top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 24
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मराठी अस्मितेच्या नावाखाली खळ्ळखट्याक करून राज ठाकरे यांच्या मनसेने महाराष्ट्रात पाय रोवले. त्यांना पाहिल्याच प्रयत्नात लोकांनी तब्बल 12 आमदारांचे बळ प्रदान केले. परंतु गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यापेक्षा अधिक काहीही कर्तुत्व मनसेने न दाखवल्याने त्यांच्या पक्षाची ताकद गेल्या 18 वर्षात कमी होत होत आता एक मोठा शून्य झाली आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही काड्या करणे आवश्यक आहे. सकारात्मक , रचनात्मक आणि विकासाचे राजकारण हा विषय दोन्ही ठाकर्‍यांच्या क्षमतेबाहेरील असल्याने राज ठाकरे यांनी आपल्याला जे उत्तम जमते ते करायला आरंभ केला आहे. हिन्दी ही असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. आणि इकडे राज्य सरकार हिन्दीची सक्ती लादते आहे असे म्हणून त्यांनी टिकास्त्र सोडले आहे. या मुद्द्यावर रस्त्यावर येण्याचा आणि राडा करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. तिसरी भाषा म्हणून कोणतीही भाषा स्वीकारता येईल पण त्यात हिंदीला प्राधान्य दिले आहे आणि हा इतकाच मुद्दा आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगून सुद्धा राज ठाकरे आक्रस्ताळेपणा करत आहेत. यामुळे त्यांच्या पक्षाचे भवितव्य अधिकच अंधकारमय होणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीइतकीच मालेगाव साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. पवार खानदानात उभी फुट पडल्यावर झालेली पहिली निवडणूक लोकसभेची होती त्यात सुप्रिया सुळेंनी बाजी मारली. विधानसभेला अजित दादांनी उलटफेर करून सामना बरोबरीत सोडवला. आता महत्वाचे सत्ता केंद्र असलेल्या मालेगाव साखर कारखान्याच्या किल्ल्या जनता कुणाच्या हातात देणार हे औत्सुक्याचे आहे. या निवडणुकीत दोन्ही पवार गटांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत अजित पवार आणि चंद्रकांत तावरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांनी सुद्धा तब्बल 88 % मतदान करून ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनवली आहे. हा निकाल अजित पवारांना नवे बळ प्रदान करू शकतो. परंतु हे घडेल का ? हाच महत्वाचा प्रश्न आहे. 24 तारखेला महाराष्ट्राचे लक्ष्य लागून राहिलेल्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भाजपा सोडून अनेक वर्ष लोटली तरी एकनाथ खडसे यांना भाजपाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. पंढरपूर मध्ये त्यांनी भाजपाच्या राज्य पातळीवरील आणि केंद्र पातळीवरील नेतृत्वावर टीकेची झोड उठवली. मी पक्षात असताना गिरीश महाजन हा सामान्य कार्यकर्ता होता. आज तो मंत्री झाला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे मी राजीनामा दिला होता आज भाजपामध्ये भ्रष्ट आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसांना पायघड्या घालून प्रवेश दिला जातो. त्यांची ही टीका एकांगी आणि वैफल्यग्रस्त आहे. आज ज्या शरद पवारांची ते तोंड फाडून स्तुति करत आहेत, त्याच पवारांनी यांना विरोधीपक्ष नेता असताना तोडपाणी करणारा नेता म्हणून संबोधले होते आणि त्यांच्या या तोडपाणी कौशल्यामुळेच मोदी आणि शहा यांनी तुलनेने नवख्या आणि तरुण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले होते याचा खडसे यांना सोईस्कर विसर पडला आहे. पक्ष नेतृत्वावर टीका केल्याने खडसे यांना आत्मिक समाधान कदाचित मिळेलही परंतु राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाने त्यांना वापरुन आणि त्यांचे महत्व संपवून आता अडगळीत टाकले आहे हे सत्य त्यामुळे पुसता येणे अशक्य आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

संजय राऊत यांनी भाजपावर आरोप करण्याच्या नादात महाविकास आघाडीच्या राजवटीचे बिंग फोडले आहे. काल संजय राऊत यांनी आरोप केला होता की शिवसेना आणि राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष भय आणि भ्रष्टाचार यामुळे फुटले आहेत. अर्थात त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष आणि शिवसेनेतील आमदारांनी आणि मंत्र्‍यांनी महा विकास आघाडीची राजवट असताना प्रचंड भ्रष्टाचार केला होता आणि तो ईडीच्या दृष्टोत्पत्तीस आल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची टांगती तलवार होती. ईडीने आपल्याला अटक केली आणि आपल्याकडील बेकायदेशीर अर्जित संपत्ति हडप करेल या भीतीने या आमदारांनी आणि मंत्र्‍यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हाताखालील आमदारांनी आणि मंत्र्‍यांनी त्यांची साथ देत आपला मूळ पक्ष सोडला. या कबुलीजबाबात तथ्य नाही हे महाराष्ट्रातील जनतेने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना भरभरून मते देऊन सिद्ध केले आहे. लोक शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या एकाधिकारशाहीला आणि सत्तापिपासेला वैतागून पक्ष सोडून गेले हे सत्य बोलण्याचे संजय राऊत यांचे धाडस नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

समाजवादी पक्षाचे नेते अबु आसिम आजमी परत एकदा बरळले आहेत. हिंदूंच्या वारीमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे वहातुकीला प्रचंड अडथळा होतो. परंतु याबद्दल कोणीही काहीही म्हणत नाही. परंतु एखाद्या वेळी मशिदीत नमाज पढायला जागा पुरली नाही म्हणून लोकांनी रस्त्यावर येऊन नमाज पढली तर लगेच आमच्यावर टीका होते, कारवाई केली जाते. अबु आजमी यांचे मत वरवर अत्यंत योग्य वाटले तरीही ते धादांत खोटे बोलत आहेत. पहिला मुद्दा वारीचा त्रास ती जात असलेल्या प्रत्येक गावाला वर्षातून एक दिवस होतो आणि त्यामुळे तो सुसह्यच आहे. परंतु नमाज ही दिवसातून पाच वेळा आणि 365 दिवस पढली जाते त्यामुळे त्यासाठी रास्ते अडवणे ही रोजची आणि दिवसातून पाच वेळा होणारी डोकेदुखी होऊ शकते. दूसरा मुद्दा हिंदू वारीच्या निमित्ताने रस्त्यावर एक दिवस येतात पण म्हणून ते रस्त्यावर हक्क सांगत नाहीत. कोंग्रेसच्या कृपेने वक्फ बोर्ड कायद्यात जे दळभद्री बदल केले आहेत त्यामुळे मुसलमान आज रस्त्यावर नमाज पढतील आणि उद्या रास्ता वक्फची मालमत्ता आहे असे घोषित करतील , सरकारला सुद्धा ही भीती आहे म्हणून ते तुम्हाला रस्त्यावर येऊच देत नाहीत.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page