिकांत सावंत,दिलीप शेडगे, अजित भोगले, प्रवीण पवार, सूर्यकांत सालम, जनार्दन जंगले, रमेश गावडे, पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्व विजेत्या व सन्मानार्थीना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कै.वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण व समाजभूषण पुरस्कार म्हणून शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व बुके देऊन गौरविण्यात आले. सन २०१९ च्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा देखील याप्रसंगी सन्मान करण्यात आला. तसेच कोविड काळात समाजोपयोगी कामे करणाऱ्या व योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांनादेखील सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मराठी बिग बॉस फेम सुप्रसिद्ध गगनभेदी व्यक्तिमत्व श्री अनिल थत्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री अनिल गलगली, धडक कामगार युनियनचे अध्यक्ष व आयोजक श्री अभिजित राणे, माजी नगरसेवक श्री विनोद शेलार, जेष्ठ राजकीय समीक्षक श्री अशोक राणे, दैनिक मुंबईच्या संपादिका सौ अनघा राणे, वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अनघा राणे यांनी केले. अभिजित राणे यांचे व्यापक व सर्वसमावेशक कार्य व त्यांच्या मैत्रीबद्दल भरभरून बोलताना त्यांच्या कामाची सर्वच मान्यवर वक्त्यांनी तोंड भरून स्तुती केली. गगनभेदीकार अनिल थत्ते यांनी कोविडची लागण झाल्यानंतर अभिजित राणे यांनी दिलेल्या आधाराबद्दल बोलताना एक गमतीदार किस्साच कथन केला. अभिजित यांना त्यांच्या आधाराबद्दल आशीर्वाद देताना जे मला लाभले ते तुला लाभू दे असे सांगितल्यावर अभिजित यांनादेखील कोरोनाने ग्रासल्याचे मिश्किल शैलीत सांगुन सभागृहातील वातावरण हर्षोल्लीत केले. समारोपाच्या भाषणात अभिजित राणे यांनी सर्वच उपस्थितांचे आभार मानत संघर्षातून उभ्या केलेल्या आपल्या व्यावसायिक व सामाजिक आयुष्यावर धावता प्रकाशझोत टाकला. मित्र व सोबती कसे असावेत हे त्यांनी अनिल थत्ते व अनिल गलगली यांचेकडे बोट दाखवून उदाहरणांसह पटवून दिले. आपल्यासोबत काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वतः एक लीडर असून आपण कधीही त्यांना आपल्यापेक्षा कमी लेखत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आनंदाच्या वेळी हजर असणारे लोक संकटाच्या वेळी मात्र साथ सोडतात असे ही वस्तुस्थिती कथन करून आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्ती ह्या मोजक्याच असल्या तरी त्या एक परिवार व कुटुंब म्हणून सोबत असल्याचे त्यांनी विषद केले. आपल्या कार्यक्रमाला आपण अगदी मुख्यमंत्र्यांपासून मोठमोठया मान्यवरांना आमंत्रित करू शकतो मात्र कलेची व सेवेची कदर ठेवणाऱ्या व स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने मोठ्या झालेल्या आपल्या मित्रपरिवारातीलच व्यक्तींच्या हस्ते समाजातील चांगल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा अनोखा व स्तुत्य पायंडा त्यांनी कायम ठेवला आहे. यावेळी पुणे येथून या समारंभासाठी खास उपस्थित राहिलेले नासपचे शहर सचिव सुभाष मुळे यांच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेला विषेशांक मान्यवरांना भेट देण्यात आला..कार्यक्रमाचे आपल्या खुमासदार शैलीत व अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, समाजसेवक गणेश हिरवे यांनी केले. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने अभिजित राणे युथ फाऊंडेशनच्या वतीने वृत्तपत्रलेखन, निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. खरे तर वृत्तपत्रलेखक हा मुळातच एक उपेक्षित घटक. त्याला ना कुठला मान ना सन्मान ना सुविधा. वृत्तपत्रलेखकाची जागा केवळ 'वाचकांची पत्रे' या रकान्यापुरतीच मर्यादीत. पूर्वी या रकान्याची वृत्तपत्रे व प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जायची मात्र आता त्याला दुर्लक्षित केले जातेय अशी खंत गणेश हिरवे यांनी व्यक्त केली. पत्रकारांना ज्या प्रमाणात सोयी, सुविधा, प्रतिष्ठा मिळते ती दुर्दैवाने वृत्तपत्रलेखकांना मिळत नाही ही एक शोकांतिकाच आहे. तसे पाहायला गेले तर वृत्तपत्रलेखक हा जनमानसाचा आरसा. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न व विचार तो पत्रांच्या माध्यमातुन विविध वृत्तपत्रांमध्ये मांडतो. त्यामुळे वृत्तपत्रलेखकांचे काम व महत्व एखादया योध्दापेक्षा नक्कीच कमी नसते. त्यामुळे त्यांना शासनाकडून पत्रकारांप्रमाणे योग्य सोयी सुविधा, जेष्ठ पत्रलेखकांना पेन्शन या बाबी मिळायला हव्यात अशी मागणी स्पर्धाप्रमुख गणेश हिरवे यांनी करून व्यासपीठावरील मान्यवरांना त्यासाठी प्रयत्न करण्यासदेखील विनवले. मात्र अशा योध्दयांचा सन्मान करण्याची भुमिका मा. अभिजित राणे हे नेहमीच दाखवत आले आहेत. त्याबद्दल सर्वच पत्रलेखकांनी त्यांचे आभार मानले. कौतुक पुरस्काराचे नाही तर पुरस्काराची दानत दाखवणा-या मानसिकतेचे देखील व्हायला पाहिजे अशी भावनादेखील उपस्थितांनी व्यक्त केली. तब्बल अडीच तास रंगलेल्या ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याची सांगता शेवटी राष्ट्रगीताने झाली.
गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व




Comments