top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 19
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करण्याची पुणेरी टोमणे कला शिकून घेतली आहे. काल फ्रांस चे अध्यक्ष मॅक्रॉन यांना भेटल्यावर मोदींनी हसत हसत प्रश्न टाकला,” आजकाल तुम्ही ट्विटरवर युद्ध सुरू केले आहे का ?” दोघेही खळखळून हसले. याला संदर्भ होता जी 7 बैठकीला अर्धवट सोडून डोनाल्ड ट्रंप अमेरिकेत परतल्याचा. डोनाल्ड ट्रंप जी-7 बैठक अर्धवट सोडून अमेरिकेला परतले आणि त्यांनी एक ट्विट केले की मी एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी परत जातो आहे. यावर मॅक्रॉन यांनी इराण आणि इस्रायल शस्त्रसंधी साठी जात आहात का ? असा छान टोमणा मारला. याला संदर्भ ट्रंप यांच्या दोन अपयशी शस्त्रसंधींचा होता. पहिली रशिया युक्रेन आणि दुसरी भारत पाकिस्तान. यामुळे ट्रंप भडकले आणि मी या पेक्षाही महत्वाच्या कामासाठी अमेरिकेत आलो आहे असे त्यांनी मॅक्रॉन यांना सुनावले. या जाहीर टोमणेबाजीवर मोदींनी सुद्धा आपल्या नर्म विनोदी शैलीत काल मॅक्रॉन यांना चिमटा काढला आणि उपस्थित मंडळी हास्यकल्लोळात बुडाली. बिचारा ट्रंप तो अत्यंत बडबड्या आहे आणि त्यामुळे त्याच्या अपयशावर सगळेच जण आता त्याची टांग खेचत आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जननायक राहुल गांधीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !! राहुलजी ! आपण आज 55 वर्षे पूर्ण करून 56 व्या वर्षात पदार्पण केले आहे . आम्ही सर्वसाधारण नोकरदार माणसे 58 / 60 वयापर्यंत सेवा निवृत्त ही होवून जातो , पण राजकारण्याची खरी इनिंग्स ही 55/ 60 वयानंतर सुरू होते . त्यामुळे आपण देशव्यापी दौरे करून आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांसोबत काम करून आपली जी जननायक म्हणून प्रतिमा तयार केली आहे , त्याचा उपयोग करण्याची वेळ आलेली आहे . मोदी शहांची जुलमी राजवट घालवण्यासाठी आणि देशाला पुन्हा 2014 पूर्वीचे सोन्याचे दिवस दाखवण्यासाठी तुमच्यासारख्या महान नेत्याने देशाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या मजबूत खांद्यावर घेण्याची वेळ आलेली आहे . आपण यावेळी पूर्ण ताकदीने मोदी शहांशी टक्कर देवून इंडी आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यात यशस्वी व्हाल याची आम्हाला खात्री आहे . तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

हिंदीबद्दलच्या वादात चित्र असं निर्माण झालंय की जणू सरकारला काहीतरी विद्यार्थ्यांचं भलं करायचं आहे आणि मराठीप्रेमी त्यात अडसर आणतायत.शिक्षणतज्ज्ञांना पण कळत नाहीय इतकी मुलांच्या भविष्याची काळजी सरकारला आहे..ते अस्वस्थ झालेत त्यांचा उद्धार करण्यासाठी...पण ते काम आपण फक्त हिंदी लागू करुनच करु शकतो असं का वाटतंय सरकारला?ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आधार घेत ( खरंतर त्यातही कुठेही तिसरी भाषा बंधनकारक असं म्हटलेलं नाहीय) हा निर्णय घ्यावा लागतोय असं सरकार म्हणतंय..त्याच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये १. राईट टु एज्युकेशनची व्याप्ती वाढवा असं म्हटलंय. जीडीपीच्या किमान ६ टक्के खर्च शिक्षणावर करा असं म्हटलंय . तिथे सरकार ही धोरणं जशीच्या तशी लागू का नाही करत ? शिक्षणासाठी पायाभूत सुविधांवरचा खर्च दुप्पट करा असंही पॉलिसीत म्हटलंय...तुम्ही दुप्पट सोडा..आहे तेवढा तरी करताय का...शिक्षण सर्वसमावेशक करा...सामाजिक दृष्ट्या मागासांपर्यंत पोहचवा असं म्हटलंय..ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला प्रमाण मानत तुम्ही त्यातला हाच एक मुद्दा लावून धरलाय तो कुठल्या हेतूनं...आणि बाकीच्या मुद्द्यांकडे सोयीस्कर डोळेझाक का?काय कारण असेल?

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

देवेंद्रजी तुम्हारा चुक्याच !!! सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाच्या प्रतिमेला मोठ्या प्रमाणात तडा गेला आहे हे सत्य भाजपाने स्वीकारणे आवश्यक आहे. सर्वसामान्य मतदार हा अत्यंत नाराज आहे आणि त्याच्याशी संवाद साधून त्याला आश्वस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. या बाबतीत देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकूळे हे कमी पडले आहेत. एक तर स्थानिक पदाधिकारी , आमदारांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याने नाशिकमध्ये फटका बसणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर सांगली मध्ये वसंत दादांच्या कुटुंबातील व्यक्ती भाजपात आली ही खरे तर खूप मोठी असणारी बातमी झाकोळली गेली. तिथे सुद्धा चंद्रकांत दादांनी जनसुराज्य पक्षाचा उपाध्यक्ष असणार्‍या एका वादग्रस्त नेत्याच्या कलाने पक्ष चालवायला घेतला असल्याने सार्वत्रिक नाराजी आहे. या मोठ्या पक्षप्रवेशाला त्याने उपस्थित राहायची काहीच गरज नव्हती पण तो उपस्थित होता. आता सुद्धा पक्षांतर्गत कार्यकर्ते आणि आमदारांना फाट्यावर मारून या बाहेरील नेत्याचे चंद्रकांत दादा ऐकत असल्याची उघड तक्रार सुरू झाली आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करताना पक्षातील नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. त्यांची नाराजी महाग पडेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नागपुरात होणार फाल्कन 2000 जेट निर्मिती, मेक इन इंडियाची एक मोठीच गरुडझेप!!! पॅरिस एअर शोमध्ये झालेला डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड यांच्यातील करार आत्मनिर्भर भारतच्या दिशेने उचललेलं महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल आहे. या करारामुळे भारत एव्हिएशन उत्पादक देशांच्या यादीत पोहोचणार आहे. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, ब्राझीलसारख्या देशांबरोबर आता भारताचं नावही या प्रगत विमाननिर्मितीच्या यादीत घेतलं जाईल. डसॉल्टचे राफेल हवाई दलात समाविष्ट झाले आहे त्यांनी नागपूरला पसंती देणं म्हणजे भारतातल्या सुरक्षिततेच्या, कामाच्या गुणवत्तेच्या आणि धोरणात्मक स्थैर्याच्या प्रतिमेवर त्यांचा विश्वास दृढ झाला आहे. या संपूर्ण घटनाक्रमातील पडद्यामागील सुत्रधार देवेंद्रजी फडणवीस आहेत. अन्य राज्ये पण हा प्रकल्प मिळवण्याच्या स्पर्धेत होती परंतु अंतिमतः महाराष्ट्रानेच बाजी मारली याचे श्रेय देवेन्द्रजींनाच दिले पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपुर मधील मिहान प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर संरक्षण व एरोस्पेस उत्पादनासाठी आधारभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या ज्याचे फळ या ऐतिहासिक कराराच्या रूपाने मिळाले आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page